करोना काळात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत जवळपास 13 कोटी 1 लाख 19 हजारांहून अधिक लोकांना लस देण्यात आली असून सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व लोकांना लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत करोना लस घेण्यापूर्वी आणि नंतर कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.
करोना लस घेण्यापूर्वी काय करावे?
आपल्याला कोणत्याही औषधाची ऍलर्जी असल्यास, करोना लस घेण्यापूर्वी आपण डॉक्टरांना त्याबाबत अवश्य सांगावे. लसीकरण करण्यापूर्वी चांगले खाणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच पौष्टिक आहार घ्या आणि भरपूर झोप घ्या. शक्य तितका आराम करण्याचा प्रयत्न करा. जर आपण लस घेण्यापूर्वी टेन्शनमध्ये असाल तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.
“या’ लोकांनी विशेषकाळजी घ्यावी
मधुमेह किंवा रक्तदाब असलेल्या लोकांचा आजार नियंत्रित करणे आवश्यक आहे. कर्करोगाशी झुंजणाऱ्या रुग्णांनी आणि विशेषत: केमोथेरपी घेतलेल्यांनी लस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्यांना करोनाचा उपचार म्हणून प्लाझ्मा किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडी मिळाली आहेत त्यांनी लस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. गेल्या दीड महिन्यात ज्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे त्यांच्यासाठी, लस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे.
लसीकरण झाल्यानंतर काय?
लसीकरण केंद्रावर लस लावल्यानंतर लाभार्थ्यास काही गंभीर समस्या आहे का, ते पाहण्यासाठी काही वेळासाठी तेथे बसवले जाते. लाभार्थीस कोणतीही अडचण न आल्यास त्याला तेथून सोडले जाते.
या गोष्टीही लक्षात ठेवा
शरीराच्या ज्या भागावर लस लागू केली आहे त्या भागावर वेदना होणे सामान्य आहे. याची भीती बाळगू नका. या लसीमुळे लाभार्थीस ताप येऊ शकतो. याबद्दलही काळजी करण्याची काहीच गोष्ट नाही. थंडी वाजून येणे आणि थकवा यासारखे काही दुष्परिणाम देखील काही लोक अनुभवू शकतात. हे सर्व दुष्परिणाम काही दिवसांत नाहीसे होतील.
लस घेतली, त्यानंतर काय करावे?
जर आपण लस घेतली असेल तर असे समजू नका की आपल्याला यापुढे करोनाची लागण होऊ शकत नाही. तज्ज्ञ नेहमीच म्हणत आहेत की ही लस संसर्गापासून नव्हे तर गंभीर आजार होण्यापासून संरक्षण करते. म्हणून, लसीकरणानंतरही करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. यात मास्क घालणे, सहा फुटांचे सुरक्षित शारीरिक अंतर ठेवणे आणि हात धुणे यांचा समावेश आहे. गरज नसल्यास घराबाहेर अजिबात पडू नका.
लस घेण्यापूर्वी आणि नंतर कोणते अन्न खावे?
जर आपण लस घेणार असाल तर आपले जेवण आणि पेय व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे आहे. सकस आणि पौष्टिक आहार घ्या, तळलेले आणि भाजलेले खाऊ नका, तर मुबलक प्रमाणात पाणी प्या. उन्हाळ्याचा हंगाम असल्याने खरबूज, काकडी, कलिंगड या पाण्याने समृद्ध गोष्टी खा. या कालावधीत दारू, सिगारेट इत्यादीपासून दूरच राहा. लस घेतल्यानंतरही या गोष्टी लक्षात ठेवा आणि केवळ साधे, पौष्टिक आहार घ्या. करोनापासून बचावासाठी हे आपल्याला खूप मदत करेल.