नुकताच घडलेला हैदराबादचा प्रसंग ऐकला अन् डोळ्यासमोर एक प्रश्नचिन्ह उभे ठाकले, कुठे चाललोत? काय करतोय? असे प्रश्न सद्सद्विवेकबुद्धी गमावत चाललेल्या पशुवत मानवांनी स्वतःलाच विचारणा करत उत्तर देण्याची वेळ आली आहे. मन व बुद्धी यांचा सुरेख संगम म्हणजे मानवी देह अन् त्यात आल्याचा प्रकाश सतत तेवत ठेवणारी सद्सद् विवेकबुद्धी आपण जेव्हा एखादी चुकीची कृती करतो, तेव्हा ती जागृत ठेवणे क्रमप्राप्तच पण त्यासाठी उत्तम बैठकीची गरज असावीच लागते.
कुठे जातोस? काय करतोस? या प्रश्नावर दिलेली उलट उत्तरे तुला काय करायचेय? असे संवाद पौगंडावस्थेतल्या मुलामुलींच्यात होत असतात वयात येताना होणारे शारीरिक मानसिक बदल, सतत होणारी चिडचिड, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, स्वातंत्र्य हवेहवेसे वाटणे, स्वतःची ओळख करण्याची इच्छा हे या कुमारवस्थेतील मुलांमध्ये सुरू असते पालकांना या मुलांशी कशी वागावे कळत नसते ही पालकांची व्यथा तर दुसरीकडे या कुमारवस्थेतल्या मुलांची वेगळीच व्यथा असते.
माझ्यावर एवढे लक्ष का? माझ्या मित्रमैत्रिणींच्याबद्दल सांगायलाच हवे का? ही तगमग असते. तर याच वयात ही मुले शारीरिक बदलांमुळे त्रस्त असतात. मनात असंख्य गोष्टींचे कुतूहल असते नक्की काय करायचे हेच कळत नाही. जगातील प्रत्येक कुटूंबातील मुलांना वाटते आम्हांला समजून घ्या. प्रत्येकाचे व्यतिमत्व, कुटुंब, आर्थिकपातळी वेगवेगळी असते त्यानुसारच त्यांची बैठक तयार होत असते. मुलांवर बंधने लादली तर ती बंडखोर बनतात, म्हणून तर सर्वच मुले या बदलाला सामोरे जाताना नकळत चुका करत जाताना यासाठी पालक-मुलगा यामध्ये सुसंवाद हवाच कठीण आहे पण गरजेचे ही आहे.
त्यामुळे आयुष्यात घडलेली कोणतीही गोष्ट ते आपल्यालाच येवून सांगतील वाईट कृत्य करताना प्रथम विचार करतील, खरतर मुले आपल्याशी बोलत असतात त्यांच्याशी नजरेला नजर देवून बोलायला हवे पण केवळ होय-नाही या संवादामुळे त्यांच्या मनातील प्रश्न सुटणार नाहीत संवादामुळे पालकांना आपल्याशी बोलण्यात रस आहे हे कळेल. बोलताना हिणवून बोलणे, टीका करणे टाळले पाहिजे ती व्यक्तिमत्वात हे दोष दिसून येतात. मुले बालगुन्हेगारीकडे वळतात, त्यांची संगत कशी आहे हे ही पडताळून पाहणे क्रमप्राप्त पण सुसंवाद असेल तर ती आपणहून माहिती पालकांना देतात.
घरातील अनावश्यक शिस्त व अति स्वैरपणा ही मुलांच्या गैरवर्तनास कारणीभूत ठरू शकतो, घरातील विविध संघर्षाचाही मुलांच्या वाढीवर परिणाम होतो व मुलांचे मानसिक आरोग्य बिघडते. कुटुंबात या अवस्थेतील मुलांना प्रेम, जिव्हाळा, आपुलकीचा अभाव असल्यामुळे मुले बाहेर आकर्षित होतात व ह्या समस्या उद्भवतात. घरातील एखाद्या विषयावर चर्चा करताना त्यांनाही सामावून घ्यायला हवे घरात माझ्याही मनाचा कोणीतरी विचार करत आहे मला ही घरात स्थान आहे हा विश्वास निर्माण होईल व घराशी ती जास्त जोडली जातील अन् अशा विकृत समस्यांना थारा ही मिळणार नाही.
घरातील तणावपूर्वक स्थितीत ही ह्या वयातील मुलांत तसाच संवाद ठेवायला हवा विनाकारण व्यक्त न करता कदाचित रागाच्या भरात आपल्याला सुचणार नाही असा चांगला विचार ही मुले देवून जातात. आर्थिक कौटुंबिक स्थितीचा परिणाम ही या मुलांवर होते ती गैरवर्तन करतात घरातील वातावरण मोकळे असायला हवे त्याबरोबर शिस्त ही हवी पण धाक नसावा, भीती असावी पण ती आदरयुक्त असावी तरच ती मुले संवाद साधतात शब्दांबरोबरच स्पर्शाची भाषा ही कधी कधी एक पालक म्हणून मुलांना उमेद देवून जाते.
आपल्या ही चुका मुलांसमोर आपल्याला मान्य करता यायला हव्यात आपल्याविषयी अजूनच आदर निर्माण होईल. पौगंडावस्थेत त्यांचे व्यक्तिमत्व आकार घेत असते. त्यांना कमी न लेखता त्यांच्या मतांना मांडण्याची संधी द्यायला हवी. आपल्या त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत हे जाणून समजावून सांगितले तर कोणतीही कृती, कृत्य करताना त्यांचे मन धजावणार नाही, ते सारासार विचार करतील, प्राधान्यक्रम ठरवतील.
आपले मूल आपल्याला जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा मौल्यवान आहे हे पालक म्हणून मुलांना दाखवले तर त्यांचे पडसाद मुलांवर पडतील मग बघा ती आपल्या कशी जवळ येतील, मोकळी होतील, सद्सद् विवेकबुद्धीने कोणतेही कृत्य करताना सारासार विचार करतील. पालक मुलगा संवाद केवळ पौगंडावस्थेतच नाही तर त्यांच्या भावी आयुष्याची बैठक तयार करतील वयाच्या प्रत्येक टप्यावर ते विचार करतील अन वार्धक्यात आपलेच पुन्हा पालक होतील. मग ते ही म्हणतील वाद नको संवाद हवा पण तो सुसंवाद हवा मग ते तो आपल्या बरोबर येणाऱ्या प्रत्येकाबरोबर अनुभवातील त्याची त्यांना सवय होईल. शेवटी संवाद एक कला..! त्यामुळे बऱ्याच समस्यांचं, गैरसमजाच निराकरण होवू शकते.
वयात येणाऱ्या मुलांना समजावून घेताना सुसंवाद हवा तरच या वादळी, नाजूक, अशांत अशा वयाच्या वळणावर मुले सावरतील त्यांचे त्यांनाच कळेल आपल्या हातून घडणारी कृती योग्य की अयोग्य, प्रत्येकाचे वेगळे असते माझे मलाच फुलायचे आहे, बहरायचे आहे, सिद्ध करायचे आहे फक्त स्वतःसाठीच…! हे ही ते जाणतील मात्र हा विश्वास नव्हे; त्यांच्यातील आत्मविश्वास सुसंवादानेच साध्य होईल.
प्रत्येकाचे प्रश्न वेगळा उत्तरही वेगळे असते तरी अपायावर उपाय असतोच, मोहावर विचारांचा प्रभाव पाडता येतो हे जाणण्यासाठी आई-बाबांचा, मोठ्या माणसांचा सल्ला उपयोगी पडतो हे ही ते ओळखतील मग करू या का पुन्हा सुरुवात? जरा विसावूयात का या वळणावर…???
– मधुरा धायगुडे