पुणे – ताडासन (Tadasana yoga)हे करायला अत्यंत सोपे असे आसन आहे. यामध्ये आपल्या शरीराची स्थिती ताडमाडासारखी तसेच खजूर, नारळाच्या वृक्षासारखी होते. म्हणूनच याला ताडासन (Tadasana yoga) म्हटले आहे. मोकळ्या जागेत आजूबाजूला घाण नसलेल्या परिसरातील एक स्वच्छ जागा निवडावी. त्या जागी उभे राहावे. दोन्ही पाय जुळले असावेत.
गुडघ्यामध्ये ताठ उभे राहावे. प्रथम डावा हात खांद्याच्या रेषेत सरळ वर घ्यावा. मग उजवा हात खांद्याच्या रेषेत सरळ घ्यावा. दोन्ही हात कानाला लावून आकाशाकडे सरळ करावे. दोन्ही हात एकमेकांत गुंफून उलटे करावेत. म्हणजे गुंफलेल्या हाताचे तळवे आकाशाकडे करावेत. हे करताना बोटे एकमेकात गुंफलेलीच ठेवावीत. आता श्वास घ्यावा. म्हणजेच पूरक करावे. पूरक करत असताना, आपल्या छातीत श्वास भरुन घ्यावा. किंचित वेळ रोखावा आणि टाचा उचलाव्यात.
टाचा खाली घेताना सावकाश श्वास सोडावा. असे सात ते आठ वेळा करावे. ताडासना (Tadasana yoga) त शरीराच्या सर्व अवयवांना ताण मिळतो. त्यामुळे स्फूर्ती येते. शरीराची लांबी वाढते. आपले हात-पाय गुडघे जांघा, हातापायांची बोटे यांच्यामध्ये शक्ती येते. पोटाची चरबी कमी करण्यासाठीसुद्धा ताडासनाचा उपयोग होतो. काही वेळा खूप पोट सुटल्यामुळे पोटाचे स्नायू लोंबकळलेले असतात.
त्यामुळे पोटाला एकप्रकारचे जडत्व आलेले असते. अशावेळी नियमित ताडासन (Tadasana yoga) केल्यास पोटावर ताण येतो आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. ताडासना(Tadasana yoga) मुळे उत्साह वाटतो. शरीरात एकप्रकारचा आत्मविश्वास वाढतो. तसेच पोटातील पाचक ग्रंथींना योग्य प्रकारे चलन वलन होण्यास सुलभता येते. त्यामुळे पोट साफ होते. वारंवार अजीर्णौचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी ताडासन करावे. ज्यामुळे त्यांची अजीर्ण होण्याची सवय कमी होते. स्त्रींयानाही हे आसन अतिशय लाभदायक आहे.
मुख्य म्हणजे कंबर, गुडघे, मांड्या, छाती, खांदे, कोपर, मनगट आणि मानेतील सर्व स्नायू मोकळे होऊन जडत्व आलेले शरीर वेगाने काम करु लागते. योगासनामध्ये सर्व आसने झाल्यानंतर ताडासन करण्याची पद्धत आहे. ज्यामुळे शररीरातील अतिरीक्त ताण कमी होऊन शारीरिक हालचाली जोशपूर्ण होण्यास मदत होते. म्हणून प्रत्येकाने ताडासन करावे.
जसे दंडस्थितीत ताडासन करता येते तसेच शयनस्थितीतही ताडासन करता येते. शयनस्थितीमध्ये ताडासन करताना दोन्ही हात डोक्यावर समांतर रेषत ठेवावेत, दोन्ही पाय जुळवून घ्यावेत. श्वास घेत पाय आणि हात ताणावेत आणि श्वास सोडत ते ढिले सोडावेत. हीच क्रिया हात एकमेकात गुंफून करता येते. श्वास घेतल्यानंतर तो क्षणभर रोखून कुंभक करावा आणि मग तो सोडावा.
शयनस्थितीतील आणि दंडस्थितीतील ताडासन करण्याची पद्धती सारखीच आहे. फक्त एकदा उभं राहून आणि झोपून हा फरक आहे. शयनस्थितीतील ताडासनामुळे आपल्या नाभीभोवतीचे स्नायू गतिमान होतात. त्यांची कार्य करण्याची क्षमता वाढते. तसेच रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते.
स्पॉडिलायटीससाठी शयनस्थितीतील ताडासन अतिशय उपयुक्त आहे. तसेच खूप कंबरदुखीवर शयनस्थितीतील ताडासनाचा चांगला फायदा होतो आणि कंबरदुखी थांबते. म्हणूनच प्रत्येकाने दंड आणि शयन अशा दोन्ही स्थितीत ताडासन रोज सात ते आठ वेळा शास्त्रीय पद्धतीने तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला करावे. नंतर हळूहळू सरावाने आपण आपले करू शकतो.
हे आसन नियमित केल्यामुळे लहान मुलांची उंची वाढते. म्हणून ज्यांची उंची वाढत नसेल त्यांनी रोज हे आसन करावे. त्याचप्रमाणे कंबरेच्या स्नायूंना चांगला योग्य ताण मिळत असल्यामुळे कंबरदुखी थांबवणारे हे आसन स्त्रियांमध्ये जास्त लोकप्रिय आहे.
– सुजाता टिकेकर