डॉ विनोद आर पाटील, हेमेटोलॉजिस्ट, हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण चिकित्सक, ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर, सातारा
जेव्हा घरातल्या एखादया लहानग्याला कर्करोगाचे निदान होते तेव्हा संपुर्ण कुटुंबावर एक प्रकारचे संकट कोसळते. जगभरात कॅन्सरच्या रूग्णांची संख्या वाढतेय. गंभीर बाब म्हणजे लहान वयातील मुलांमध्येही कॅन्सरचं वाढतं प्रमाण पाहायला मिळतंय. जागतिक बाल कर्करोग दिनाच्या निमित्तानं जाणून घ्या लहान मुलांच्या कॅन्सरबाबत. प्रौढ व्यक्तींमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरपेक्षा बालकांतील कॅन्सरमध्ये त्याच्या पेशींचे स्वरूप व लक्षणे यांत भिन्नता असते. तसेच प्रौढ व्यक्तींमधील कॅन्सरपेक्षा बालकांतील कॅन्सर झपाटय़ाने वाढतात, शरीरात जलद फैलावतात, मात्र केमोथेरपीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. वेळीच निदान झाल्यान लहान मुलांमधील कर्करोग पुर्णपणे बरा होऊ शकतो.
जगभरात सुमारे 90 हजार मुले ही कॅन्सरने दगावत आहेत. तर 1 लाख 60 हजार नव्या केसेस समोर येतात. दर दहा लाख मुलांमागे भारतामध्ये 38 ते 124 मुलांना कॅन्सर होतो. कॅन्सरचे प्रमाण भारताच्या विविध भागामध्ये वेगवेगळे आहे. रक्ताचा कॅन्सर हा सर्वात जास्त प्रमाणात आढळतो (25 ते 40 टक्के). रक्ताच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी रक्ताच्या काही तपासण्या जसे की सीबीसी आणि पेरिफेरल स्मिअर उपयुक्त ठरतात. बहुतांश वेळा या रुग्णांना बोन मॅरोची तपासणीही करावी लागते. कॅन्सर शरीराच्या ज्या स्थानी निर्माण होतो त्यानुसार लक्षणे निर्माण होतात. सामान्यत: यात डोळ्याच्या, हाताच्या व संपूर्ण शरीराच्या अनियंत्रित हालचाली, मज्जारज्जूवर दाब आल्याने निर्माण झालेला पक्षाघात, पोट फुगणे, जुलाब होणे, ताप ही लक्षणे निर्माण होतात. शस्त्रकर्म, केमोथेरपी व रेडिओथेरपी या चिकित्सापद्धतींच्या साहाय्याने या कॅन्सरची चिकित्सा केली जाते.
मुलांना लहान वयात कॅन्सर होणे असाधारण असते. यामुळे शरीरातील रक्तावर, स्नायुंवर आणि हाडांवर आणि इतर अवयवांवर परिणाम होतो. ताप येणे, वजन कमी होणे, रक्त कमी होणे, शरीरात गाठी येणे, लाल डाग येणे, पोट फुगणे इत्यादी. अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या बालरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा. बालरोगतज्ज्ञ या लक्षणांच्या आधारावर योग्य ते तपासणी करून आपणास मार्गदर्शन करतील. रक्ताचा कर्करोग (ल्युकेमिया आणि लिम्फोमा) सर्वांत जास्त प्रमाणात आढळतो. या व्यतिरिक्त मेंदूचा, मुत्रपिंडाचा, यकृताचा, हाडांचा असे इतर अवयवांचाही कर्करोग होऊ शकतो. रेटायनोब्लास्टोमा हा डोळ्यांमध्ये होणारा टय़ूमर असून ४० टक्के बालकांत हा आनुवंशिक म्हणजे विशिष्ट जनुकांतील बदल म्हणजे म्युटेशन झाल्यामुळे निर्माण होतो. यात डोळे लाल होणे, दृष्टी मंद होणे, डोळ्यावर पांढरा पापुद्रा येणे ही लक्षणे दिसत असून उग्र स्वरूप धारण केल्यास हा टय़ूमर अस्थी व अस्थिमज्जेत पसरतो.
ऑस्टियोसार्कोमा हा अस्थींमध्ये निर्माण होणारा टय़ूमर असून सामान्यत: १० वर्षांपुढील बालकांत अधिक आढळतो. अस्थींवर सूज किंवा अर्बुद स्पर्शगम्य होणे, अस्थी दुखणे, कोणत्याही आघाताशिवाय अस्थिभंग होणे ही या प्रकारच्या कॅन्सरची लक्षणे असून सामान्यत: हा कॅन्सर बळावल्यास फुप्फुसात पसरण्याची संभावना असते. शस्त्रकर्म व केमोथेरपीच्या साहाय्याने हा कॅन्सर आटोक्यात ठेवता येतो. ऑस्टियोसार्कोमा झालेल्या बऱ्याच रुग्णांत कॅन्सर व्यक्त होण्यापूर्वी त्या स्थानी मार लागल्याचा इतिहास आढळतो. इविगन्स टय़ूमर हा ही ऑस्टियोसार्कोमाप्रमाणे अस्थींचा कॅन्सर असला तरी त्याच्या मूलपेशी ऑस्टिओसार्कोमापेक्षा भिन्न असतात. हिपॅटोब्लास्टोमा हा यकृतात निर्माण होणारा टय़ूमर सामान्यत: पाच वर्षांखालील बालकांत, जन्मत: कमी वजनाच्या बालकांत व हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह असलेल्या बालकांत होण्याची संभावना अधिक असते. यात पोटात उजव्या बाजूला गाठ जाणवते व कॅन्सर बळावल्यास भूक मंदावणे, उलटय़ा, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात.
मुलांमध्ये आणखी एक सामान्य कर्करोग म्हणजे ब्रेन ट्यूमर. हा एक गैरसमज आहे की मेंदूचा कर्करोग असणारी व्यक्ती मतिमंद होतात. कॅन्सर झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे मुलांचा कॅन्सर बरा करण्याच्या टप्प्यांमध्ये मुलांमधील कुपोषण हे आव्हान आहे. लहान मुलांमधील कॅन्सरवर उपचार करताना रुग्णालयामध्ये आता इम्युनथेरपीचा वापर प्रभावीरित्या केला जात आहे. यामध्ये मुलांमध्ये कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. लहान मुलांवर विविध प्रकारच्या औषधांचा वापर सातत्याने केला जात नाही. आता उपलब्ध असलेल्या औषधांच्या प्रभावी वापरामुळे कॅन्सरवर मात करणे शक्य झाले आहे. पहिल्या पाच वर्षांमध्ये कॅन्सर पुन्हा उद्भवला नाही तर मूल कॅन्सरमुक्त झाल्याचे वैद्यकीय निदान करण्यात येते.
केमोथेरपी, सर्जरी आणि रेडिएशन थेरपी यांचा समावेश असतो. कर्करोगाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या थेरपी कराव्या लागतात. केमोथेरपी हा ब्लड कॅन्सरचा मुख्य उपचार आहे. यामध्ये वेगवेगळ्या औषधांचे सायकल्स / फेजेस असतात आणि प्रत्येक रुग्णांसाठी विशिष्ट प्रोटोकॉल तयार केला जातो. इतर प्रकारचे कॅन्सरसाठी ऑपरेशन किंवा रेडिएशनची देखील आवशकता असते. प्रत्येक थेरपी ही विशिष्ट वेळेवर केली जाणे आवश्यक असते.
खराब प्रकारच्या आणि पुन्हा उद्भवणाऱ्या रक्ताच्या कर्करोगामध्ये बोन मॅरो ट्रांसप्लांट ही प्रभावी उपचारपद्धती आहे. बोन मॅरो हे हाडांच्या पोकळीतील पेशीजाल आहे. त्यात रक्त निर्माण करणाऱ्या पेशी असतात. बोन मॅरो शरीरात सातत्याने रक्तांची भरपाई करीत असते. शरीरातील रक्तपेशींची निर्मिती बोन मॅरोत होते. बोन मॅरो हा रक्त मातृक पेशींचा उत्तम साठा मानला जातो. रक्ताचा कर्करोग वा तत्सम रोगांमध्ये होणारे “बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ हे या तत्त्वावर आधारित असतात