अध्वासन हे शयनस्थिती, विपरीत शयनस्थिती आणि दंडस्थितीमधेही करता येते. हे आसन सोपे वाटते; परंतु ताणात्मक आसन आहे. प्रथम दोन्ही पाय जुळवून उभे राहावे. हाताचे तळवे मांडीला टेकवून ताठ उभे राहावे. हळूहळू श्वास घेत दोन्ही हात बाजूने वरच्या दिशेला न्यावेत. हाताचे तळवे समोरच्या बाजूला येतील. दोन्ही दंड दोन्ही कानांना टेकलेले असावेत. हाताचे कोपरे ताठ असावेत. दोन्ही हाताचे अंगठे एकमेकाला जुळवावे. ( yoga and fitness )
नजर स्थिर ठेवावी आणि श्वास घेत घेत हात वरून पाय खालून ताणावेत. नंतर श्वास सोडत शरीर सैल करा. शक्य तेवढा वेळ आसनस्थितीमध्ये ताणलेल्या स्थितीत राहावे. एखाद्या रबराप्रमाणे आपल्या शरीराची आवस्था आपण करत असतो. रबर जसे जेवढे ताणू तेवढे ते मजबूत होते. तसेच आपण आपले शरीर दंड, शयन आणि विपरित शयनस्थितीमध्ये श्वास घेत घेत भरपूर ताणावे. ताणक्रम हा हात वरून पाय खालून म्हणजेच शरीराचे दोन भाग करून ताणस्थिती घ्यावी. तसेच ताण सोडताना श्वास सोडत सावकाश रिलॅक्स व्हावे. त्यावेळी श्वसन संथ सुरू ठेवावे. ( yoga and fitness )
आसन सोडताना हात बाजूने खाली घेत पूर्वस्थितीमध्ये यावे. कोणी कोणी भिंतीच्या आधाराने उभे राहून ताण घेतात. तीनही स्थितीतील अध्वासनाचा सराव योग्य योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा. या आसनाचे अनेक फायदे आहेत. शरीर व मनाचा ताण जातो. एकाग्रता, स्मरणशक्ती वाढते. रक्ताभिसरण चांगले व्हायला व पोटाचे विकार बरे करून पचनशक्ती उत्तम करण्यास हे आसन उपयोगी आहे. संपूर्ण शरीराला ताण बसत असल्याने रक्तप्रवाह सुधारतो, रक्तदोष कमी होतात. ज्यांना रक्त पातळ होण्यासाठी गोळी घ्यावी लागते त्यांनी हे आसन नियमित करावे. रक्तदोष जाण्यास मदत होते. ( yoga and fitness )