माझ्या क्लिनिकमध्ये परवा एक आई आपल्या 22 वर्षाच्या मुलीला घेऊन आली. तिची तक्रार होती की तिच्या मुलीचे वजन खूप जास्त आहे. या आधी त्यांनी यासाठी डॉक्टरना दाखवून आणले होते. डॉक्टरनीसुद्धा सुज्ञपणे त्यांना सल्ला देऊन सर्व रक्ताच्या तपासण्या करून घेतल्या, ज्यात तिचे थायरॉईडसारखे रिेपोर्टसुद्धा नॉर्मल होते. त्यामुळे औषध उपचारांची गरज नव्हती. तिचे कॅल्शियम आणि ड जीवनसत्व रिपोर्टमध्ये कमी होते. म्हणून डॉक्टरांनी तिला कॅल्शियमची पावडर दिली.
इथपर्यंत सगळे बरोबर चालले होते. पण तिचे वजन कमी होण्यासाठी तिला रात्रीचे जेवण नुसते सलाड व फळे असे चालू केले. हे मात्र खूप घातक आहे. जेवणासंदर्भात एक डॉक्टर काम करतात; ते म्हणे आहारतज्ञ. त्यांच्याकडे जर गेलात तर कोणत्या वयाच्या लोकांनी काय व कसे खावे याचा अभ्यास पूर्ण सल्ला तुम्हाला मिळेल. कारण त्यांनी त्याच गोष्टींचा अभ्यास केलेला असतो जसा डॉक्टर गोळ्या औषधांचा करतात.
ही गोष्ट मुलांच्या बाबतीत पण आवश्यक आहे. वरच्या उदाहरणाचा विचार करुया. त्या मुलीचे वजन जास्त होते या मुद्याकडे जितके लक्ष द्यायला हवे तितके तिची उंची कमी आहे, याकडे द्यायला हवे. त्याचे कारण असे होते की कॅल्शियम आणि ड जीवनसत्व कमी होते. आणि म्हणून तिची वयाप्रमाणे उंची वाढत नव्हती. आणि जेव्हा मी तिची आहाराची उजळणी घेतली तेव्हा लक्षात आले की, आहारात प्रथिनांची खुपच कमतरता आहे. आणि म्हणूनच डॉक्टरनी दिलेल्या कॅल्शियम पावडरचा पण उपयोग होत नव्हता.
कारण कॅल्शियम पोटातून रक्तात जाण्यासाठी प्रथिनांची गरज असते. आणि तीच तिच्या आहारात कमतरता होती. अशा परिस्थितीत जर तिचे एक वेळचे जेवण कमी केले तर अजूनच प्रथिने कमी झाली असती आणि उंची वाढलीच नसती आणि वजन अजून जास्त असल्यासारखे दिसले असते. म्हणून आपल्या व मुलांच्या आहारात बदल हा डोळसपणेच करायला हवा. मुलांच्या सगळ्याच वाढीवर खाण्याचा परिणाम होत असतो.ती काय व कसे खातात याचा त्यांच्या पूर्ण विकासावर परिणाम होत असतो.
मुले किती खातात यापेक्षा ते काय व कसे खातात हे जास्त महत्वाचे असते. डाळी व कडधान्ये किती खाल्ली जातात, याकडे पालकांनी लक्ष द्यावे. नुसती पोळी-भाजी खाऊन प्रथिने मिळत नाहीत. पोळी बरोबर किंवा भाताबरोबर जेव्हा डाळ किंवा कडधान्य खाल्ले जाईल, तेव्हाच प्रथिने शरीराला मिळतात. मुलांच्या महत्वाच्या खाण्यातून तरी प्रथिने मिळतील, अशी योजना केली पाहिजे.
मुलांचे वजन कमी करण्यासाठी अतिशय डोळसपणे खाण्याच्या सवयी बदलायला हव्यात. मोठ्यांप्रमाणे आपल्याच मनाने कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नये. त्या कमी खाण्यातून प्रथिने, लोह, कॅल्शियम व इतर जीवनसत्व शरीरात कमी जातात व त्याचे दूरगामी परिणाम मुलांच्या बौद्धिक व शारीरिक वाढीवर होतात. मोठ्या लोकांनासुद्धा हेच सूत्र लागू आहे की, कमी खाण्याने वजन कमी होत नाही तर नुकसान होते.
मुलांच्या बाबतीत अजून प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे की, दुधाला दिलेले अवाजवी महत्व. बरेच पालक मुलांना दोन वेळा भरपूर दूध प्यायला देतात आणि मुले जेवायच्या वेळी जेवत नाहीत, अशी तक्रार करतात. जर लिटरभर दूध पोटात जात असेल, ते पण म्हशीचे, तर मग भूक कशी लागेल? शिवाय दूधातून सगळेच अन्नघटक मिळत नाहीत. बऱ्याच पालकांना असे वाटते की, खूप दूध पिले की, प्रतिकार शक्ती वाढते. परंतु फळे-भाज्या-डाळी-कडधान्ये यातून जे अन्नघटक मिळत तेसुद्धा गरजेचे असते. सर्व गोष्टी योग्य प्रमाणत मिळायलाच हव्यात. आपण जे खातो तसे आपण असतो. हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपण लहानपणापासून जे खातो तसे आपण आयुष्याभर असतो, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
म्हणूनच लहान किंवा मोठे, सगळ्यांनीच आपला आहार कसा आहे, तो कसा असायला हवा, आणि त्यात बदल करताना नेमके कोणते बदल करावेत व त्या बदलांनी काय परिणाम होऊ शकतात, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मगच काय ते ठरवावे. मदतीसाठी अभ्यासू आहारतज्ञ आहेतच मार्ग दाखवायला, त्यांचा नक्की सल्ला घ्यावा. हल्ली सगळ्यांना झटपट हवं असतं सगळंच. जस झटपट वजन वाढत तसं ते झटपट कमी करण्याची आत्यंतिक घाई असते. ते का वाढलंय कशामुळे वाढलंय याचा विचार केलाच जात नाही. मग लोक त्यासाठी काही पण करायला तयार असतात.
अगदी भरपूर पैसे खर्च करून कोणतेही प्रोडक्ट सुद्धा खायला तयार असता. परंतु हे सगळं करताना हा विचार केला जात नाही की, आपण आपल्या शरीराची हेळसांड करतोय. शरीर एक प्रकारच यंत्रच आहे की ज्यात सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. सगळी संप्रेरके आपली कामे नीट करत असता. परंतु आपण शरीरात अनैसर्गिक काहीतरी ढकलतो आणि त्याचा परिणाम शरीराच्या अंतर्गत यंत्रणेवर होतो. पण आपण वरकरणी विचारात गुंग असतो. अक्षरशः “हे करून पाहू; ते करून पाहू’ म्हणून नेटवर सर्च करून क्रश डाएट करायचा किंवा कोणते तरी शेक तरी घ्यायचे. यांनी सहा महिने वजन कमी झाल्यासारखे वाटते. पण काही महिन्यांनी हा डाएट सोडला जातो. मग दुपटीने वजन वाढ होते.
आपले शरीर हे सगळ्या नैसर्गिक गोष्टी जास्त चांगल्या पद्धतीने पचवून त्यातून पोषण नीट मिळवू शकते; कारण तशी आपली शरीर रचना आहे. हे हल्ली न जेवता शेक घेण्याचे वाढलेले प्रमाण शरीराचे जास्त नुकसान करत आहेत. तो शेक जितक्या किंमतीचा आहे त्यापेक्षा निम्या किमतीत भाज्या फळे डाळी मिळतील व आरोग्य नीटच राहील. त्यासाठी शेक घ्याची गरजच नाही. त्याचा त्या चवीची सिंथेटिक पावडर रोज खाण्यापेक्षा रोज रुचकर व नैसर्गिक आहार जास्त निरोगी ठेवेल.
सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की, आहारासंदर्भात जे लोक गोड बोलून वेगवेगळ्या पावडरी विकतात ते खरंच आहारशास्त्रात पारंगत आहेत का? त्यांनी त्याचा काही आभ्यास केला आहे का? आहारशास्त्राची त्यांना कोणती पदवी आहे का? याची खात्री करून घ्या. केवळ तुमच्याकडे पैसे आहेत आणि त्यांना पैसे मिळवायचे म्हणून, कोणीही उठून तुमच्या शरीराची हेळसांड करतं, असं कसं चालेल?
पचन संस्था, यकृत, थायरॉईड ग्रंथी, आपले हार्मोन्स या सगळ्यांच्या रक्तातील पातळीवर आपली बरीचशी स्वभाव वैशिष्ट्य अवलंबून असतात. माणूस हा रसायनांनी बनलेला आहे. या रसायनात अनेक घटक असतात. हे घटक आपल्याला अन्नातून मिळतात. म्हणून जर आपला आहार चांगला व पूर्ण असेल तर आपल्यातले एक विक्षिप्तपण कमी होऊ शकते. अन्नातून मिळणाऱ्या या घटकाचा वापर करून शरीराची बांधणी उभारणी सतत चालू असते.
म्हणून एक दिवस पूर्ण आहार घेऊन चालत नाहीं; तर नेहमीच पोषणमूल्य असणाऱ्या आहाराचा विचार करत राहावा लागतो. कधी कधी आपल्याला खूप उल्हासित वाटते तर कधी कधी सगळे चांगले चालले असूनही आपल्याला उदासवाणे वाटत असते. ते यामुळेच. तेव्हा आपण पडताळा करून पाहावा की, आपल्या आहारातून काही कमी जातंय का? त्यासाठी आहार नेमका कसा असावा, कोणते घटक असावेत, याची माहिती करून घ्यावी. प्रत्येकाच्या शरीराप्रमाणे घटकांची मागणी वेगवेगळी असते हे समजून घ्यावे. व्यवस्थित खाल्याने आपल्या स्वभावातील दोष सुद्धा नाहीसे होऊ शकतात.
शेवटी आपल्या समाजाला पर्यायाने आपल्या स्वतःला आपणच वाचवू शकतो ते फक्त चांगली पोषणमूल्य असलेल्या आहाराने. मग कमी वेळात पौष्टिक खाद्य पदार्थ बनवण्याचे कौशल्य आत्मसात करुया आणि आपल्या पुढच्या पिढीला बनवूया चांगल्या स्वभावाचा चांगला नागरिक! चला तर मग…
– श्रुती देशपांडे