करोना चीनमध्ये आला व साऱ्या जगाचे कुतूहल जागे झाले. चिनी माणसे संक्रमित होत होती, झुंजत होती व मरत होती व तसे व्हिडिओ सोशल मीडिया व मोबाइलच्या माध्यमातून जगभर फिरत होते. पोलादी पडद्याआड जे काही चालले आहे याचे आपापल्या परीने चित्र रंगविण्यात जगातला तमाम मीडिया गुंतला होता…
चीनला शिव्या घालत संपूर्ण जग गाफिल होत. भारतासहित फ्रान्स, इटली, स्पेन, ब्रिटन असे युरोपियन देश, इराणसह काही आखाती देश व अमेरिका देखील अलगद करोनाच्या सापळ्यात अडकले. हा विषाणू भयंकर आहे व तो माणसांच्या माध्यमातून झपाट्याने पसरतो. त्याचे परिणाम या क्षणी जग भोगत आहे.
एव्हाना एका मोठ्या संकटाची चाहुल गाफील जगाला लागली होती. आपल्या भोवती आवळल्या जाणाऱ्या करोना पाशापासून स्वत:ला अलिप्त ठेवण्याची धडपड सुरू झाली होती. बेसावध सावज अलगद जाळ्यात सापडावे असेच या सर्व देशांचे झाले. आजदेखील हजारो निरपराध माणसे मरत आहेत. एकूण मृतांचा आकडा काही केल्या कमी होत नाही.
प्रगत असणारे फ्रान्स, इटली, स्पेन, इराण, ब्रिटन, अमेरिका आदी बलाढ्य देश करोनाचा निशाणा झाले. किड्या मुंग्यासारखी माणसे बळी पडायला लागली. आकडे शेकड्यांवरून हजारांवर व हजारांवरून लाखांवर कधी गेली ते कळलेच नाही. जे गुर्मित होते ते आता हतबल झाले होते. सगळ काही आऊट ऑफ कंट्रोल होत होतं. यानंतर अक्राळ विक्राळ होत चाललेले आर्थिक संकट जगापुढे एक मोठे आव्हान निर्माण होत होतं. करोनापेक्षा भयानक आर्थिक मंदीचा सामना जगाला करावा लागणार.
जगात या घडामोडी होत असताना भारत मात्र काहीसा आधीच सावरला. इथले जागरूक नागरिक दुष्परिणाम ओळखून होते. पंतप्रधान मोदी यांनी आवाहन करताच एक दिवसाचा कडकडीत बंद पाळून लोकांनी करोना विरोधी लढाईत सक्रिय सहभाग नोंदवला होता.
केंद्र व राज्य सरकारे मिळून संकटाचा सामना करण्यास सरसावली. लॉकडाऊन फेज वन सुरू झाले. 25 मार्च ते 14 एप्रिल 2020. जगाच्या तुलनेत आपल्या देशात रोगाचा प्रसार खूप कमी होता. सगळं काही नियंत्रणात आहे असे देशाला वाटत असताना तबलिगी जमातीच्या लोकांनी दिल्लीला धार्मिक सभा घेऊन सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फेरलं. शेवटी ज्याची भीती होती तेच झाले. परिस्थिती गंभीर झाली.
लॉकडाऊन फेज-2 आले. 14 एप्रिल ते 3 मे 2020. वारंवार पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना आवाहन करीत आहेत. मध्यमवर्ग घरात आहे पण काही समाजकंटक अजूनही रस्त्यावर उतरून पोलिसांच्या संयमाची परीक्षा घेत आहेत. वाढलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनता भरडली जात आहे. रोज कमावून खाणाऱ्यांना हे लॉकडाऊन कधी संपतेय असे झाले आहे. बाहेर करोना विषाणू व घरात उपासमार अशी ही कात्री आहे.
कर्फ्यू लावले जात आहेत. पण जरा ढील मिळाली की खरेदीसाठी झुंबड उडत आहे. सोशल डिस्टन्स काटेकोरपणे पाळले जात नाहीत. अशा लोकांना संक्रमणाची भीती अधिक आहे. पण आता अशा समाजकंटक लोकांचे करायचे तरी काय? हा प्रश्न बिकट आहे. इमान इतबारे घरात कोंडून घेतलेल्या असंख्य लोकांच्या त्यागावर अशी ही मूर्ख मंडळी पाणी फेरत आहेत. करोना संक्रमण लगेच लक्षात येत नाही तो पर्यंत रोगाने बाधित रुग्ण संपर्क चालूच ठेवतो. यामुळेच घरात राहून सुरक्षित कसे राहता येईल हा यक्ष प्रश्न आहे.
भरीसभर म्हणून काही मूर्ख लोक नर्स व डॉक्टरांवर हल्ले करीत आहेत. समजदार समाज शिल्लक राहिला नाही का? खरेच भीती वाटायला लागलीय… करोनावर लस येईल हा आजच्या घडीचा सर्वात मोठा आशावाद आहे. जगाचे लक्ष त्याकडे लागले आहे. त्यांना यश येईल पण… लाखो लोक तोपर्यंत आपल्यात असणार नाहीत, हे कटू पण सत्य आहे. आपल्या अवतीभवती कोण करोना पसरवत आहे हे कळणे गरजेचे आहे.
करोना रोखायचा कसा? ही रोज वाढणारी चिंता आहे. संपूर्ण लॉकडाऊन हा सध्यातरी केवळ एकमेव पर्याय आहे. सर्वांनी नीट समजावून घ्यायला हवे.
आता पुढे काय? एक मोठा प्रश्न… उत्तर कुणा एकाला न मागता आपण सर्वांनी मिळून शोधले तर? किती बरे होईल.
या संदर्भात काही सूचना-
1)शक्य त्यांनी आपापल्या घरून काम करावे व घरातच थांबावे.
2)विनापरवानगी व विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यास जबर दंड असायला हवा.
3)उत्तम वैद्यकीय सोयी व आरोग्य विमा आवश्यक करावा.
4) कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कडक व्यवस्था असावी व दंडाचे अधिकार स्थानिक प्रशासनाला असावेत.
5) सार्वजनिक ठिकाणे थुंकणे व घाण करणे हा राष्ट्रीय अपराध व्हावा व त्यासाठी दंड असावा.
6)करोना संपेपर्यंत जमावबंदी कायम असावी.
7)सर्वांजी समजुतीने वागून सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करावे.
मित्रांनो, आपल्या दाराबाहेर करोना आहे. मला काळजी नाही कारण माझे दार बंद आहे, आपला हा समज अत्यंत चुकीचा आहे. आपण सर्वजण जोपर्यंत सर्वांचे दार एकदम बंद करणार नाही तोपर्यंत करोना बाहेर असणारच आहे. तुमच्या घरात येण्यासाठी तो दबा धरून बसला आहे. त्याचा नायनाट करायला तर आपण सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. अगदी प्रत्येकाने संपूर्ण काळजी नाही घेतली तर तुमच्या गल्लीत व गावात आलेला करोना विषाणू प्रत्यके घरी पोहचणार यात दुमत नाही.
अशा कठीण समयी कुटुंबातील प्रत्येकाने एकमेकांना धीर द्यावा व यातून सर्वांना बाहेर काढण्यासाठी उपयोगी लस लवकरच तयार व्हावी अशी आपण एकत्र प्रार्थना करू या.
-विजय बिचेवार