माझी भाची अजिताच बाळ झोपलं होत म्हणून आम्ही हळू आवाजात बोलत होतो. 6-7 महिन्याचा तो चिमुकला जीव चांगली मॉलीश केलेली आंघोळ आणि दूध पिऊन शांत झोपला होता. त्या बाळाकडे पाहताना मला खरच अस वाटलं की, किती सुखी आहे हा जीव! त्याच्या भुकेची, झोपेची चिंता करायला अनेक माणसे आहेत. इथे सर्वजण मनापासून आणि आनंदाने ते करत आहेत आणि म्हणूनच तो जीव निश्चिंत आहे आणि शांतपणे झोपला आहे. बालपणीचा काळ सुखाचा खाणे-पिणे आणि नुसता झोपण्याचा असं वाटून गेलं मला. खरंच वय वाढलं की, माणसाची झोप कमी होते का? किंवा शांत झोप मिळत नाही का? तर खरंच आहे.
विद्यार्थी दशेत अभ्यासासाठी जागरणे करावी लागतात. झोपेतसुद्धा पेपर अवघड आहे आहे अशी स्वप्नं पडतात. नेमका ऑप्शनला टाकलेल्या विषयावर मोठे प्रश्न येतात. परीक्षेच्या, अभ्यासाच्या काळात खरंतर इतकी झोप येत असते पण डोळे चोळत चोळत अभ्यास पूर्ण करावा लागतो.
त्यानंतरच्या काळात नोकरीतील जबाबदाऱ्या, घरातील अडचणी, अपुरा वेळ, कधी जागेची अडचण, कधी काही या कारणाने नीट झोप होत नाही आणि जसं वय वाढत तसं वेळ असतो झोपायला पण निद्रादेवी काही प्रसन्न होत नाही. सहा तासांची सलग आणि शांत झोप लागेल तो दिवस भाग्याचा म्हणावा लागतो. खरं तर “झोपणे’ हा रोजचाच एक कार्यक्रम. पण प्रत्येक व्यक्तीची झोपण्याची पद्धत वेगळी, वेगवेगळी आणि जागाही ठराविक, पण काहींना कुठेही, कशीही झोप येते त्यांची वेळ झाली की, जिथे मिळेल तिथे झोपून जातात तर काही अद्ययावत खोलीत, सुंदर बिछान्यावरही तळमळत असतात.
बरेच जण झोपेत घोरतात काही बोलतात तर काही रडतातही. एकच क्रिया प्रत्येक जण किती वेगवेगळी करतो ना काहींना झोप घेण्यासाठी औषधे घ्यावी लागतात किंवा गोळी घ्यावी लागते. परंतु एखादे दिवस जरी झोप नीट झाली नाही तर दुसऱ्या दिवशी उठताना आळस येतो. उत्साह वाटत नाही. डॉक्टरदेखील बरे होण्याची लक्षणे म्हणजे चांगली भूक आणि चांगली झोप लागते का? असे विचारतात. ते जर असेल तर तुमची तब्येत चांगली आहे.
मानवी जीवनाचे, त्याच्या शरीराचे हे चक्र व्यवस्थित चालण्यासाठी “झोप’ ही अत्यंत गरजेची आणि आवश्यक अशी गोष्ट आहे. ती रोज नीट व्हायलाच हवी. माणसाच्या रोजच्या जीवनक्रमात “झोपेला’ खूप महत्त्व आहे आणि ती जर नीट झाली नसेल तर माणूस चिडचिडा होतो.
सगळ्यांवर “निद्रादेवी’ प्रसन्न असतेच असे नाही किंवा कधी काही अप्रिय घटनांनी, विचारांनी, दु:खाने मन व्यग्र असेल तर झोप येणार कशी? पर यावर एकच उपाय म्हणजे परमेश्वराला हात जोडून विनंती करायची आणि त्याचे नामस्मरण करतच झोपी जायचे…
– आरती मोने