पुणे – सोशल मीडियाच्या वापरात तरुणाई इतर वयोगटापेक्षा अग्रेसर आहे. वर्ष 2004 मध्ये स्थापन झालेलं फेसबुक त्याच वर्षीपासून लोकप्रिय व्हायला सुरुवात झाली. तसंच वर्ष 2014 च्या भारतातल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात महत्त्वाचा सोशल मीडिया म्हणून फेसबुकला महत्त्व आलं होतं. भारतात तरुणांची टक्केवारी जास्त आहे. त्यामुळे तरुण ज्या अजेंडाचा वापर करतात तोच अजेंडा वापरत ही निवडणूक यशस्वी झाली. आजची भारतीय तरुणाई फेसबुकविषयी काय सांगते, ते पाहणं, म्हणूनच रंजक ठरणार आहे.
तरुणांनी सोशल मीडियाकडे आव्हान म्हणून पाहिलं त्यांनी ते स्वीकारलं आणि आता त्यातून अनेक तरुण मंडळी रोजगार मिळवताना दिसत आहे. बदलत्या काळानुसार तरुण बदलले आणि रोजगार उभा केला. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून रोजगारच नाही तर प्रसिद्धीसुद्धा मिळवली. आपल्यात असलेले गुण, आपल्याला येत असलेली कला, शर्ट घडी करण्यापासून तर स्वयंपाकापर्यंतच्या गोष्टी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून शिकत आहोत.
अगदी लहानशा गोष्टीही आपल्याला प्रचंड मोठं करू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोशल मीडिया आहे. आपली मराठमोळी प्राजक्ता कोळी, भुवन भाम, मधुरा रेसिपी यांच्यासह अनेक लोक आहेत, जे आपलं कौशल्य सादर करून लोकांचं मनोरंजन करतात आणि रोजगार मिळवतात. आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी किती विनोदी असतात.
मात्र, आपण त्या गोष्टी विनोदी वृत्तीने घेत नाही. अनेक साध्या साध्या गोष्टींवर व्हिडियो करून युट्यूबवर प्राजक्ता कोळी पोस्ट करत असते. त्यातून ती किमान 4 ते 5 लाख रुपये महिन्याला कमावते, असं तिनेच इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये सांगितलं होतं. कमी वयात सोशल मीडियाच्या आहारी न जाता तिने सोशल मीडियाकडे एक संधी म्हणून पाहिलं, त्याचा हा परिणाम!
अगदी लहानापासून तर वयाची सत्तरी ओलांडलेल्या व्यक्तींपर्यंत सगळेच सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय असतात. नाते, मैत्री इथपर्यंत मर्यादित असलेला सोशल मीडिया आता राहणीमान बदलण्यापासून तर अजेंडा बदलण्यापर्यंत पोहोचला आहे. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि स्पर्धेत टिकण्यासाठी माणसाने अपडेट राहणं गरजेचंच आहे. मात्र त्याच्या आहारी जाणं तेवढंच धोक्याचं आहे.
आपल्यावर सोशल मीडियाचा प्रभाव
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. आपण कोणत्या बाजूकडे लक्ष केंद्रित करतो, त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. सध्याची तरुणाई सोशल मीडियासाठी जगताना दिसते आहे. याच माध्यमातून होणाऱ्या गैरसमजांचंदेखील प्रमाण जास्त आहे. सोशल मीडियावर आपण कशारीतीने अवलंबून आहोत. याचं उत्तम उदाहरण सोशल डायलीमा या डॉक्युमेंटरीमध्ये दिले आहे.
जेफ ओरलोस्की यांनी सोशल मीडिया आपल्यावर कसा प्रभाव करतो यावर आधारित एक “सोशल डायलेमा’ ही डॉक्युमेंटरी प्रदर्शित केली या माहितीपटाच्या आधारे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण फेसबुक असेल इन्स्टाग्राम असेल गुगल असेल किंवा जी कोणती समाज माध्यम आपण वापरतो त्या समाज माध्यम आपल्याला कशी स्वतःच्या विळख्यात कशी अडकवतात याची माहिती दिलेली आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि सोशल मीडिया
विशेष म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून समाज माध्यम वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची कशी एक सोशल प्रतिमा तयार केली जाते म्हणजे थोडक्यात आपण इन्स्टाग्राम वापरत असताना किंवा फेसबुक वापरत असताना आपल्याला कोणत्या प्रकारच्या जाहिराती दाखवल्या जातात, ही माहिती गुगलकडून घेतली जाते आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला ज्या गोष्टींमध्ये आवड आहे किंवा ज्या गोष्टी आपण मागच्या आपण काळात गुगलवर सर्च केलेल्या असतात, त्याच गोष्टी आपल्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ती कशाप्रकारे दिसतात यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स काम करतात. म्हणजे गुगलवर आपण जी माहिती सर्च करतो नेमकी त्याच माहितीची जाहिरात आपल्याला फेसबुक किंवा इन्स्टाग्राम असेल यासाठी हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स काम करत असते. मग अनेक सोशल मिडीया असा दावा करतात की ग्राहकांची माहिती आम्ही कधीच कुणाला देत नाही. मग जर ह्या अशा प्रकारच्या जाहिराती आपल्याला कशा काय दिसतात ह्यावर आपल्याकडे अभ्यास आणि जागृती होणे गरजेचे आहे.
वाईट गोष्टी पसरवणं गरजेचं आहे का?
“फेक न्यूज’ला घेऊन मागच्या काळात गुगल कडून देशभरात अनेक उपक्रम घेण्यात आले आहेत. कारण खोट्या माहितीचा प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून होऊ लागला आहे. त्यामुळे देशात मागील काळात अनेक घटना घडल्या आहेत. धुळ्यात मुलं पळवणारी टोळी समजून कामगारांची जमावाकडून केलेली हत्या असेल, किंवा महाराष्ट्राच्या पालघरमध्ये साधूंची झालेली हत्या असेल; अशा अनेक घटनांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या माहितीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अनेक वेळा सोशल मीडियाचा वापर हा राजकीय प्रचाराचे शस्त्र म्हणून केला जातो, सध्या कोणतीही निवडणूक ही आधी सोशल मीडियावर लढवली जाते, अनेक पक्षांचे समर्थक विरोधक यात उत्साहाने सहभागी होतात. यामुळेच राजकीय मतभेदांमुळे ट्रोलिंगच्या घटना आता सहज घडताना दिसतात, ह्यात जास्त प्रमाणात, महिला, पत्रकार, सरकार विरोधात भूमिका घेणारे कलाकार, अशा व्यक्तींना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं. यामध्ये अनेक वेळा एडिट केलेले खोटे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर ट्रोल आर्मीकडून व्हायरल केले जातात.
काय म्हणतेय तरुणाई?
गरवारे महाविद्यालयाचा संदेश जोशी म्हणतो की, सध्याच्या जगात सोशल मीडिया हे अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याइतकंच महत्त्वाचं साधन आहे. लॉकडाऊनच्या काळात हे महत्व अधोरेखित झाल्याचं आपल्याला दिसून येतं. सोशल मीडियाचे काम आता फक्त लोकांना जोडणे एवढेच राहिले नसून माहितीचे भांडार आणि व्यापार वृद्धीचे प्रमुख साधन म्हणूनदेखील त्याचा उपयोग होत आहे. ज्यांची कमाई ही कोटींमध्ये आहे, अशा मार्कस ब्राऊनली आणि टेक्निकल गुरुजी यांसारख्या यशस्वी यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सकडे बघितल्यावर हे कळतं. ही गोष्ट खरी आहे की सोशल मीडियाचा अति वापर अपायकारक आहे, पण त्याचा मर्यादित आणि सुयोग्य वापर ही आपल्या यशाची पहिली पायरी देखील ठरू शकतो हे आपण विसरायला नको.
… अखेरीस सायबर क्राईमविषयी
या सोशल मीडियाच्या अती वापरामुळे नव्या गुन्ह्यांची उत्पत्ती झाली. सध्या सायबर गुन्हे प्रचंड प्रमाणात दाखल केले जात आहेत. या माध्यमातून फसवणुकीचे किंवा ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले आहे.
सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे सांगतात की, एकट्या पुण्यात 2020 या वर्षात 14 हजाराहून अधिक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात अनेक प्रकारच्या सायबर गुन्हे आहे. सध्या सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारे फसवणुक केली जाते. या माध्यमांवर तरुण वेगवेगळे प्रयोग करतात. त्यातून फक्त चांगल्याच गोष्टीवर प्रयोग करतात असं नाही, त्यातून पैसे उकळण्याचाही त्यांचा हेतू असतो. त्यामुळे वैयक्तीकरित्या आपण सतर्क राहणं गरजेचं आहे.
सोशली फिट राहणं गरजेचंच…
माईंड सेट कोच पंकज भडागे म्हणतो की, आपण फिट राहण्यासाठी डायट करत असतो. मात्र, आता सध्या आपल्याला शारीरिकदृष्ट्या फिट राहण्यापेक्षा सोशली फिट राहणं जास्त गरजेचं आहे. मी माईंड सॅनिटायझिंग करतो. यात प्रत्येक पद्धतीच्या समस्येवर आपलं मन कसं काम करतं ते सांगत असतो. सध्या अनेक लोक सोशल मीडियावर जगतात. सोशल मीडियासाठी आपण आहोत की आपल्यासाठी सोशल मीडिया आहे, याची जाण असायला हवी. आपल्या सोशल मीडियाच्या अस्तित्वापेक्षा आपण प्रचंड चांगलं असतो. मात्र, आपण स्वत:ला आहोत तसं समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करत नाही, तर समाजानुसार आपण वागतो. त्यात आपण स्वत:ला हरवत चाललो आहेत. सोशल मीडिया आपलं अस्तित्व ठरवत नाही, त्यामुळे आता सोशल डायटची जास्त गरज आहे.
– शिवानी पांढरे