अपूर्ण बौद्धिक वाढ ही एक मोठ्या प्रमाणावर आढळणारी समस्या आहे. मतिमंदत्व म्हणजे 70 पेक्षा कमी बुद्ध्यांक. बुद्ध्यांक म्हणजे शारीरिक वय आणि मानसिक वय यांची तुलना. मानसिक वय भागिले शारीरिक वय, गुणिले 100म्हणजे बुद्ध्यांक. शारीरिक वय आपल्याला माहीत असते किंवा जन्मतारखेपासून काढता येते.
मानसिक वय काढण्यासाठी चाचण्या असतात. पण या बुद्ध्यांक चाचणीशिवायही अंदाजाने मुलाची मानसिक वाढ पुरेशी आहे की कमी आहे हे सांगता येते. आपल्या समाजात सुमारे तीन टक्के व्यक्ती मतिमंद असतात असे आढळून आले आहे. मतिमंदत्वाचे साधारण, मध्यम व अतिमतिमंदत्व असे तीन प्रकार पाडता येतील.
अपेक्षित मानसिक वाढीचा पाऊण हिस्सा, अर्धा हिस्सा, पाव हिस्साच मानसिक वाढ असेल तर अनुक्रमे साधारण, मध्यम व अतिमतिमंदत्व आहे असे म्हणता येईल. या गटवारीचा उपयोग त्याच्या उपचाराचा व शिक्षणाचा विचार करताना होतो. मानसिक अथवा बौद्धिक वाढ पडताळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आई-वडिलांना माहिती विचारणे. या पुस्तकात मुलांच्या आरोग्याच्या प्रकरणात विकासाचे टप्पे दिले आहेत.
हे टप्पे तसे आहेत की नाही हे पाहणे सोपे आहे. पाच वर्षे वयापर्यंत या तक्त्याचा उपयोग होईल. पाच वर्षावरील मुलांचा विकास लक्षात घेताना शाळेतली प्रगती व वर्तणूक यांवरून पडताळा घेता येईल. शारीरिक ठेवण काही मतिमंद मुलांची शारीरिक ठेवणही थोडी वेगळी असते.
अशी वैशिष्टये फक्त अति मतिमंद मुलांमध्येच ओळखू येतात. साधारण मतिमंद मुलांमध्ये फार वेगळेपण दिसून येत नाही. अति मतिमंद मुलांमध्ये चेहऱ्याची ठेवण, डोळे हे सूचक असतात. डोक्याचा आकार लहान-मोठा असणे, डोळे तिरपे, केस पिंगट, जाड मोठी जीभ, इत्यादी चिन्हे मतिमंदत्वाची सूचक असतात.
बरीच सौम्य-मध्यम मतिमंद मुले इतरांपेक्षा फारशी वेगळी दिसत नाहीत हे लक्षात ठेवले पाहिजे. मतिमंदत्वाची कारणे प्रसूतिपूर्व कारणे कुपोषित माता, गरोदरपणात चुकीची औषधे घेत राहणे, गरोदरपणातले काही जंतुदोष (उदा. सिफिलिस, गोवर), मद्यसेवन आणि पहिले मूल पस्तिशीनंतर होणे या काही कारणांमुळे मूल मतिमंद होऊ शकते.
यांतली बरीच कारणे टाळता येण्यासारखी आहेत. चांगली प्रसूतिपूर्व तपासणी आणि आरोग्यशिक्षण होणे महत्त्वाचे आहे.गलगंड असलेल्या मातेची मुले मतिमंद असण्याची शक्यता असते. प्रसूतिकालीन कारणे बाळंतपणात मूल गुदमरणे, बाळंतपणाला जास्त वेळ लागणे (उदा. मुलाचे डोके योनिमार्गात तासापेक्षा जास्त वेळ राहणे), बाळंतपणात डोक्याला (मेंदूला) इजा होणे,बाळाचे श्वसन लगेच चालू न होणे, बाळंतपणात अति रक्तस्राव होणे, इत्यादी गोष्टींमुळे झालेले मूल मतिमंद होऊ शकते. नुसते बाळ बाहेर काढणे यापेक्षा बाळंतपणात बाळ सुरक्षित असण्याला महत्त्व आहे.
बाळ सुरक्षित राहील, लवकर बाहेर पडेल व लवकर रडेल अशी सर्व काळजी घेणे आवश्यक असते. जन्मानंतरची कारणे कुपोषण, मेंदूला मार लागणे, गोवर, मेंदूज्वर, मेंदूआवरणदाह, कावीळ, अपस्मार (फिट्स), इत्यादी आजारांमुळे नंतर मतिमंदत्व येऊ शकते. उपचार मतिमंद मुलांना वाढवणे हे अगदी चिकाटीचे आणि सहनशीलतेचे काम आहे. हे करताना दोन उद्दिष्टे असतात. मतिमंद मूल स्वतः जास्तीत जास्त कायकाय करू शकेल ते ठरवून त्याप्रमाणे प्रशिक्षण देत राहणे. असे मूल कायकाय करू शकेल ते मतिमंदत्वाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
अति मतिमंद मुले स्वतः आंघोळ, मलमूत्रविसर्जन, जेवण व शारीरिक काळजी घेऊ शकली तरी त्या कुटुंबाची खूप मोठी सोय होते. मतिमंद मुलांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी करण्यासाठी जेवढे शक्य आहे तेवढे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करणे. या दोन्ही प्रकारचे प्रशिक्षण एकाच छपराखाली देण्यासाठी काही शहरांत मतिमंद मुलांच्या शाळा आहेत.
ग्रामीण भागातल्या मुलांसाठी मात्र अशी आज तरी काहीही सोय नाही. काही कार्यकर्त्यांना खास प्रशिक्षण देऊन, लहान प्रमाणावर प्रशिक्षण केंद्रे चालू करणे एवढे ग्रामीण भागात-निदान तालुक्याच्या ठिकाणी-शक्य होईल. या प्रशिक्षणात आई-वडिलांचा व इतर कुटुंबीय मंडळींचा फार महत्त्वाचा भाग असतो. प्रशिक्षणाचे तंत्र समजावून घेणे, मुलांच्या क्षमतेबद्दल अंदाज घेणे, प्रोत्साहन देणे, प्रेम आणि धीर देणे या सगळया गोष्टी घरातली मंडळी करू शकतात.
जवळपास प्रशिक्षण केंद्र नसल्यास घरातल्या मंडळींनी ही जबाबदारी प्रशिक्षण घेऊन पार पाडणे आवश्यक असते. मतिमंद मुलांना इतर शारीरिक आजार, अपघात होऊ शकतात. हे टाळण्यासाठी त्यांची योग्य काळजी, दखल घेणे आवश्यक आहे.
मानसिक आरोग्याच्या दृष्टीने गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांसाठी दहा सूचना लक्षात ठेवा : ही माणसे मनोरुग्ण असू शकतील- निरर्थक बोलणाऱ्या, विक्षिप्त वागणाऱ्या व्यक्ती, खूप वेळ व अवाजवी शांत राहणाऱ्या, इतरांशी मिळून मिसळून न वागणाऱ्या अबोल व्यक्ती, इतर लोक ऐकू व पाहू न शकणाऱ्या गोष्टींचा ज्यांना भास होत असेल अशा व्यक्ती, अतिसंशयी, सतत कपटकारस्थानाची चाहूल घेणाऱ्या व्यक्ती, अतिशय महवेतफ बोलणाऱ्या व वागणाऱ्या, बढाया मारणाऱ्या, अवास्तव हास्यविनोद करणाऱ्या व्यक्ती, सतत अतिदुःखी व रडत राहणाऱ्या व्यक्ती, आत्महत्येचा विचार बोलून दाखवणाऱ्या किंवा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती, अंगात येणाऱ्या व्यक्ती, झटके, बेशुध्दी येऊन खाली पडणाऱ्या व्यक्ती, मंद, अलिप्त दिसणाऱ्या, अपरिपक्व वाटणाऱ्या व्यक्ती. अशा व्यक्ती आढळल्यास त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे, डॉक्टरकडे पाठवण्याचा प्रयत्न करा, कुटुंबीयांना सावध करा व संयमाने शेवटपर्यंत पाठपुरावा करा.
मुलांच्या विकासाचे टप्पे वय विकासाचे टप्पे
4 महिने – मान धरणे
6 महिने – हाताचा आधार घेऊन बसणे
9 महिने ते 1 वर्ष – उभे राहणे, चालणे
9 महिने ते 1 वर्ष – काही शब्द वापरायला सुरुवात
1 ते 2 वर्षे – माणसे ओळखणे, चालणे, छोटी वाक्ये बोलणे, लाळ न गाळणे, सोप्या सूचना पाळणे, हाताने ग्लास धरून पिणे, निरनिराळे खाद्यपदार्थ ओळखणे. या वयात निरनिराळे रंग, वास, आवाज, स्पर्श यांची ओळख करून देणे 2-4 वर्षे – निरनिराळया सोप्या वस्तू ओळखणे, अन्न चावून खाणे, लघवी, शी करणे, इत्यादींबद्दल प्रशिक्षण देणे शक्य असते. घरातल्या कामात मदत करणे, उघड धोके टाळणे (आग) जर हातपाय दुबळे असतील तर हातपाय चोळून द्या. लाकडी गाडयाच्या मदतीने चालू द्या. या टप्प्यांशी संबंधित प्रशिक्षण देणे.
4-7 वर्षे – स्वतः आंघोळ करणे, कपडे घालणे, इतर मुलांबरोबर खेळणे, काही अक्षरे व अंक लिहिणे, सोपी वजाबाकी करणे. या टप्प्यांबद्दल प्रशिक्षण देणे. अशा विविध प्रकारांतून मतिमंद मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार करता येतात. अखेरीस तीही माणसेच आहेत आणि त्यांनाही साधेसोपे का होईना जीवन जगण्याचा अधिकार हा कायद्याने दिलेला आहेच, हे आपण विसरता कामा नये.
– डॉ. जयदीप महाजन