व्यक्ती लहान असो, तरुण असो किंवा वयोवृद्ध असो यांचे दात जर पांढरे शुभ्र असतील, तर ते बोलताना, हसताना समोरच्या माणसांवर नकळतच प्रभाव पाडून जातात. दातांमुळे व्यक्तिमत्त्वाची छाप समोरच्या माणसावर पडते. तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य तुमच्या दंतपंक्तींमध्ये लपलेलं आहे, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. जर आपली दंतपंक्ती पांढरी शुभ्र असेल, तर ते सौंदर्य अधिकच खुलून दिसते.
डॉ. एस. एल. शहाणे
प्रत्येकाला वाटते आपले दात शुभ्र असावेत, पण काहीवेळा दातांच्या पांढऱ्या रंगामध्येही कमी-जास्त प्रमाणातील छटा पाहावयास मिळतात, तर पिवळ्या दातांमुळे आपल्या सौंदर्यात काहीशी बाधा येऊ शकते. पिवळ्या रंगाच्या एखाद्या दातामुळेही काहीशी नाराजी दिसून येते.
यासाठी लहान मुलांनादेखील सुरुवातीपासून आपले दात स्वच्छ कसे ठेवावेत, याचे संस्कार करणे गरजेचे ठरतात. दोन वेळा दात स्वच्छ घासण्याची सवय ज्याप्रमाणे पालक मुलांना लावतात, त्याचप्रमाणे स्वत:ही त्या सवयीचा अंगीकार केल्यास दात शुभ्र आणि स्वच्छ, दुर्गंधीमुक्त, शिवाय वाढत्या वयात दातदुखीपासूनही काहीशी सुटका होऊ शकते.
दातदुखी ही लहानपणापासूनच उद्भवणारी कटकट वाटते. याचे परिणाम लहान मुलांपासून अगदी तरुण, वयोवृद्धांपर्यंत भोगावे लागतात. लहानपणी मुलांना चॉकलेट देणे, दातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होणे आदींमुळे काही परिणाम मुलांच्या दातांवर होऊ शकतो. लहान मुलांची एकाच ओळीतील दंतपक्ती त्यांच्या इवल्याशा चेहऱ्याला खुलून दिसते.
मात्र, किडलेले दात, तुटलेले दात, दात-दाढदुखी यामुळे मुलेही बेचैन असतात. एकदा पडून गेल्यानंतर येणारे दात हे नीट यावेत यासाठी कितीही प्रयत्न केले तरी काहीवेळी ते सरळ येत नाहीत, कधी वेडेवाकडे, तर कधी मागे-पुढे, तर कधी डब्बल दात असे येत असल्यामुळे समाजात वावरताना दातांमुळे कुणी नावं ठेवू नये, असा एक विचार मनात डोकावल्यावाचून राहात नाही. यासाठी आवश्यक ती ट्रिटमेंटही घेतली जाते. पांढऱ्या शुभ्र दातांसाठी प्रयत्न केले जातात. नव्याने दात पर्मनंटली बसवायचे असल्यास ते पांढरे शुभ्र असावेत यासाठी खासकरून प्रयत्न केले जातात.
दात आपले सौंदर्य खुलवतात. दातांमुळे खुलणारं हास्य अधिक गोड वाटतं. त्याचप्रमाणे स्वच्छ, पांढऱ्या शुभ्र दातांमुळे आपली प्रतिमा उठून दिसते. दुर्गंधीमुक्त श्वासामुळे समोरच्या माणसाला तुमच्याशी बोलताना निश्चितच घृणा वाटत नाही. दात म्हणजे चेहऱ्याचं खरं सौंदर्यच. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा खरा हिस्सा. दातांमुळे आपले उच्चार खऱ्या अर्थाने स्पष्ट होतात. यामुळे आपले स्पष्ट बोलणे, स्पष्ट उच्चार, वक्तृत्वाची छाप समाजात पडते.
लहान मुलांसाठी दातांचा विचार केल्यास विशेषत: त्यांच्या बोलण्यावर परिणाम होताना दिसतो. लहान मुलं बोबडी बोलतात, आपणास त्यांचे बोबडे बोल हवेहवेसे वाटतात, पण ते विशिष्ट वयापर्यंतच. सात-आठ वर्षांनंतरही मुलं बोबडी बोलू लागली, तर ते नको वाटते.
याचे कारण त्यांचे दात, मुलांना स्पष्ट बोलण्याची सवय लागावी यासाठी त्यांच्या दातांची काळजी घेणे आवश्यक आहे. लहानपणी येणारे दात किमान सात वर्षांपर्यंत टिकवून ठेवणे आवश्यक आहे. यासाठी मुलांच्या गोड पदार्थ, चॉकलेट खाण्याच्या सवयी, दातांची स्वच्छता या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
..तर तरुणपणीही दातांची काळजी तेवढीच चांगल्यारीतीने घेणे आवश्यक आहे. कारण, आपली दंतपंक्ती आपल्या चेहऱ्याबरोबरच आपलं सौंदर्यही खुलवतेच, शिवाय दातांची योग्य निगा राखल्यास, हसताना, बोलताना, प्रतिक्रिया देताना, कठीण पदार्थ अगदी सहजरीत्या खाताना आपल्या पांढऱ्या शुभ्र, मजबूत दंतपंक्तीचे रहस्य काय, याचीही चर्चा झाल्यावाचून राहात नाही.
लहान मुलांच्या दातांचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा दात, दाढदुखीची तीव्र वेदना मुलांसोबत मोठ्यांसाठीही काहीशी वेदनादायी ठरते. काय उपाय करावेत यावेळी काही सूचत नाही. अनेकदा डॉक्टरी उपायांना मुलं घाबरतात. पालकही काहीसे डगमगतात. यावेळी मग काहीसे घरगुती उपाय डोके वर काढतात, पण मुलांचा त्रास काही कमी होत नाही.
अधिकता वयाच्या सहा-सात वर्षांनंतर मुलांचे दात पडतात. दरम्यान, होणाऱ्या वेदना या काहीशा सहन होण्याजोग्या नसल्या तरी त्या सहन करण्यावाचून पर्याय नसतो. त्याचबरोबर ज्यावेळी दाढ दुखते तेव्हाही तीच स्थिती असते. यावेळी हिरडी सुजणे, वेदना होणे, त्याचा परिणाम मुलांच्या झोपेवर होणे आदी त्रासाला सामोरे जावे लागते.
यावेळी एक उपाय म्हणून ती दाढ काढून टाकली, तर त्या वेदनेपासून सुटकारा मिळू शकतो, असा काहींचा समज असतो. मात्र, अकाली दाढ काढणे चांगले की वाईट, त्याचे काय परिणाम होतात याची कारणेही पालकांनी समजून घेतली पाहिजेत. बहुतेक वेळा मुलांना जेव्हा दात येतात त्यावेळी मुलांना जुलाब होणे, उलट्या होण्याचाही त्रास होतो. यावेळी या साऱ्याचा संबंध दात येण्याशी जोडला जातो.
यावेळी अधिकत्तम होणारा त्रास हा मुलांना सहन होण्याजोगा नसतो. यावेळी मुलांच्या शरीरातील पाणीही कमी होते. तर काहीवेळा मुलांना डॉक्टरी इलाजाशिवाय पर्याय नसतो किंबहुना सलाईनही लावावे लागते.
लहान मुलांच्या दात, दाढदुखीमुळे घरगुती इलाज म्हणून लवंग तेलाचाही वापर केला जातो. मुलांना दूध बॉटल लागत असल्यामुळे वयाच्या सात वर्षांपर्यंतही काही मुलं दूध पिण्यासाठी बॉटलचा वापर करतात. याशिवाय सातत्याने चिप्स, चॉकलेट खात असल्यामुळे याचा परिणाम दात किडण्यावर होतो, दाढा दुखण्यावर, सुजण्यावर होतो.
यावेळी पालकांनी सतर्क राहून मुलांच्या दातांची काळजी घेतली पाहिजे. शिवाय मुलांना दोन वेळा ब्रश करण्याची सवय लावणे, कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर चूळ भरायला लावणे आदी सवयी लावण्याची गरज आहे. याखेरीज मुलांचे सहा-सहा महिन्यांनी चेक अप करणे आवश्यक आहे. दातांची स्वच्छता, कोणते पदार्थ किती प्रमाणात खावेत, ते खाल्ल्यानंतर चूळ भरावी आदी गोष्टींवर लहानपणापासून मुलांनाही दातांची काळजी घेण्याची सवय लावली, तर ते फायदेशीर ठरू शकते.
लहान मुलांच्या दाढा लहानपणीच शक्यतो काढू नयेत. यामुळे नंतर येणारी दाढ ही जागा मोकळी मिळाल्याने वेडीवाकडी येते. मूल जर आठ ते नऊ वर्षाचे असेल, तर दाढ काढू शकतो. मात्र, त्याआधी दाढ न काढणेच हितावह. त्याचप्रमाणे मुलांना दुधाची बॉटल न देणे, शक्यतो मूल दीड वर्षाचे झाल्यानंतर त्याला दूध बंद करणे, कारण मूल रात्री दूध पिऊन झोपले तर दात किडण्याची शक्यता असते. दिवसातून दोन वेळा ब्रश करणे, दूध, चोको, बिस्किट खाल्ल्यानंतर चूळ भरणे, दात, दाढदुखीनंतर तत्काळ डॉक्टरी इलाज करणे, आदी गोष्टी पालकांनी समजून घेतल्या पाहिजेत.
मुलांना दात येताना जुलाब होणे ही बाब दात येण्याशी निगडित नाही. मात्र, मुलं दात येताना काही ना काही तोंडात घालतात. जमिनीवरील पदार्थ नकळत चावण्यासाठी तोंडात घालतात, यामुळे जुलाब होण्याची शक्यता असते. त्याचा दात येण्याशी काही संबंध नसतो.
कोणताही पदार्थ खाताना आपल्याला दातांचा वापर करावा लागतो. मात्र, या दातांना कीड लागण्याची शक्यता सर्वाधिक असते. कारण सकाळ, दुपार आणि रात्री खाताना अनेक अन्नाचे कण त्यात साठून राहतात. त्यामुळे दात लवकरच खराब होण्याची शक्यता वाढते. मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमाण अधिक असते.
लहान मुले दातांच्या स्वच्छतेकडे फार लक्ष देत नाहीत. तसेच ती चॉकलेट, मिठाई, बिस्किट खात असल्याने त्यांचे दात लवकरच खराब होतात. हे टाळण्याचा मोठा प्रयत्न स्कॉटलंडमध्ये झाला. तेथील नर्सरीत शिकणाऱ्या मुलांना रोज दात घासण्याची सवय लावण्यात आली. त्यामुळे मुलांचे दात अधिक मजबूत बनले आहेत. यामुळे दातांवरील खर्चात कोट्यवधी रुपयांची बचत झाली.
लहान मुलांना दात घासण्याची सवय लावणे कर्मकठीण काम होते. त्यामुळे नर्सरीतील सर्व मुलांनी रोज दात घासले की नाही हे बघण्याचे काम त्यांच्या शिक्षकांना करावे लागत होते. हळूहळू याचे चांगले परिणाम दिसू लागले. मुलांच्या दातांचे आरोग्य सुधारू लागले. यामुळे ते या कालावधीत दातांच्या उपचारांवरील खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली.