हिवाळय़ात त्वचेची काळजी विशेषत्वाने घेणे आवश्यक आहे. मात्र, थंडीमध्ये घाम यायचे प्रमाण कमी झाल्याने सुद्धा त्वचा कोरडी होते. यामुळे त्वचा फुटणे, खरखरीत होणे, कोरडी पडणे, खाज सुटणे असे त्रास होऊ लागतात. हिवाळ्यामध्ये वातावरणातील कोरडेपणा त्वचेचे नुकसान करू शकतो, हे लक्षात घेता खालील उपाय अवलंबवल्यास बदलत्या ऋतूमुळे त्वचेवर होणारे दुष्परिणाम नक्कीच रोखता येऊ शकतात.
त्वचा हायड्रेट करणारी फेस वॉश नियमितपणे वापरा. सॅलिसिलीक अॅसिड, ग्लायकोलिक अॅसिडचा समावेश असणारी उत्पादने शक्यतो टाळा.
मॉईश्चरायझर आणि सीरमचा वापर करा –
विटामिन सी आणि विटामिन ए चा समावेश असलेली सीरम आणि सोबत मॉईश्चरायझरचा वापर करा. विटामिन सी युक्त सीरम त्वचेचे प्रदूषणापासून संरक्षण करतात, तर विटामिन ए हे त्वचेला चिरतरुण करण्यास उपयोगी पडतात, तर मॉईश्चरायझर त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यात मदत करतात.
चेह-यासाठी इसेन्शिअल ऑईलचा वापर करा –
त्वचा हायड्रेट करण्यासाठी हे इसेन्शिअल ऑईल नेहमीच मदत करतात. लव्हेंडर ऑईल, खोबरेल तेल, प्राईमरोज ऑईल सारख्या इसेन्शिअल ऑईलचा वापर करा. ज्यांना चेह-यावर पुरळ आहेत, अशा व्यक्तींनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने फेशिअल ऑईलचा वापर करणे फायदेशीर ठरेल.
स्क्रबचा वापर करा –
मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रबरचा वापर करा. आठवडय़ातून दोनदा चेहरा स्क्रब केला तरी चालेल, फक्त त्वचा जास्त कोरडी होणार नाही आणि तिचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
गरम पाण्याचा वापर करणे टाळा –
गरम पाण्यामुळे त्वचा आणखी कोरडी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी कोमट अथवा थंड पाण्याचा वापर करावा. त्वचेला लगेचच मॉईश्चरायझ करा, जेणेकरून त्वचेतील ओलावा निघून ती कोरडी पडणार नाही.
त्वचेची हानी टाळा –
त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, अशा तापमानामध्ये वावरा. सामान्य तापमानाकरिता वापरल्या जाणा-या कृत्रिम उपकरणांचा वापर शक्यतो कमीच करावा. त्वचेचे नुकसान होऊ नये याकरिता गरम कपडे, हातमोजे, स्कार्फ, शाल यांचा वापर करावा.
शरीरातील पाण्याच्या पातळीचा समतोल राखा –
हिवाळ्यामध्ये शरीरातील पाण्याची पातळी ढासळणार नाही, याची काळजी घ्या. शीतपेय, चहा, कॉफी यांच्या सेवनाने पाण्याची तहान भागवू नका. थोडय़ा थोडय़ा वेळाने पाण्याचे सवन करत राहावे.
रात्रीच्या वेळी मॉईश्चरायझरचा वापर करा –
फक्त चेह-याचे संरक्षण न करता, हाता-पायांची देखील तितकीच काळजी घ्या. रात्री झोपण्यापूर्वी त्वचा मॉईश्चरायझ करा. तसेच स्वच्छ धुतलेल्या आणि थंडीपासून बचाव करणा-या कपडय़ांचा वापर करा.
डाएटवर लक्ष ठेवा –
एका चांगल्या त्वचेसाठी बाह्य उत्पादनांबरोबर योग्य संतुलित आहाराची देखील आवश्यकता असते. आहारामध्ये ओमेगा ३ युक्त पदार्थाचा समावेश करावा, जसे अंडी, सुकामेवा, अळशी, मासे, दही, चीज, दूध इत्यादी. व्हिटामिन ए, सी व ई युक्त फळांचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे.
सनस्क्रीन नक्की वापरा –
हे खूप महत्त्वाचे आहे. बाहेर कितीही धुके असले तरी सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर पडू नका. सूर्यावरील अतिनील किरणं खिडक्या आणि ढगांमधून सहजपणे जाऊ शकतात आणि म्हणूनच हिवाळ्यामध्येही आपण सूर्यापासून सुरक्षित राहणे आवश्यक आहे. टायटॅनियम डायऑक्साइड आणि झिंक ऑक्साईड यांचा समावेश असलेले सनस्क्रीन निवडा.
हिवाळ्यामध्ये त्वचेची चांगल्या प्रकारे काळजी घ्या आणि त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवा. थंडीतही त्वचेची चमक कायम राखण्यासाठी वरील उपाय नक्कीच फायदेशीर ठरतील.