पर्यावरणाचे ढासळलेले संतुलन आणि त्यामुळे वातावरणात झालेलं बदल दिवसेंदिवस प्रकर्षाने दिसून येतो आहे. यंदा कधी नव्हे ते तब्बल ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान तळपत असल्याने जणू काही सूर्य आगच ओकत असल्याचा प्रत्यय लहानांपासून मोठे अनुभवताना दिसून येतो आहे. म्हणूनच उन्हाच्या लाटांपासून आपल्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. विशेष, म्हणजे या काळात त्वचेचं रक्षण करणे गरजेचे आहे व त्यासाठी योग्य ती खबरदारी घेतल्यास आपण आपल्या त्वचेचे संरक्षण करू शकतो.
उन्हामुळे त्वचेला होणारी इजा –
कडक ऊन आणि सूर्यकिरणांशी थेट संपर्क आल्याने मेलेनीनची भरपूर प्रमाणात निर्मिती होते. परिणामी, त्वचा काळवंडते आणि डिहायड्रेट होते. खूप वेळ त्वचा उन्हात राहिली तर त्यावर वांग उठतात. ज्या व्यक्ती उन्हात काम करतात त्यांच्या त्वचेवर लाल ठिपके दिसू लागतात, त्याचप्रमाणे त्यांची त्वचा कोरडी, निस्तेज आणि म्हातारी दिसू लागते. त्यामुळे कपाळावर सुरकुत्या दिसणे, डोळ्यांभोवती, ओठांभोवती रेषा दिसणे ही लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे त्या व्यक्तीचे वय जास्त भासते. त्यामुळे सूर्यप्रकाश टाळणे हितावह असते
त्वचेची काळजी कशी घ्याल –
आपल्या शरीरात योग्य प्रमाणात पाणी असणे आवश्यक आहे. एरव्ही साधारण हे प्रमाण दिड लिटपर्यंत असावे असे सांगितले जाते परंतु या उन्हाळ्याच्या दिवसांत भरपूर पाणी प्यावे व साधारणता हे प्रमाण दिवसाला ३-४ लिटर पिणे आवश्यक आहे.
ताक, नारळपाणी, कलिगंड, संत्र, मोसंबी, कोकम सरबत आदी शीतपिये आरोग्यास हितावह असल्याने आहारामध्ये याचा समावेश करावा. उन्हात बाहेर फिरताना पाणी पिण्यासोबत बाह्य़ त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सन प्रोटेक्टरसह भरपूर मॉइश्चरायजरलावा. त्याचे एसपीएफ ३०-३५ च्या दरम्यान असावे. हे प्रमाण तुम्ही किती प्रमाणात उन्हात फिरता त्यावर अवलंबून असेल. थेट सूर्यप्रकाश टाळणे हितावह असते. टोपी किंवा छत्री वापरा आणि तुमची त्वचा एखाद्या सूती कपडय़ाने झाकून घ्या.
चहा, कॉफी आणि इतर पेये शक्यतो टाळावे तसेच उन्हाळ्याच्या दिवसात जागरणही आरोग्यास पुरक नाही. प्रवासाला निघण्यापूर्वी सन प्रोटेक्टरबरोबरच मॉइश्चरायजर लावा. एसपीएफयुक्त १ टेबलस्पून मॉइश्चरायजरघ्या, ते त्वचेवर समान दाब देऊन लावा, जेणेकरून ते आतपर्यंत पोहोचेल. तुमची त्वचा सूर्यकिरणांपासून किती काळ सुरक्षित राहील हे स्कीन प्रोटेक्टर या घटकावर अवलंबून असते. जर तुम्ही पूर्ण दिवस बाहेर असाल तर हे लोशन तुम्ही दर चार ते सहा तासांनी लावाले.
खूप घाम आल्यामुळे त्वचेवर अॅक्ने आणि कॉम्बेटोन्स उठण्याचे प्रमाणही वाढते. त्यामुळे चेहरा अनेकदा धुणे आणि त्याचप्रमाणे स्वच्छता राखणे, हात, पाय व चेहरा स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. घाम आल्यास अँटि-फंगल किंवा कोरडी पावडर लावावी. हलक्या रंगाचे सूती कपडे वापरावेत आणि कृत्रिम नायलॉनचे कपडे वापरू नयेत. या प्रकारच्या कापडामध्ये घाम शोषला जातो आणि तो तसाच राहिल्यामुळे तुम्हाला बुरशीची लागण होऊ शकते. त्याचप्रमाणे मसालेदार आणि स्निग्ध पदार्थ वज्र्य करावेत. जेव्हा बाहेर जाल तेव्हा टोपी अवश्य घालावी. जे वातानुकूलित कार्यालयात काम करतात आणि बाहेर पडतात, त्यांच्यासाठी तीव्र फरक असलेल्या तापमानात आतबाहेर करणे चांगले नाही. शरीराच्या तापमानाचा समतोल बिघडून शरीराला अपाय होऊ शकतो.