जपानचे नेते शिंजो आबे यांच्यावर गेल्या आठवड्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी जपान सरकारला तब्बल 97 कोटी रुपये खर्च आला. देशाच्या राष्ट्रप्रमुखाचा अशा प्रकारे मृत्यू झाला तर त्याच्यावरील अंत्यसंस्काराचा खर्च सरकारी तिजोरीतून केला जात असला तरी तो खर्च किती करावा याबाबत कोणतेही नियम नाहीत.
त्यामुळे अनेक वेळा त्या नेत्याच्या लोकप्रियतेप्रमाणे खर्चात कमी जास्त पणा होऊ शकतो. अर्थात शिंजो आबे हे सर्वात लोकप्रिय नेते असले तरी त्यांच्यावर करण्यात आलेला अंत्यसंस्काराचा खर्च आजपर्यंतचा सर्वात जास्त खर्च नाही. जागतिक नेत्यांचा विचार करता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या अंत्यसंस्कारवर सर्वात जास्त खर्च करण्यात आल्याची नोंद आहे.
रिगन यांच्या अंत्यसंस्कारावर झालेल्या खर्चाचा आकडा 3250 कोटी रुपये एवढा मानण्यात येतो, अर्थात ही आकडेवारी सर्व खर्च धरून मोजली जाते. म्हणजेच अंत्यसंस्काराच्या कालावधीमध्ये अनेक आर्थिक संस्था आणि व्यवहार बंद असल्याने त्यांचे झालेले नुकसानही अमेरिकेत लक्षात घेतले जाते. तो खर्च पकडून त्यांच्यावर 3250 कोटी रुपये खर्च करण्यात आले असा निष्कर्ष काढण्यात आला.
कोरियाचा हुकूमशहा किम जोंग इल यांचा अंत्यसंस्कारवर देशाने 325 कोटी रुपये खर्च केले होते. अमेरिकेचे आणखी एका अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचा अंत्यसंस्कारावर 121 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. पोप जॉन पॉल दुसरे यांचे 2005 निधन झाले तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्कारावर सत्तर कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. ( 97 crore spent on Shinzo Abe’s funeral )
2002 मध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मातेवरील अंत्यसंस्कारासाठी 47 कोटी रुपये खर्च आला होता. तर प्रिन्सेस डायना त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी 44 कोटी रुपये खर्च ब्रिटनच्या तिजोरीतून करण्यात आले होते. ब्रिटनच्या लोकप्रिय महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या अंत्यसंस्कारासाठी दहा कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. तर जगातील सर्वात लोकप्रिय पॉप सिंगर मायकल जॅक्सन याचा अंत्यसंस्करावर सुमारे आठ कोटी रुपये खर्च आला होता.