आज समाजात कोणतीही वाईट घटना घडू देत, लगेच दोष थोपवला जातो तो आजकालच्या पिढी आणि संस्कारावर. पिढी कोणतीही असो संस्कार हा त्या पिढीचा दागिना समजला जातो, भले ते संस्कार वाईट असोत वा चांगले. मुळात संस्कार हा शब्द चांगले गुण दर्शवण्यासाठी होता, मात्र कालांतराने संस्कार हा शब्द चांगले संस्कार आणि वाईट संस्कार ह्या दोन फडामध्ये दुभागला गेला.
जीवन बदलत गेलं, सत्युगापासून ते कलीयुगापर्यंत प्रत्येक युगात मनुष्य प्राण्यांवर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला देण्यात येणारा अनमोल उपहार म्हणजे संस्कार, रित तशीच राहिली फक्त परिवार सोडून संस्कार देणारे मात्र हळूहळू बदलत गेले. अति प्राचीन काळापासून घरातील वडीलधारे जे करतील तेच आपण करायचे हे ठरलेलं, घर कुठलही असो मात्र आई-वडील जसे वागतील तसंच मुलांनी वागावं हे अगदी न चुकता ठरलेलं. संस्काराचे मूळ म्हणजे दैनंदिन जीवनातील दुसऱ्या सोबतचे व्यवहार, इतरांबद्दल असलेली आपुलकी, वडीलधाऱ्यांचा मानसन्मान असे अनेक गुण म्हणजे संस्कार.
फार पूर्वी संस्कार कदाचित खूप विकसितही नसतील, हळूहळू विकसित होऊन 20व्या शतकापर्यंत हे संस्कार बहरले, जनमानसात या सर्व संस्कारांची लागण झाली. प्रत्येक देशाचे संस्कार देखिल विभिन्न दिसतात. त्यात जगाच्या पाठीवर आम्ही भारतीय मोठ्या गर्वाने भारतीय संस्कृतीचे गुणगान गातो, गातो म्हणजे ते फक्त गाण्यापुरतेच आम्ही मर्यादित ठेवतो. जेव्हा करोनाच्या पार्श्वभूमीवर कुण्या आफ्रिकी देशाचा राजा हात जोडून नमस्कार करतो तेव्हा मात्र आमची मान गर्वाने मोठी होते आणि सरासर फेसबुक-व्हॉट्सऍपवर त्या राजाचे हात जोडलेले फोटो व्हायरल करायला आम्हाला एक मिनिट खूप झाला आणि त्या फोटोला भले भले शीर्षक देऊन आम्ही उगाचच आपच्या संस्कृतीची काळजी व्यक्त करत असतो.
नुसता हात जोडण्याचा प्रश्न आपण स्वतःच्या मनाला विचारला तर, आपण खरंच दैनंदिन जीवनात एकमेकांना भेटण्यासाठी भारतीय संस्कृती वापरतो की, शेक हॅन्ड करून पाश्चात्य संस्कृती अंगीकारतो. आज आई-वडिलांना बाळ जन्माला आल्यावर सर्वात मोठा प्रश्न पडलेला असतो तो संस्कारांचा, प्रत्येक आईला वाटते माझा मुलगा शिवाजी महाराज झाला पाहिजे, बापाला वाटतं माझा मुलगा बाबासाहेब आंबेडकर झाला पाहिजे. या सर्व माय-बापांना एवढेच सांगायला आवडेल, तुम्ही अपेक्षा ठेवतात त्यात काहीच गैर नाही, ह्या महापुरुषांना आदर्श मानतात यातच खूप काही सकारात्मक भविष्य आहे.
मात्र एक प्रश्न स्वतःला विचारा, आपण त्या पाल्याचे पालक होण्याआधी स्वतःमध्ये कधी शिवबांना रामायण, महाभारताचे धडे देणारी जिजाऊ शोधली आहे का? आपल्या मुलाला उत्तम शिक्षण घेण्यासाठी स्वतः उपाशी राहून पुस्तके विकत आणणारे रामजी आंबेडकर शोधले आहे का? जर या प्रश्नाचे उत्तर “हो’ असेल, तर आपला मुलगा शिवबा किंवा आंबेडकर नाही तर त्यांच्यासारखा तेजस्वी होईल हे नक्की, आणि जर या प्रश्नाचे उत्तर “नाही’ असेल तर आपणाला पहिले स्वतःला बदलायची गरज आहे हे लक्षात घ्यायला हवं.
आता पाश्चात्य संस्कृतीचा उपभोग सगळेच घेताना दिसत आहेत. आज अनेक जोडपी खांद्याला खांदा लावून अगदी राजा-राणीचा संसार करत असतात, मात्र ते स्वतःच्या पाल्यांच्या संस्कारांची किती दखल घेतात? लहानपणापासूनच बाळाच्या हातात कोल्ड ड्रिंक, आईच्या हातात बियर आणि वडिलांच्या हातात असलेला दारूचा ग्लास हे चित्र खूप भयानक आहे. संस्कार म्हणजे असं वेगळं काही नसतं, आपल्या आई-वडिलांना बघत मोठे होणे आणि त्यांचे गुण आत्मसात करणे हेच असतं.
– ललित केदारे