Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

हिपॅटायटिस जडण्याची गंभीर करणे आणि निदान!

by प्रभात वृत्तसेवा
January 6, 2021
in आरोग्य वार्ता
A A
हिपॅटायटिस जडण्याची गंभीर करणे आणि निदान!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – यकृताच्या पेशींना हिपॅटोसाईट्‌स (hepatitis) म्हणतात आणि त्यांना ग्रस्त करणाऱ्या आजाराला हिपॅटायटिस. वैद्यकीय भाषेत याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायरसेसमुळे यकृताला येणारी सूज असे म्हणता येईल. आपल्या शरीराला हे विषाणू जेवढे थेट नुकसान पोहोचवतात, त्यापेक्षा अधिक नुकसान शरीराने दिलेल्या प्रतिक्रियांमुळे होते. तांत्रिक भाषेत सांगायचे झाल्यास शरीराने या विषाणूंच्या संक्रमणाला दिलेल्या प्रतिसादामुळे आपल्या शरीराचे आणि आरोग्याचे जास्त नुकसान होते. मुळात, हिपॅटायटिस (hepatitis) हा शब्द यकृताचा दाह निर्माण करणाऱ्या रोगांच्या समूहाला दिला जातो. यात विषाणू आणि तीव्र मद्यपान यांच्यामुळे होणारा दाह देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे. यातला प्रत्येक प्रकारचा विषाणू हा एक विशिष्ट सिंड्रोमला म्हणजे रोगस्थितीला कारणीभूत असतो.

बाहेरून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यासाठी आपल्या शरीरात प्रतिकार यंत्रणा कार्यरत असते. या यंत्रणेने हिपॅटायटिसच्या (hepatitis) विषाणूंना आणि संक्रमित यकृत पेशींना दिलेल्या प्रतिकारक प्रतिसादामुळे त्या पेशींचे नुकसान होते आणि यकृताचा दाह होतो. परिणामी, यकृतातील ट्रान्समिनेसेस, म्हणजे द्राव हे यकृतातून बाहेर गळून रक्‍तात मिसळतात आणि त्यांची रक्‍तातील पातळी वाढते.

या आजाराचे विषाणू यकृताची प्रोथ्रॉम्बिन हे रक्‍त गोठवणारे घटक निर्माण करण्याची क्षमता बिघडवतो, त्यामुळे रक्‍त गोठण्यासाठी लागणारा वेळ वाढतो. आपल्या रक्‍तात बिलीरुबीन नावाचा एक घटक असतो. तो जुन्या लाल रक्‍तपेशींच्या विघटनातून निर्माण होतो. त्याची शरीरातून योग्य विल्हेवाट लावण्याचे काम यकृताचे असते. अन्यथा या घटकाची वाढलेली पातळी कावीळ निर्माण करते.

हिपॅटायटिसच्या (hepatitis) विषाणूमुळे यकृताचे नुकसान होते आणि त्याची बिलीरुबीनपासून शरीराला मुक्‍त करण्याची क्षमता कमी होते. परिणामी काविळीची लक्षणे, म्हणजे डोळे आणि शरीराचा रंग पिवळा होणे, गडद लघवी होणे सुरू होतात. हिपॅटायटिसच्या विषाणूनुसार या लक्षणांमध्ये अन्य लक्षणांची भर पडते.

कसा होतो हा आजार?
हिपॅटायटिस (hepatitis) हा रोग रुग्णामध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा अगदी मर्यादित लक्षणे दिसत असतानाही उद्‌भवू शकतो; परंतु वेळीच त्याचे निदान झाले नाही तर त्यातून विविध आजार होण्याची शक्‍यता बळावते. हिपॅटायटिसची तीव्रता किंवा या आजारातला मृत्यूदर हा तो कोणत्या व्हायरसमुळे उद्‌भवला, यावर अवलंबून असते. हिपॅटायटिसच्या (hepatitis) विषाणूंचे वर्गीकरण ए, बी, सी, डी आणि ई अशा पाच प्रकारांमध्ये केले जाते. त्यांच्यातील कोणत्या विषाणूची बाधा आहे, यावर हा आजार ऍक्‍युट आहे की क्रॉनिक ते ठरते.

हिपॅटायटिस ए (hepatitis)
हिपॅटायटिस “ए’ हा कमी गंभीर स्वरूपाचा आणि तुलनेने मवाळ असा रोग आहे. याची लक्षणे ही बऱ्याच अंशी फ्लूच्या आजारासारखीच असतात; परंतु त्याच्या जोडीला त्वचा आणि डोळे हे पिवळे होण्यास सुरुवात झाली, तर हिपॅटायटिस (hepatitis) ए रोगाची बाधा झालेली असू शकते. या आजाराचा विषाणू रुग्णाच्या शरीरात शिरल्यानंतर 15 ते 45 दिवसांच्या वाढीच्या काळात त्या व्यक्‍तीच्या मलाद्वारे बाहेर टाकला जातो.
प्रमुख लक्षणे : कावीळ, थकवा, भूक न लागणे, मळमळणे आणि उलट्या, हलका ताप, फिकट किंवा मातीच्या रंगाचा मल, गडद लघवी ही याची काही प्रमुख लक्षणे आहेत.

आवश्‍यक उपाययोजना
1)अस्वच्छ अन्न आणि पाणी टाळणे.
2)मलविसर्जनानंतर हात स्वच्छ धुणे.
3)संक्रमित व्यक्‍तीचं रक्‍त, मल किंवा अन्य शारीरिक द्रवाशी संपर्क झाल्यास हात जंतुनाशक द्रावणाचा वापर करून अगदी स्वच्छ धुणे
4)लोकांशी मोठ्या संख्येने आणि निकटचा संपर्क असणाऱ्या संस्थांमध्ये हिपॅटायटिस (hepatitis) अच्या जलद प्रसारासाठी पोषक वातावरण मिळते. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी इम्यून ग्लोब्यूलिन हे प्रतिबंधक औषध वैद्यकीय सल्ल्याने घेणे आवश्‍यक आहे.
5) हिपॅटायटिसच्या विरोधात संरक्षण देणारी लस उपलब्ध आहे. तिचा पहिला डोस घेतल्यानंतर चार आठवड्यांनी लस संरक्षण देण्यास प्रारंभ करते. या आजारापासून दीर्घकाळपर्यंत संरक्षणासाठी पहिली लस घेतल्यानंतर सहा ते बारा महिन्यांनी बुस्टर डोस देणे आवश्‍यक आहे.

हिपॅटायटिस बी (hepatitis)
हिपॅटायटिस “बी’ हा आजार वेळीच आणि योग्य उपचार न घेतल्यास गंभीर स्वरूप धारण करू शकतो. परंतु हे संक्रमण झालेले बहुतांश रुग्ण योग्य उपचारांनी रोग झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत बरे होतात. या काळात काटेकोर पथ्य आणि स्वच्छतेचे नियम सांभाळावे लागतात.
हिपॅटायटिस बी हा रक्‍त आणि इतर शारीरिक द्रवांमार्फत पसरतो. याचे संक्रमण असे होऊ शकते :
पआरोग्य सेवा केंद्रात रक्ताशी संपर्कात आल्याने शल्यचिकित्सक, परिचारिका, दंतवैद्य आणि इतर आरोग्यसेवा कार्यकर्त्यांना धोका होण्याची शक्‍यता जास्त असते.
पएका संक्रमित व्यक्तीसोबत असुरक्षित समागम
पसंक्रमित रक्त दिले जाणे
पअंमली पदार्थांचं सेवन करताना एकच सुई अनेकांनी वापरणे
पसंक्रमित हत्यारांनी गोंदण किंवा ऍक्‍युपंक्‍चर उपचार घेणे
पगरोदर स्त्रीला संसर्ग झाल्यास तिच्या अपत्याला या संसर्गाचा मोठा धोका असतो.
लागणीचा जास्तीत जास्त धोका असलेल्या आरोग्य कार्यकर्त्यांसह इतर व्यक्ती आणि हिपॅटायटिस झालेल्या व्यक्‍तीसोबत राहणाऱ्या व्यक्‍तींनी हिपॅटायटिस बी ची लस टोचून घेणे आवश्‍यक आहे.

हिपॅटायटिस सी (hepatitis)
हिपॅटायटिस “सी’ चा विषाणू सात दिवसांपर्यंत जिवंत राहतो. तो कोणत्याही उपायांनी निष्क्रिय होत नाही. हा सर्वांत घातक विषाणू मानला जातो आणि त्याचा प्रसार संक्रमित रक्‍त किंवा इतर शरीरद्रावांमुळेच होतो. याची लक्षणेही काविळीसारचीच पण जास्त तीव्र असतात.
हिपॅटायटिस “सी’चे निदान आणि उपचार हे सर्वांत जास्त खर्चिकही असतात. हा आजार लिव्हर सिरॉसिस आणि कॅन्सरचं मोठं कारण आहे. त्यामुळे याचा प्रतिबंध हाच सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे.
हिपॅटायटिस “सी’चा प्रसार वेगाने वाढतो आहे. एड्‌सचा प्रसार रोखण्यासाठी जे खबरदारीचे उपाय योजले जातात, ते सर्व उपाय हिपॅटायटिस “सी’ चा प्रसार रोखण्यासाठीही वापरणे महत्त्वाचे ठरते. या आजाराच्या तीव्र अवस्थेत रक्ताची उलटी, पायांवर सूज अशी लक्षणेही दिसतात. या आजारात रुग्ण दगावण्याचा धोका जास्त असतो.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे विशेष मिशन
हिपॅटायटिस (hepatitis) या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन यंदाच्या जागतिक हिपॅटायटिस दिनाच्या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराविरोधात एक विशेष अभियान हाती घेण्याची घोषणा केली आहे. ही योजना आपल्यासाठी महत्त्वाची असेल. कारण भारत, इजिप्त आणि युगांडा हे तीन देश यासाठी निवडण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यास अहवालात या आजाराबाबतची नवी आकडेवारी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार जगभरात दरवर्षी 20 लाखांहून अधिक व्यक्‍ती हिपॅटायटिसची शिकार होतात आणि त्याचे कारण आहे, असुरक्षित सुयांचा इंजेक्‍शनसाठी करण्यात येणारा वापर. म्हणजे हिपॅटायटिसचा संसर्ग झालेल्या रुग्णाला इंजेक्‍शन देण्यासाठी वापरलेली सुई पुन्हा असुरक्षित पद्धतीने इतर रुग्णांसाठी वापरली, तर त्यांनाही या आजाराचा संसर्ग होतो आणि बाधित रुग्णांची संख्या वाढते.

जगभरात दरवर्षी 16 अब्ज इंजेक्‍शन्सचा वापर होतो. त्यातील सुमारे 40 टक्‍के इंजेक्‍शन्स ही असुरक्षित पद्धतीने दिली जातात. हे प्रमाण अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये अधिक आहे. ही आकडेवारी धक्‍कादायक आहे. इतर कारणांनी हा आजार होणाऱ्या लोकांचा समावेश या आकडेवारीत नाही. त्यामुळे आरोग्यसुविधांच्या दृष्टीने याबाबत जनजागृती करण्यासाठी हे अभियान राबवले जाणार आहे.

“ग्लोबल इंजेक्‍शन सेफ्टी इनिशिएटिव्ह’ या नावाचे हे अभियान डब्ल्यूएचओतर्फे राबवल्या जाणाऱ्या “ग्लोबल पेशंट सेफ्टी प्रोग्राम’ या कार्यक्रमाचा भाग आहे. जगभरात लिव्हर कॅन्सरला बळी पडणाऱ्या 80 टक्‍के रुग्णांमध्ये कॅन्सरची सुरुवात हिपॅटायटिसच्या संसर्गाने होते. ही बाब गंभीर आहे. त्यासाठीच या संसर्गाचे प्रमुख असलेलया असुरक्षित इंजेक्‍शन्सच्या वापर रोखणे हा या अभियानाचा उद्देश असेल.

त्यामुळे या घातक आजाराला संसर्ग होण्यापूर्वीच रोखता येईल. आताच्या आकडेवारीनुसार जगात 13 ते 15 कोटी लोकांना गंभीर स्वरूपाचा हिपॅटायटिस सी आणि सुमारे 24 कोटी लोकांना हिपॅटायटिस बीची लागण झालेली आहे. यावरून या आजाराची व्याप्ती आणि त्याचं गांभीर्य लक्षात येईल.

तीव्र ऍक्‍युट हिपॅटायटिस (hepatitis)
या प्रकारात विषाणूंचे संक्रमण झाल्यापासून रोगाची लक्षणे दिसू लागण्यासाठी सुमारे 1 ते 6 महिन्यांचा कालावधी लागतो. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये मळमळणे, उलटी, भूक न लागणे, थकवा आणि स्नायू तसेच सांधेदुखी यांचा समावेश होतो. या प्राथमिक अवस्थेत आजाराचा सुगावा न लागल्यामुळे एक टक्‍का लोक यकृताचे नुकसान होऊन प्राणाला मुकतात.

तीव्र ऍक्‍युट स्वरूपाचे संक्रमण होणे हे संक्रमणाच्या वेळी असणाऱ्या त्या व्यक्‍तीच्या वयावर अवलंबून असते. नवजात बाळांपैकी 90 टक्‍के बाळांना, 50 टक्‍के लहान मुलं आणि 5 टक्‍क्‍यांहून कमी प्रमाणात प्रौढ व्यक्‍तींना तीव्र स्वरूपाचा हिपॅटायटिस “बी’ होण्याची शक्‍यता असते. थकवा, सांधेदुखी, हलका ताप, मळमळणे, उलटी, भूक न लागणे, पोटाच्या वरच्या उजव्या बाजूला दुखणे, कावीळ आणि गडद लघवी ही या आजाराची प्रमुख लक्षणे दिसून येतात.

मूत्रपिंडातील संक्रमण
हिपॅटायटिसच्या “बी’, “सी’ आणि “डी’ या तिन्ही प्रकारच्या विषाणूंमुळे यकृताबरोबरच मूत्रपिंडाचेही नुकसान होण्याची दाट शक्‍यता असते. यामुळे मूत्रपिंडाचा कॅन्सर किंवा यासारखे अनेक गंभीर रोग होऊ शकतात. जर हे विषाणू रक्‍तात मिसळले तर, मूत्रपिंडात प्रवेश करतात आणि तेथे आपल्यासारखे दुसरे व्हायरस उत्पन्न करतात. यामुळे मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड उत्पन्न होतो.

लक्षणे
ताप, उलट्या, मळमळ, थकवा, काविळीची लक्षणे, पायात किंवा पोटावर नाभीजवळ विचित्र फुगवटा दिसायला लागणे ही या विषाणूच्या संक्रमणाची लक्षणे आहेत. या संसर्गात पायात आणि नाभीजवळ शरीरातील द्रव पदार्थ साठून राहतात किवा निर्माण होतात. त्यामुळे हा फुगवटा दिसतो. कोणत्याही वैद्यकीय उपचारांदरम्यान सुरक्षित उपचारांची खात्री करून घेणे हा या आजाराला रोखण्याचा प्रभावी उपचार आहे. गरोदर स्त्रियांनी या संसर्गाचे कोणतेही लक्षण दिसल्यास तातडीने तपासणी करून घेणे आवश्‍यक ठरते. या संसर्गाचे निदान झाल्यास हयगय न करता आवश्‍यक ते उपचार घेतले पाहिजेत.

हिपॅटायटिसच्या संक्रमणाची प्रमुख कारणे
हिपॅटायटिस या रोगाचे संक्रमण होण्याचे प्रमुख कारण हे दूषित पाणी व संसर्गजन्य रक्त हे आहे. सन 1995 पूर्वी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रक्तामध्ये हिपॅटायटिस या रोगाची तपासणी होत नसे. अशी तपासणी सुरू झाल्यापासून संक्रमित रक्‍तामुळे होणाऱ्या आजाराचे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे. त्यामुळे अशा वातावरणात हिपॅटायटिस जर टाळायचा असेल तर प्रतिबंधात्मक काळजी घेणे गरजेचे आहे.

सहज करता येण्यासारखे उपाय
पिण्याचे पाणी उकळून पिणे, रस्त्यावरील उघड्यावरचे पदार्थ न खाणे, फळे व भाज्या स्वच्छ धुवून वापरात आणणे, इंजेक्‍शनची सिरींज यापूर्वी वापरात आणलेली नाही याची खात्री करून घेणे, दारू किंवा ड्रग्ज अशा व्यसनांपासून दूर राहणे, लसीकरण, गरोदर स्त्रीची वेळेवर तपासणी आणि उपचार. त्याचबरोबर प्रकृती अस्वस्थ वाटल्यास ताबडतोब योग्य उपचार सुरू करणे आवश्‍यक आहे.

सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व
व्यक्‍तिगत किंवा घरातील स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छता पाळण्यासाठी सगळ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. स्वच्छ भारत अभियानासारख्या अभियानामुळे देशाचे आरोग्य सुधारण्यास मदतच होईल. अशी अभियाने जर गांभीर्याने राबवली गेली, तर फक्‍त हिपॅटायटिसच नाही तर सगळ्याच रोगांशी दोन हात करण्यास आपण नक्‍कीच सक्षम होऊ.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvayurvedabeardbenefits of Bhimaseni kapoorblack pepperblood healthblood pressurecancercaronacholesterolCoronacorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdestroys virusesdietEasy Dietfitnesshealthhelth tipshepatitisरिलेशनशीपहिपॅटायटिस (hepatitis)
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar