तिळातील कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडे मजबूत करण्यास मदत करतात, तर झिंकमुळे हाडांचा ठिसूळपणा कमी होतो. त्यामुळे विशेषतः महिलांसाठी तीळाचे सेवन फायदेशीर ठरते. थंडीच्या दिवसांत रोज एक मोठा चमचा तीळ खाल्ल्यास सांधेदुखी, गुडघेदुखी यांसारख्या तक्रारी कमी होण्यास मदत मिळते. तसेच दात मजबूत राहण्यासाठीही तीळ उपयुक्त ठरतात.
तिळामध्ये फायबर आणि सेसमीन नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून शरीराचे संरक्षण करतात. तीळ खाल्ल्यामुळे भूक वाढते तसेच वात, पित्त आणि कफाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होते.
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. अशा वेळी तीळाचे तेल त्वचेवर लावल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. तिळाच्या नियमित सेवनामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते. तिळाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि बी-कॉम्प्लेक्स असल्यामुळे केसांसाठीही ते गुणकारी मानले जाते.
काळे तीळ गरम पाण्यासोबत घेतल्यास पोटदुखीपासून आराम मिळू शकतो. तीळ आणि खडीसाखर एकत्र खाल्ल्यास सुक्या खोकल्यावर फायदा होतो. तसेच तिळातील काही घटक तणाव आणि नैराश्य कमी करण्यास मदत करतात, असेही तज्ज्ञ सांगतात.
कानदुखी असल्यास तिळाच्या तेलात लसूण घालून ते हलकं गरम करून लावल्यास आराम मिळू शकतो. सतत तोंड येत असल्यास तिळाच्या तेलात सेंधव मीठ मिसळून लावल्यानेही फायदा होतो.
एकूणच, हिवाळ्यात तीळ हे नैसर्गिक औषधासारखे काम करतात. रोजच्या आहारात योग्य प्रमाणात तीळाचा समावेश केल्यास शरीराला उष्णता मिळते, हाडं मजबूत राहतात आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते.
The post Sesame Seeds: आरोग्यदायी तीळ; हिवाळ्यात शरीरासाठी नैसर्गिक औषध appeared first on Dainik Prabhat.
