सतत बदलणाऱ्या हवेचा परिणाम त्वचा आणि केसांवर होतो. त्यांना हानी पोहोचते. त्यासाठी काय काळजी घ्यावी याची थोडक्यात माहिती.
आयुर्वेदाने नेहमीच माणसाकडे निसर्गाचा एक अविभाज्य घटक म्हणून पाहिलंय. हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम माणसावर होतो आणि माणूस निसर्गात फेरफार करतो. आपल्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतल्याने निरोगी राहण्यास मदत होते. हवामान तसेच पर्यावरणात झालेल्या बदलांची माहिती झाल्याने रोग्याची काळजी घेणे, पर्यायाने रोगाचे निर्मूलन करणे शक्य होते. पृथ्वीवर होणारे बदल लक्षात घेऊन आयुर्वेदाने वसंत, हेमंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, शिशिर हे सहा ऋतू मानले आहेत. मात्र हे सर्व ऋतू प्रत्येक देशांमध्ये जाणवतातच असे नाही. हेमंत, ग्रीष्म हे उत्तर ध्रुवावर तर वर्षा, शिशिर, शरद हे ऋतू दक्षिण ध्रुवावर आढळतात.
शारीरिक आरोग्याची आयुर्वेदिक संकल्पना तीन ऊर्जा संकल्पनांभोवती रचण्यात आली आहे. हे शरीरातील मानसिक किंवा रासायनिक स्त्रोत आहेत. या ऊर्जा घटकांवर संपूर्ण शरीराची क्षमता अवलंबून असते. वात, पित्त आणि कफ हे तीन रस जीवनाकरता आवश्यक असून, यांच्या परस्परकार्यातूनच निरोगी जीवन साकारते. या तीन घटकांमध्ये परस्परांत असंतुलन निर्माण झाल्यास त्याची परिणती विविध प्रकारच्या आजारांची निर्मिती होण्यात होते. दोषाचे असंतुलन त्वचा आणि केस यामध्येही दिसून येते. त्यामुळेच त्वचाविषयक उपचारपद्धतींचे संतुलन करण्याची गरज वाढत्या प्रमाणावर भासत असून, ऋतूनुसार दोषाचे प्रकार बदलतात. वर्षा ऋतूतील मुख्य भाग म्हणजे थंड, दमट हवा असून, यामुळे असंतुलन निर्माण होते आणि वात तसेच पित्ताला चालना मिळते. दमट त्वचा आणि केसांना हानी पोहोचवते, सूज येणे, त्वचा निस्तेज होणे आदी आजार डोके वर काढतात.
वात विकाराने दूषित त्वचा व केस
वातामुळे त्वचा तसेच केस आपले पोषकत्व टिकवून ठेवू शकत नाहीत. त्याकरता पोषकत्व वाढवण्याला प्राधान्य दिले पाहिजे. रासायनिक प्रिझर्वेटिव्हज वापरलेली स्कीन केअर उत्पादने टाळावीत. कारण यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचते आणि ती कोरडी पडते. तुमच्या त्वचेला तसेच केसांना पुरेसे पोषण मिळावे, यासाठी गरम, पोषक अन्न घ्यावं. कोरडे अन्न टाळा. रात्री लवकर झोपा आणि दररोज तेलाने मालिश करा.
गरम तसेच स्निग्ध पदार्थाचे सेवन करा (तूप व ऑलिव्ह ऑइल सर्वात चांगले)
संपूर्ण दिवसभर कोमट पाणी प्या आणि भरपूर प्रमाणात गोड, रसपूर्ण फळे खा. साधारणत: आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक असतं.
अल्कोहोलवर आधारित स्कीन क्लेनसर्स वापरू नका
साबणाऐवजी चणाडाळीची पावडर वापरा
दाणे, बदाम, अक्रोड आणि त्याचे तेल, तीळ, सूर्यफुलाच्या बिया आणि त्याचे तेल, द्राक्षबियांचे तेल, प्रिमरोज ऑइल, सोयाबीन ऑइल, सर्व प्रकारची धान्ये यांचे सेवन करावं.
कॅफीन, शीतपेय, साखर, चॉकलेट, पोटॅटो चीप्स आणि जंक फूड टाळावं.
पिंडाथायलम किंवा धनवंतरम कुझम्फू किंवा बालअश्वगंधी कुझम्फू यासारखे आयुर्वेदिक तेल दररोज आंघोळीपूर्वी 15 मिनिटे लावावं
लवकर आणि नेहमी कोमट पाण्याने अंघोळ करावी.
पित्तामुळे होणारे त्वचा/ केस विकार
पित्ताने बाधित असलेल्या संवेदनशील त्वचेला शांत करण्यावर भर देणारी उपचारपद्धती उपयोगात आणावी. टॅनिंग सलून्स, स्टीम फेशिअल आणि उन्हात बराच काळ जाणे यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. पित्ताचा त्रास असलेल्यांच्या त्वचेत तेलाचे प्रमाण अधिक असते. आंघोळीकरता थंड पाणी वापरावे. पण बर्फासारखे थंड पाणी वापरू नयेत. जळजळीत, उष्ण अन्नपदार्थ टाळावेत, उन्हात व्यायाम करू नये. सिंथेटिक रसायने, प्रिझव्र्हेटिव्ह आणि अन्य परिणाम करणारे घटक टाळावेत.
दिवसातून 2-3 वेळा हिरव्या चण्याची पावडर आणि बेसन (समप्रमाणात) पाण्यात मिसळून चेहरा धुवावा. आंघोळीपूर्वी अर्धा तास चेहऱ्यावर अर्धा चमचा लिंबू आणि काकडीचा रस यांचे मिश्रण लावावे.
शक्य असेल तेव्हा मेकअप टाळावा. चेह-यावरील छिद्रे न बुजवणारा पाण्यावर आधारित मेकअप करावा.
पपया, मध, दूध, दुधाची पावडर यांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावावी आणि पंधरा मिनिटांनी चेहरा धुवावा.
कडुनिंबाच्या पानांची पेस्ट (25) करा आणि मधात (2 चमचे) मिसळून फेस पॅक म्हणून लावावा. सुकण्यापूर्वी पॅक काढून टाकावा.
आंघोळीपूर्वी मध आणि दह्याचे मिश्रण करून बॉडी मसाज करावा.
सहजगतीने पचण्याजोगे अन्न वापरावे. यात जुने धान्य, तूप घातलेली सूप्स, सुके मांस, डाळी, मध, खडे मीठ, पिपली, गोड, आंबट आणि खारट, भाज्या/ डाळी यांचे कमी तिखट सूप याचे सेवन करावे.
काय टाळाल?
दिवसाची झोप
अतिश्रम
अतिरिक्त आर्द्रता टाळा आणि स्वत:ला उबदार वातावरणात ठेवा.
थंडीत काय कराल?
थंडीत आपल्या हातापायाची त्वचा सुरक्षित ठेवण्याकरता आज सौंदर्यक्षेत्रात मेनिक्युअर, पेडिक्युअर या ट्रिटमेंटच्या पलीकडे जाऊनही काही नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत. नावीन्यपूर्ण ट्रिटमेंट केल्या जात आहेत.
फिश पेडिक्युअर, ऑइल मेनिक्युअर तसंच अनेक प्रकारच्या स्पा थेरपीज अशा वैविध्यपूर्ण ट्रिटमेंट प्रत्येक सलोनमध्ये आपल्याला सहज दिसून येतात. पण वेळेअभावी तासन्तास सलूनमध्ये बसून या थेरपीजचा आनंद आपल्याला घेता येत नाही.
आपल्या स्वयंपाकघरामध्ये इतक्या सा-या गोष्टी असतात, ज्याचा वापर आपण अशा वेळी करू शकतो. पण या गोष्टींचा आपल्याला साफ विसर पडतो. या वस्तूंपासूनच आपण असे काही स्क्रबर्स, पॅक्स आणि लोशन बनवू शकतो ज्यामुळे आपल्या सौंदर्यात भर घालणा-या हातापायांच्या त्वचेची काळजी घरच्या घरी घेणं सोपं आहे. एका प्लॅस्टिकच्या भांड्यात दोन कप थोडं कोमट दूध घेऊन त्यात एक चमचा मीठ घालावं अणि हे मिश्रण स्क्रबरसारखं 5-7 मिनिटे हातापायांना लावल्यास त्वचेवरील मृतपेशी(डेड सेल) निघण्यास मदत होते. त्यानंतर मॉश्चराइजर नक्की लावावं.
2/3 कप गुलाब पाणी, 1/3 कप ग्लिसरीन, एक चमचा लिबांचा रस एकत्रित करून हे मिश्रण एका बाटलीत भरून कोरड्या आणि स्वच्छ जागेत ठेवावे आणि आठवड्यातून एकदा हातापायांना लावावं. त्यामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि कोरडेपणादेखील कमी होतो.
अर्धा कप संत्र्याचा रस, एक चमचा मध, हे मिश्रण 10 मिनिटे हातापायांना लावून ठेवावं. नखांवर हे मिश्रण योग्य पद्धतीने आणि अधिक प्रमाणात जरी लावलं तरी नखं चमकदार दिसतात.
एक केळं, एक चमचा मध आणि लिंबांच्या रसाचे थेंब हे मिश्रण क्रीमसारखं दिसेल अशाप्रकारे एकजीव करून घ्यावं. या क्रीमने मसाज करावा. शक्य झाल्यास दोन तास तसंच हातापायांवर ठेवावं. अन्यथा 15-20 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाकावं. त्वचेच्या कोरडेपणावर ही क्रीम खूप फायदेशीर ठरते.
मिनरल ऑइल किंवा कॅस्ट्रोल ऑइल (एरंडेल तेल), ग्लिसरीन, आपल्या आवडीचे बॉडी लोशन/मॉश्चरायझर इत्यादींचे समप्रमाणातील मिश्रण एकत्र करून ते एका बाटलीत भरून ठेवायचे. अंघोळ झाली की लगेच थोडेसे हातावर घेऊन जिथे जिथे राठ त्वचा आहे तिथे लावावे, लावताना ते त्वचेत चांगले जिरले पाहिजे. (मिनरल ऑइल कुठल्याही सुपरमार्केटमध्ये लॅक्सेटिव्ह सेक्शनमध्ये मिळते.)
अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे फ्रेश क्रीम एकत्र करून हे मिश्रण 15 मिनिटे लावून ठेवावं आणि नंतर कोमट पाण्याने धुवावं, हे मिश्रण लावल्यामुळे तुमची त्वचा खूप मऊ-मुलायम होते.
एक अंड, एक चमचा बदाम तेल आणि थोडंसं गुलाब पाणी एकत्र करून हे मिश्रण 10-15 मिनिटे लावल्यास त्वचेला टायटनिंग आणि पोषण मिळतं.
एक चमचा बदाम तेलात तीन चमचा साखर घालावी. गरज वाटल्यास तेलाचं प्रमाण वाढवू शकता. हे मिश्रण स्क्रबरसारखं 5-7 मिनिटे लावून ठेवावं. नंतर बॉडी लोशन नक्की वापरा.
एक चमचा (बेबी, ऑलिव, बदाम, तिळाचं) यांपैकी कोणतंही तेल, एक चमचा लिबांचा रस, एक चमचा मध.. हे मिश्रण पायाच्या भेगांवर लावल्यावर आराम मिळतो.
कोमट पाण्यात जाड मीठ किंवा एक लिंबू पिळून त्यात 10 मिनिटे पाय ठेवल्यास देखील खूप फायदा होतो. लिबांचा रस आणि पपईचा गर एकत्र करून 10 मिनिटे लावल्यास पायाच्या भेगा कमी होण्यास मदत होते.
हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि खाजरी होण्याची अनेक कारणे असतात. हवेतील आद्र्रतेचे प्रमाण कमी झाल्यामुळे हवा शुष्क होते. त्यामुळे तुमची त्वचासुद्धा कोरडी होते. त्वचेला भेगा पडू नयेत, रक्त येऊ नये. इतर गुंतागुंत होऊ नये, यासाठी मधुमेहींनी हिवाळ्यात त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचा कोरडी झाल्यास ती लालसर होते, त्यामुळे त्वचेवर फोड येतात. त्वचेला भेगा पडू शकतात आणि सालपटं निघू शकतात. या भेगांमधून जंतू तुमच्या शरीरात शिरू शकतात. त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. कोरडी त्वचा ही बहुधा खाजरी असते.
त्या ठिकाणी खाजवल्यामुळे त्वचेमध्ये फट पडून संसर्ग होतो. त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेतली तर बहुतेक त्वचाविकारांना प्रतिबंध घातला जाऊ शकतो वा त्यावर सहज उपचार करता येऊ शकतात. मधुमेहामुळे तुमची त्वचा कोरडी होते. त्यामुळे तुम्हाला सहज इजा होऊ शकते. त्याने संसर्ग होण्याची शक्यताही अधिक असते.
तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि ती निरोगी राहावी यासाठीच्या काही टिप्स :
तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवा. ज्यांच्या शरीरात ग्लुकोजची पातळी प्रमाणापेक्षा अधिक आहे, त्यांची त्वचा कोरडी असते.
अति गरम पाण्याने आंघोळ करू नका. तुमची त्वचा कोरडी असेल तर बबल बाथ टाळा. मॉइच्श्ररायझिंग साबणाची मदत होऊ शकेल. त्यानंतर चांगले स्कीन लोशन लावा. पण पायाच्या बोटांमध्ये लोशन नका लावू. कारण त्यात बुरशी वाढू शकेल.
त्वचा कोरडी असेल तर संरक्षण करा. कोरडया किंवा खाज-या त्वचेवर खाजवले असता त्वचेला भेग पडते आणि संसर्ग आतपर्यंत जातो. त्वचेचे पापुद्रे निघू नयेत म्हणून तुमची त्वचा ओलसर ठेवा.
त्वचा कापली असेल तर ताबडतोब उपचार करा. थोडंसं कापलं असेल साबण आणि पाण्याने जखम धुवा. डॉक्टरच्या सल्ल्याने प्रतिजैविक ओषधे आणि मलम लावा. निजंर्तुक कापसाने छोटया जखमा झाकून ठेवा. त्वचेला मोठा छेद गेला असेल, भाजले असेल किंवा संसर्ग झाला तर लगेचच डॉक्टरची भेट घ्या.
थंडी आणि वारा यापासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी तुमचे कान, चेहरा, नाक झाकून घ्या आणि टोपी घाला. त्याचप्रमाणे गरम हातमोजे आणि बूट घाला.
तुमचे पाय दररोज तपासून घ्या. कारण तेथील नसेला इजा झाली तर बधीरपणा येऊ शकतो. त्यामुळे त्यावरील जखमा, पोपडे किंवा छेद यांच्याकडे सहज दुर्लक्ष होऊ शकते. लिंबू सरबत, ताक यासारखी पेये भरपूर प्या. तृणधान्ये, फॅट्सचे प्रमाण कमी असलेले पदार्थ, फळे आणि भाज्या असा सकस आहार घेण्यावर भर द्या.
मधुमेहींनी अशी घ्यावी काळजी…
मधुमेहाचा शरीरातील प्रत्येक भागावर परिणाम होऊ शकतो. त्यात त्वचेचाही समावेश आहे. मधुमेह असलेल्या एक तृतियांश व्यक्तींना त्वचाविकार असतात किंवा होऊ शकतात. जेव्हा शरीरातील शर्करेचे प्रमाण वाढते, तेव्हा शरीरातील द्रवाचा ऱ्हास होतो. त्यामुळे त्वचा कोरडी होते. कारण तुमच्या शरीरातील अतिरिक्त साखर घालवण्यासाठी शरीर त्या पाण्याचे लघवीत रूपांतर करत असते. त्याचप्रमाणे जर तुमच्या हाता-पायांमधील नसांना घाम बाहेर काढण्याचा संदेश मिळाला नाही, तर तुमची त्वचा कोरडी होऊ शकते.