ग्रीष्म ऋतु म्हणजेच उन्हाळा. या ऋतुची चाहूल ही होळी झाल्यापासूनच लागते. तिथूनच पुढे एकेका दिवसांनी हळूहळू वातावरण तापू लागते आणि उष्णतेचे प्रमाण वाढू लागते. मराठी काल गणनेनुसार हा ऋतु चैत्र आणि वैशाख ह्या दोन महिन्यात येतो. तर इंग्रजी कालगणनेतले एप्रिलचा शेवटचा पंधरवडा, मे आणि जून महिन्याचा पूर्वार्ध हे महिने ह्या ऋतुत मोडतात.
या ऋतूत सूर्य हा उत्तरगोलार्धात कर्कवृताच्या जवळ पास असतो. त्यामुळे त्याची किरणे ही सरळ लंबरुपाने पडत असल्याने दिनमानातील उष्णतेचे प्रमाण वाढत असते. या ऋतूत दिवस मोठा आणि रात्र लहान असते. एकूणच सूर्य प्रकाशाच्या तीव्रतेने, उष्णतेने सारेच वातावरण तप्त होत असते. या वाढत्या उन्हानेच जमिनीवरचे पाण्याचे साठे आटू लागतात. नद्या कोरड्या पडतात तर विहीरींचे तळ दिसू लागतात.
या वाढत्या तपमानाचा परिणाम हा माणसांच्या शरीरावर होऊ लागतो. या ऋतूत साधारणपणे मानवी शरीरात निर्माण होणारे दोष हे पुढील प्रमाणे सांगता येतील.
माणसांची त्वचा रुक्ष होते.
शरीरातील वाताचे प्रमाण वाढू लागते. शरीरातील पाणी हे घामाच्या रुपाने मोठ्या प्रमाणात शरीरा बाहेर टाकले जात असते.
त्यामुळे थकवा जाणवतो. खाण्याची इच्छा कमी होते, भूकेचे प्रमाण फार कमी होते.
उष्णतेच्या वाढत्या प्रमाणाने शरीर लवकर दमते थकते आणि क्रियाशक्ती कमी होते.
निरुत्साह वाढू लागतो.
अग्निमांद्य, वातसंचय आणि शारीरिक बलाची कमतरता जाणवू लागते.
काही व्यक्तीच्या बाबतीत पित्ताचे आजार वाढतात तसेच रक्त दोषाचे, उष्णतेचे आजारही होणारी भीती निर्माण होते .
या दिवसात आहाराच्या संदर्भातही आपल्याला फार जागरूक राहावे लागते. त्याबाबत खालील गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.
या दिवसात हलका आणि तसेच कमी प्रमाणात आहार घ्यावा. पाणी जास्तीत जास्त प्यावे
आहारात मधूर आंबट, खारट रसांची द्रव्ये अवश्य घ्यावीत.
तुरट, खारट, तिखट कडू रसाचे प्रमाण कमी असावे.
आहारात भाकरी पोळी भात असावा
बाजरी ही उष्ण असल्याने या दिवसात बाजरी खाऊ नये.
दूध तूप ताक दही ह्याचा वापर करावा. अदमुरे ताक भरपूर घ्यावे.
या ऋतूत कैरी, आवळा, कोकम करवंदे ह्या सारखी आम्लरसाची फळे भरपूर खावीत. कैरीचे लोणचे पन्हे, जॅम, ह्याचा वापर करावा.
फार मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. पण धने जिरे हे थंड असल्याने त्यांचा वापर करावा.
माठ, चालवत, चुका, तांदुळजा, पालक या सारख्या पालेभाज्या वापराव्यात.
भेंडी, पडवळ दोडका घोसाळी या सारख्या फळेभाज्याही वापरावयात
रताळी, गाजर, बीट, सुरण अश्या कंदमुळांचेही आवर्जून सेवन करावीत.
या ऋतूत डाळीचा वापर कमी करावा.
उन्हाळ्याच्या दिवसात कांदा हा विशेष करुन खावा, करण तो शीतवीर्य असून सर्व प्रकारच्या उष्णतेच्या विकारांवर अत्यंत उपयुक्त व गुणकारी आहे. कांदा भाजून किंवा कच्चाही खाण्यास हरकत नाही. लसूण मात्र उष्ण असल्याने त्याचा या दिवसात फार वापर करू नये.
या दिवसात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने जास्तीत जास्त द्रव पदार्थाने सेवन करावे. उदा. विविध फळाचे रस, नारळाचे पाणी, सरबते नीरा, ताक लस्सी इ.
लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती, आजारी माणसे यांना उष्णतेचे प्रमाण कमी करण्यासाठी नाचणीची खीर/ आंबिल द्यावी.
या ऋतूत उपलब्ध होणारी विविध रसांची, गोडीची फळे आवर्जून सेवन करावीत. जसे की द्राक्षे, डाळींब, केळी, आंबा,कलिंगड, टरबूज, काकडी इ.
या दिवसात थंड पेये आणि आईस्क्रीम, लस्सी सारखे पदार्थ खावेसे/ प्यावेसे वाटत असले तरी त्याचे प्रमाण मात्र मर्यादित असावे.
मांसाहारी लोकांनी या दिवसात अल्प प्रमाणात मांसाहार करावा.
या दिवसात माठातील थंड पाणी प्यावे. फ्रीजचे पाणी पिणे शक्यतो टाळावे.
पाण्यात वाळा, चंदन, मोगरीची फुले, इ. घालून तयार होणारे सुगंधीत पाणी प्यावे..
या ऋतूमानाचा विचार करता निर्माण होणारे शारीरिक दोष, आजार, आहार पाणी ह्याचा विचार केल्यानंतर इतर काही सर्व सामान्य गोष्टी बाबतही कोणती दक्षता घ्यायला हवी
ह्याचा विचार केला असता असे सांगता येईल की –
- बाहेरचा उष्मा सहन व्हावा म्हणून घरात पंखे लावले जातात. ऑफिसेसमध्ये एअरकंडिशन्सर्स वापरले जातात. काही जागी वाळ्याचे पडदे लावून त्यावर पाणी मारून गारवा निर्माण केला जातो.
- या दिवसात उन्हाचे वेळी शक्यतो बाहेर पडू नये . जर आवश्यकता असेल तर डोक्यावर टोपी, छत्री, असावी. डोळ्यावर गॉगल वापरावा.
- अंगात सैल सुती व शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. गडद रंगाचे कपडे वापरू नयेत.
- या दिवसात केवळ शांत आणि कमी उन्हाच्या वेळी फिरण्याचा व्यायामच करावा, पोहणे हा जास्त चांगला व्यायाम ठरू शकतो.
- दुपारच्या वेळी कामे करणे अशक्य असल्याने काही कामे उन्हे तापण्यापूर्वीच करून इष्ट ठरते.
- या दिवसात रात्र लहान आणि दिवस मोठा त्यामुळे काही लोकांची झोप अपुरी होते.
- त्यांनी दुपारच्या वेळी झोप घेण्यास हरकत नाही. रात्री मोकळ्या हवेत अंगणात वा गच्चीवर झोपावे.
- अशा या उन्हाळाचा उगाच मोठा बाऊ न करता त्यावर योग्य ते उपाय करुन, काळजी घेऊन, खाण्या पिण्याची पथ्ये सांभाळून आपण तो सुसह्य करू शकतो.
– मंजिरी गोखले