त्यादिवशी मी ऑफिसमधून घरात आले आणि मला एक आश्चर्याचा धक्काच बसला. आता आश्चर्याचा धक्का म्हणण्याचे कारण असे की आज मुले टीव्हीच्या पुढ्यात नव्हती, का मोबाईलवर वरही खेळत नव्हती. तर चक्क मुलं त्यांच्या आजी सोबत जुनाच परवचा नव्या पद्धतीत म्हणत होती.
आजीने विचारले, “काय रे सागर वर्षाचे महिने किती आणि कोणते ?’
त्यावर तो लगेच हो म्हणाला, “वर्षाचे महिने बारा आणि त्याने लगेच जानेवारीची गाडी थेट नेऊन डिसेंबरच्या स्टेशनावर थांबवली. आजी म्हणाली, “अरे हे इंग्रजी महिने झाले. मला मराठी महिने सांग?’ आणि तिथे मात्र सागरची गाडी अडली. त्याला मराठी महिने माहित होते. पण मराठी महिन्यांची नेमकी सुरूवात आणि शेवट ह्यात तो कन्फुज्ड होता.
तेव्हा नीता पुढे आली आजी मी सांगते, असे म्हणून तिने चैत्र, वैशाख, जेष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष , पौष, माघ आणि फाल्गून अशी मराठी महिन्यांची माहितीही सांगितली.
तिचे कौतुक करीत आजी म्हणाली “व्हेरी गूड.. आता ऋतु किती आणि कोणते? सागरने उत्तर दिले. हे काय सोपे तर आहेत. उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा.’
“छान! पण मुलांनो तुम्हाला हे माहित आहे का की, आपल्याकडे आयुर्वेदाने कालमानाचा, ऋतुमानाचा विचार करुन एकूण सहा ऋतु सांगितलेले आहेत. ते म्हणजे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर ऋतु.
प्रत्येक ऋतुमाना प्रमाणे वातावरणात जे बदल घडतात त्यांचा विचार करून आपल्या आयुर्वेदांनी त्या त्या ऋतुमानातील आहार विहार याबाबत काही मार्गदर्शन केलेले आहे. “आजी म्हणजे नेमकं काय ग?’ मुलांनी मोठ्या उत्कंठतेने विचारणा केली. तेव्हा मुलांना समजावीत आजी म्हणाली, थांबा आपण असं करूया. आपण एकेका ऋतुमानाचा आणि त्याचा आरोग्याशी असलेला संबंध पाहूया.
ऋतु मराठी चैत्र वैशाख ह्या महिन्यात येतो तर ह्याचा इंग्रजी महिन्याचा काळ हा साधारणपणे
फेब्रुवारीचा शेवट, मार्च आणि एप्रिलचा पूर्वार्ध असा येतो.
वसंत ऋतु हा उन्हाळ्याच्या सुरवातीस सुरू होतो. त्यावेळी वातावरणातील थंडीचे प्रमाण कमी कमी होते असते तर तिकडे उष्णता वाढत असते. या सुमारास दिनमान वाढते आणि रात्र लहान होत असते. शिशिरातील कडाक्याच्या थंडीमुळे वनस्पतींची झालेली पानगळ, ही वाढत्या उष्णतेमुळे पुन्हा नव्या रुपाने फुटू लागते. ह्यालाच “वसंत फुलला’ असे म्हणतात. जसे की आंब्यांच्या झाडांना मोहोर येतो.
वेगवेगळे वृक्ष फुलू लागतात आणि झाडावर विविध फुले फुलू लागतात. वातावरण सुगंधित होऊ लागते. कोकिळेचे मधुर कुंजन कानी पडते. वातावरण प्रसन्न होते. ह्या कारणासाठीच वसंतऋतुराज म्हणजे ऋतुंचा राजा असे म्हणतात.
सभोवतालचे वातावरण जरी असे प्रसन्न होत असले तरी वाढत्या उष्णतामानाचे मानवी शरीरावर मात्र थोडेफार वेडेवाकडे परिणाम होऊन काही शारीरिक दोष निर्माण होतात. त्यामुळे ह्या ऋतुतील आरोग्य चांगले राखण्यासाठी आपल्याला काही आहार विहार ह्यांची बंधने पाळावी लागतात.
या कालावधीत कोणते त्रास होतात, त्यासाठी काय खावे काय खाऊ नये ह्या संदर्भातही आयुर्वेदाने आपल्याला काही मार्गदर्शन केलेले आहे .
या ऋतूमध्ये उदभवणारे शारीरिक दोष-
- शिशिरातील थंडीच्या निमित्ताने खाल्या गेलेल्या मधूर आणि स्निग्घ पदार्थांमुळे शरीरात कफाचे प्रमाण वाढलेले असते. तो कफ वसंतऋतूतील वाढत्या उष्णतेमुळे द्रवू लागतो आणि कफप्रकोपाचे प्रमाण वाढते.
- सर्दी खोकला, दमा हे आजार वाढतात.
- या काळत गोवर कांजिण्या या सारखे उष्णतेचे आजार लहान मुलांमध्ये आढळतात.
- उष्णतेचे प्रमाण वाढत असल्याने माणसाची भूक मंदावते.
- वातावरणातील वाढत असलेलेल्या उष्णते मुळे शारीरिक थकवा येणे, आळस येणे, मनोबल कमी होणे, उत्साह कमी होणे, असे दुष्परिणाम दिसू लागतात.
- या सारख्या छोट्या गोष्टीकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्यांचे कदाचित मोठ्या रोगात वा आजारात परिवर्तन होऊ शकते. म्हणून “स्टीच इन टाईम सेव्ह्स नाईन’ ह्या इंग्रजी म्हणी प्रमाणे वेळीच काळजी घेणे फायदेशीर ठरते.
या ऋतुमानाचा विचार करता आपण कोणता आहार घ्यावा, काय खावे प्यावे, काय खाऊ नये, काय करावे आणि काय करू नये याबाबत आयुर्वेदाने जे मार्गदर्शन केलेले आहे ते पुढील प्रमाणे-
- या ऋतुमध्ये भूक मंदावू लागलेली असते, तसेच कफप्रकोपाचे आजारही डोके वर काढत असतात. त्यामुळे या दिवसात हलका आणि कमी आहार घेणे हिताचे असते.
- या ऋतुत पचनास जड अशी पक्वांने आणि जास्त आहार घेऊ नये रोजच्या आहारात पोळी भाकरी ह्यांचा अलटून पालटून वापर करावा. गव्हाचे भाजके फुलके, खाकरा यासारखे पदार्थ खाणे योग्य ठरते.
- ऋतूत नव्याने आलले धान्य, डाळी ह्यांचा वापर न करता जुन्या साठवणीताल धान्याचाच वापर करणे इष्ट असते.
जर काही वेळा नाईलाजच असेल तर असे धान्य हे प्रथम भाजून घेऊन मगच वापरावे. कारण भाजल्याने धान्यातील अभिष्यंदि व कफकर गुण कमी होतात. - भात हा कफकर असल्याने भाताचा वापर त्या ऋतुमध्ये अत्यंत कमी करावा.
- आहारात विविध म्हणजेच तिखट खारट आंबट, अशा रसांचा समावेश असावा. त्या प्रकारच्या पदार्थांची आवर्जून निवड करावी.
- हरभरा, तूर, मूग, मसूर यासारख्या डाळी या कपध्न असल्याने त्यांचा स्वैपाकात जास्त वापर करावा.
- हुलगा हे कडधान्य या ऋतुत जास्त वापरात आणावे. त्याचे कळण, पिठले, उसळ हे पदार्थ तयार करून ते मुद्दाम खावेत.
- कारण हुलगा कफध्न तर आहेच तसाच तो कफाच्या त्रासावर एक औषधी म्हणूनही उपयुक्त आहे.
- कवठ आवळा लिंबू चिंच कैरी ह्या सारख्या तुरट आंबट फळांचा जेवणात आणि खाण्यात वापर करावा.
- तसेच या काळत तांदुळजा, मेथी, कारले या कडू चवीच्या भाज्या व पडवळ, मुळा, वांगी ह्यांचा वापर करणे एक औषधी पदार्थ म्हणून उपयुक्त ठरू शकतो.
- या ऋतुत महिलांना करावासा वाटणारा मसाल्यांचा वापर हा हितकारी ठरतो. कारण त्यातील हिंग, मोहरी, आले मिरची दालचिनी लसूण हे पदार्थ अग्निवर्धक म्हणजेच भूक वाढविणारे आणि कफला विेरोघ करणारे आहेत.
- या दिवसात तूपाचा वापर कमी करावा.
- या सुमारास मध, काकवी ह्या सारखे गोड पदार्थ खावेत. मध उष्ण रुक्ष आणि कफध्न आहे. मात्र मधा संदर्भात एक दक्षता घ्यावी तो कधीही गरम पदार्थासोबत घेऊ नये.
- या दिवसात आपल्या आहारात दूध, अदमुरे ताक भरपूर प्यावे, शक्यतो दह्याचा वापर कमी करावा.
- मांसाहारी लोकांनी जलचर प्राण्यांचे मांस (मासे खेकडे) खाऊ नये. जंगली प्राण्यांचे मांस खावे.
- प्रामुख्याने या ऋतूत आहाराचे प्रमाण हे कमी मात्रेचे असावे.
- या दिवसात पाण्याचे दुषित होण्याचे प्रमाण विविध कारणांनी वाढत असल्याने पाणी हे उकळून गार करुन प्यावे. फ्रिजचे पाणे शक्यतो टाळावे, माठाचा किंवा फडके लावून गार केले पाणी प्यावे. तसेच या दिवसात उसाचा गार रस, आईस्क्रीम, शीतपये पिण्याचा होत असलेला मोह टाळणेच हिताचे असते.
- या ऋतूत आहाराचा जसा विचार करावा लागतो तसाच विहार आणि काय करावे काय करू नये ह्याचाही विचार हा करावाच लागतो. जसे की-
- या दिवसात गार वातावरणात बसावे असे जरी वाटत असले तरी सतत एअरकंडिशन खोलीत बसणे, पंख्याची सतत हवा घेणे हे आरोग्यास हितकारक नाही. सतत पंख्याखाली बसल्याने डोके दुखणे, अंग जड होते. सर्दी, पडसे खोकला होणे असे त्रास होतात.
- या दिवसात अंधोळीला सुद्धा फार गार पाणी न वापरता कोमट पाणी वापरणेच हितकारक ठरत असते.
- या दिवसात सकाळ पेक्षा संध्याकाळी फिरायला जावे. काही लोकांच्या प्रकृतीस सकाळची दव पडलेली हवा अपाय कारक ठरते.
- या दिवसात साधे सोपे व्यायाम प्रत्येकाने अवश्य करावेत. चालणे, सूर्यनमस्कार घालणे, दोरीवरच्या उड्या मारणे, विविध खेळ खेळणे हे उत्तम.
- या ऋतुमानात शक्यतो दिवसा झोपू नये त्यामुळे कफाचे त्रास होऊ शकतात.
- कितीही काळजी घेतली, पथ्ये सांभाळली तरी काही व्यक्तीना कफाचा त्रास, सर्दी पडचे डोकेदुखी ह्यासारखे आजार होऊ शकतात. त्यावर काही घरगुती इलाज करणे शक्य असते. ते कोणते ?
तर साधारणपणे असे सांगता येईल की-
- लहान मुलांच्या बाबतीत कफ झाला तर तो बाहेर काढण्याचा मार्ग म्हणजे काढा घेणे व शौचावाटे त्याचा निचरा करणे.
- किंवा कोंमट पाण्यात र्मीठ घालून ते पाणी पिऊन वमन म्हणजे उलटी काढून कफ बाहेर पाडणे. हा मार्ग मोठ्यांना वापरता येतो.
- सर्दी झाली असेल, नाक चोंदले असेल तर ज्वारीच्या पिठाची धुरी घ्यावी.
- वेखंडाची पावडर थोड्या प्रमाणात तपकिरी सारखी ओढावी.सर्दीने डोके दुखत असेल तर सुंठीचा/ जायफळाचा लेप कपाळावर द्यावा.
- धने जिरे मिरे, हे पदार्थ पचन शक्ती वाढविण्यास उपयुक्त असल्याने त्यांचा स्वैपाकात वापर करावा. धने जिरे ह्यांचे पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता आटोक्यात राखता येते.
- सर्दी, पडसे, व ताप ह्यावर त्रिभूवन कीर्ती, चतुर्भुजरस या औषधांचा वापर चांगलाच परिणामकारक ठरतो.
- आपण या ऋतुमानातले आपले दैनदिंन आरोग्य हे चांगले राखण्यासाठी ह्या सर्व गोष्टीविचारात घेणे, त्यांचा सुयोग्य वापर करणे आणि प्रसंगी वैद्य, डॉक्टर ह्याचा सल्ला घेणे हे केव्हाही उत्तमच. पण जे आपल्या हातात सहज करता येण्यासारखे आहे, ते का करू नये? कारण उत्तम आरोग्य ही आपली संपत्ती आहे. ती आपणच राखायला आणि टिकवायला हवी नाही का?
– मंजिरी गोखले