हिवाळ्यातील दमट, कोंदट वातावरणानंतर येणारी थंडी ही खरं तर बहुतेकांना आवडते; परंतु काहींना मात्र हिवाळा हा त्रासाचा वाटतो. प्रामुख्याने लहान मुले व वृद्धांना हिवाळ्यामध्ये अनेक त्रासदायक आजारांना सामोरे जावे लागते. परंतु तरुणांसाठी मात्र थंडी ही अनेकविध आरोग्यदायक उपक्रमांना चालना देणारी असते. लहान मुलांना थंडी आवडत असली तरी थंडीमुळे होणारा आणि त्यांना त्रासदायक ठरणारा आजार म्हणजे सर्दी. हिवाळ्यामधील थंड आणि कोरडी हवा ज्यावेळी नाकाच्या छिद्रांमधून आत जाते, त्यावेळी ती नाकाच्या आतील पातळ त्वचा कोरडी करून आत जाते. लहान मुलांमध्ये पाण्यात अधिक वेळ खेळणं, थंड पाणी पिणं, गार वाऱ्यात राहणे ही वारंवार सर्दी होण्याची कारणे आहेत. तेव्हा थंडीतील या आजारांपासून मुलांना वाचवण्यासाठीचे काही उपाय इथे देत आहोत. ( Save children from winter illnesses)
लहान मुलांना थंडी आवडत असली तरी थंडीमुळे होणारा आणि त्यांना त्रासदायक ठरणारा आजार म्हणजे सर्दी. हिवाळ्यामधील थंड आणि कोरडी हवा ज्यावेळी नाकाच्या छिद्रांमधून आत जाते, त्यावेळी ती नाकाच्या आतील पातळ त्वचा कोरडी करून आत जाते. या भागात योग्य प्रमाणात ओलावा राहावा म्हणून शरीर आपसूकच इतर ठिकाणच्या जलीय अंशाला पाणीसदृश घटकाला नासारंध्रांच्या ठिकाणी नाकाच्या छिद्रांपर्यंत पाठवायला सुरुवात करते. याचेच रूपांतर सुरुवातीला नाकातून पाण्यासारखा स्रव येणे, नंतर शेंबूड जमणे आणि नंतर त्याचे रूपांतर बोलीभाषेत ज्याला सर्दी, हिंदीत जुकाम आणि संस्कृतमध्ये प्रतिश्याय म्हणतात, अशा आजारात होते. हे पाणी शरीरातील बिघडलेल्या पित्तासमवेत मिसळून बाहेर येऊ लागतं तेव्हा पिवळसर रंग येऊ लागतो. हाच स्रव थोडा कमी पातळ होत होत घट्ट होऊ लागला तर आयुर्वेदात सिंघाणक आणि बोलीभाषेत शेंबूड म्हणतात तसा बाहेर येऊ लागतो. लहान मुलांमध्ये पाण्यात अधिक वेळ खेळणं, थंड पाणी पिणं, गार वाऱ्यात किंवा वातनुकूलित वातावरणात राहाणं ही वारंवार सर्दी होण्याची कारणं असतात.
पिण्याचं पाणी गरमच वापरावं, उबदार वातावरणात राहावं, थंडी रोखणारे गरम कपडे वापरावेत, थंड पाणी पिणे टाळावे किंबहुना चहासारखं गरम गरम पाणीच पिणं, तुलनेने कमी ओलसर अथवा कोरडे अन्न खावं. या काळजीबरोबरच साधं तिळाचं तेल किंचित सैंधव मीठ घालून गरम करून छाती व पाठीला मालीश करणं फार उपयुक्त ठरतं. अशा वेळी लोकरीचे उबदार कपडे वापरणं व घराबाहेर पडण्याअगोदर कोमट केलेलं तिळाचं तेल नाकपुडयांना आतून लावणं अगत्याचं ठरतं. पोटातून घेण्याच्या औषधांमध्ये सीतोपलादी चूर्ण मध किंवा लोण्याबरोबर द्यावं आणि अडुळसा, तुळस, बनफ्शा आदी औषधांनी तयार केलेल्या मिनकॉफ कफ सिरपचा वापरही उपयोगी ठरतो. या सर्वामुळे गार हवेचा होणारा त्रासही बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
सर्वसाधारणपणे याची सुरुवात नाकातून पाणी गळण्यापासून होते. हळूहळू घशात कफ जमू लागतो. खूप प्रयत्न करून, खाकरून तो काढण्याचा प्रयत्न केला तरी अतिप्रयत्नांनंतर थोडासा कफ सुटतो, अत्यंत चिकट स्वरूपाचा हा कफ थोडासा बाहेर पडल्यानंतर काही काळ बरं वाटतं. पण पुन्हा तसाच त्रास सुरू होतो. सोबत श्वासोच्छवासाच्या क्रियेसही त्रास जाणवू लागतो. कफ सुटल्यावरचं बरं वाटणं अल्पकाळच टिकतं. पुन्हा चिकट कफ एकत्र होतो. श्वासोच्छवासाच्या वेळी घुरघुर वाढते, पोट फुगतं, तोंडाची चव जाते, खोकल्याची उबळ येते आणि बरंच खोकल्यानंतर थोडासा आणि तोही अत्यंत चिकट असा थोड्या प्रमाणात कफ बाहेर पडतो. तब्येत ठीक झाल्याची जाणीव होते, पण तीही थोड्या वेळापुरतीच. पुन्हा कफ जमणं, खोकल्याची उबळ येणं, दम लागणं, असं सातत्याने चालूच राहतं. कालांतराने तर छातीचा पिंजराही गोलाकार होऊ लागतो.
काय उपाय कराल?( Save children from winter illnesses)
छाती व पाठ गरम पाण्याच्या पिशवीने शेकल्याने तात्पुरतं बरं वाटतं आणि तेही अगदी तात्पुरतंच! साधारणत: 20 ते 25 मिनिटांत श्वास घेताना घुरघुर आवाज येणं, झोपल्यावर त्रास वाढणं व उठून बसल्यावर थोडं बरं वाटणं, त्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटणं, श्वास घेताना कष्ट झाल्याचं जाणवणं अशी स्पष्ट लक्षणं पुन्हा दिसू लागतात. अशा वेळी तत्काळ फायदा मिळतो तो म्हणजे छातीला व पाठीला गरम केलेल्या तेलाने मालिश करूनच. फुप्फुसांच्या आतील भागाला चिकटून असलेला चिकट कफ आतल्या भिंतींपासून सुटायला मदत होते आणि गरम पाण्याच्या पिशवीच्या मदतीने मिळालेल्या उष्णतेमुळे हा कफ पातळ होऊन सुटू लागतो. पातळ झालेला कफ मुखावाटे थुंकून टाकता येतो व आजारी व्यक्तीला आराम मिळतो.
सर्दी पडसे असो वा दमा असो कोणताही आजार बरा होण्यासाठी औषधोपचार करताना वैद्यकीय सल्ला अवश्य घेतलाच पाहिजे. याचं कारण असं की, अनेक औषधं एका आजारात वापरता येत असली तरीही नक्की कोणतं वापरलं जावं याचबरोबर ती पूर्णत: सुरक्षित आहेत ना, याचीही खात्री करून घेणं आवश्यक असतं.
तरुण वयात ज्या व्यक्तींना वाऱ्यावर जाऊन आल्यावर किंवा दमट जागेत बसल्यामुळे क्षयाचा त्रास होतो, त्यांनी तालिसादी चूर्ण व श्वासकुठार यांचा वापर जरूर करावा. पिण्यासाठी थंड पाणी पूर्णत: टाळावं. गरम पाण्याने गुळण्या करणं व पिण्यासाठी गरम पाणी वापरणं इष्ट आहे. प्रौढ व्यक्तींनी दम्यासाठी छातीला मीठ घातलेलं तिळाचं तेल लावून शेकून घ्यावं व सातत्याने गरम-कोमट पाणी पिणं हे उपयोगी व लाभदायक ठरतं.अनेकदा असं म्हटलं जातं की, आयुर्वेदिक औषधं हळूहळू काम करतात व रोग बरा होण्यास वेळ लागतो, परंतु असं सरसकट विधान चुकीचं ठरतं. उत्तम व त्वरित लाभ देणारी औषधंही आयुर्वेदात आहेत आणि तसा लाभ मिळण्यासाठी ती कोणत्या पद्धतीने बनवलेली आहेत, ती मानकीकृत (स्टॅंडर्डाइज्ड) आहेत किंवा नाहीत, शुद्धतेची खात्री देणारे मापदंड पाळून बनविलेली आहेत की नाहीत हे पाहणं आवश्यक असतं.
आयुर्वेद क्षेत्रात स्टॅंडर्डायझेशन मानकीकरण नसल्याचं बोललं जात असलं तरी ते पूर्णपणे सत्य नाही. कच्च्या मालाच्या निवडीपासून ते त्यावर होणारे संस्कार आणि विक्रीसाठी तयार झालेलं अंतिम उत्पादन या प्रत्येकासाठी मानकीकरणाचे एस.डी.एस. नावाने ओळखले जाणारे निकष उपलब्ध आहेत.
या मानकांतर्गत बनविण्यात आलेल्या महालक्ष्मीविलास रस, सूतशेखर रस, श्वासकास चिंतामणी रस, लक्ष्मीविलास (नारदीय गुटी), सितोपलादी चूर्ण, तालीसादी चूर्ण, कफकुठार रस, श्वासकुठार रस, कुमारी आसव, गोदंती भस्म आदी औषधांचा वापर वैद्यकीय सल्ल्यानुसार करणं लाभदायक ठरतं. ज्या व्यक्तींना वारंवार सर्दी, पडसं होण्याची प्रवृत्ती निर्माण झाली असेल किंवा ज्यांना दम्याचा वारंवार त्रास होत असेल, अशांसाठी शरीरातील सर्व घटकांना विशेषत: दुर्बल झालेल्या फुप्फुसांना बळ मिळावं आणि वारंवार त्रास होऊ नये यासाठी सुवर्णवसंत मालती हे औषध अत्यंत उपयोगी ठरतं. याबरोबरच एखाद्या चांगल्या उत्पादनाचा च्यवनप्राश सेवन केल्यास वारंवार सर्दी, खोकला होणाऱ्यांना किंवा ज्यांना दम्याचा जुनाट त्रास आहे अशा व्यक्तींना पुन्हा नव्याने ताकद व जोम देणारं ठरतं. अर्थात, या सर्वासाठी वैद्यकीय सल्ला घेणं हे निश्चितच आवश्यक आहे.( Save children from winter illnesses)
शब्दांकन : अशोक बालगुडे