‘मकर संक्रांती’च्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो.पौष महिन्यात , हिंदूंच्या ‘संक्रांत’ या सणाच्या आदल्या दिवशी, म्हणजे १४ जानेवारीला भोगी हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. हा सण जानेवारीत मध्यान्हात येतो. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा! भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार जेवणाचा बेत आखला जातो.
भोगी देणे म्हणजे काय ?
भोगीच्या दिवशी वरील पदार्थ करून सुवासिनींना जेवणासाठी बोलावले जाते. शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात.
माणसांच्या परस्पर संबंधांमध्ये स्नेह व माधुर्य यावे, असा संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो. उत्तर भारतात संक्रातीला खिचडी संक्रांती असे म्हणतात. विशेष करुन पंजाबमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला ‘लोहरी’ हा सण जल्लोषात साजरा केला जातो. तर बंगालमध्ये संक्रांतीला तिळुआ संक्रांती व पिष्टक संक्रांती असे म्हणतात. दक्षिणेत याच वेळी पोंगळ (पोंगल) नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो.
भोगी, संक्रांतीची लगबग
भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे. ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, पावटे-गाजर- हरभरे- वांगी या सर्वांची मिळून भाजी करतात. या भाजीसोबत बाजरीची भाकरी देखील खावी. बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते. घरातील देवांची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. भोगीच्या दिवशी केस धुऊन स्नान करण्याची परंपरा आहे.
तामिळनाडूत हा सण “पोंगल” व आसाम मध्ये “भोगली बिहू”
या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो. मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात. या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सज्ज होतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण “पोंगल” व आसाम मध्ये “भोगली बिहू” ,पंजाब मध्ये “लोहिरी “, राजस्थान मध्ये “उत्तरावन” म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगिकारल्या जातात.
The post sankranti special : ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ appeared first on Dainik Prabhat.