अंजली खमितकर
लहान मुलांना पौष्टिक अन्नपदार्थ दिल्याने त्यांची प्रतिकार शक्ती वाढते, त्यांची एकूणच वाढ चांगली होती, असे म्हटले जाते. त्यातून एका दूधाला सकस आहार समजले जाते. परंतु केवळ दूध आणि बिस्किटे असाच मुलांचा आहार असेल तर पालकहो सावधान! कारण दोन ते चार वर्षांच्या मुलांमध्ये याप्रकारच्या आहाराच्या सवयीमुळे “मिल्क बिस्किट सिंड्रोम’ दिसून येत आहे. त्याला “मिल्क आणि कुकी रोग’ असेही म्हटले जाते.
साखर आणि दुग्धजन्य पदार्थाचे अधिक प्रमाणात सेवन, त्यातूनही रात्री अशा पदार्थांचे सेवन केल्याने हा “सिंड्रोम’ जास्त वाढीला लागल्याचे दिसून आले आहे. पुण्यातील एका दोन वर्षे वयाच्या बाळाला बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि कोरडा खोकला अशा समस्या भेडसावत होत्या. त्याचे वजन वयाच्या तुलनेचे योग्य होते, परंतु त्याच्यातील प्रतिकारशक्ती आणि ताकद कमी होती.
या मुलाच्या खाण्या-पिण्याच्या सवयीचे जेव्हा निरीक्षण करण्यात आले, त्यावेळी त्याचा आहार म्हणजे रोज एक लिटर बाटलीबंद दूध आणि बिस्किटे होते. त्याच्या आहारात फळे, भाजीपाला याचा अजिबातच समावेश नव्हता. चतुरस्र आहार न मिळाल्याने त्या मुलाच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. त्याच्या त्वचेवर पुरळही येत होते. थोडक्यात, भरपूर प्रमाणात दूध, बिस्किट, प्रक्रिया केलेले खाद्य आणि बेकरी पदार्थांचे सेवन करत असल्याचे दिसून आले.
याशिवाय शीतपेय, सोडा, प्रक्रिया केलेले ज्युस, दुधाचे अधिक प्रमाणात सेवन, आईस्क्रीम, चॉकलेट आणि साखरेचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ यांचे मोठया प्रमाणात आहारातील सेवन हे “मिल्क बिस्किट सिंड्रोम’ या आजाराचे मुख्य कारण आहेत. वाहते नाक, खोकला, घसा खवखवणे, बद्धकोष्ठता आणि थकवा यासह बालपणातील अनेक आजार या अवस्थेशी संबंधित आहेत.
मुलांमध्ये बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. वयाच्या सहा महिन्यांनंतर, घन पदार्थांची ओळख करून देण्याची वेळ येते तेव्हा मुलांना बिस्किटांची ओळख करून दिली जातात. कोठेही बाहेर गेल्यावर मुलांना भूक लागल्यास अन्य तयार केलेल्या अन्न पदार्थांऐवजी बिस्किट, ब्रेड यांना प्राधान्य दिले जाते. कॅरी करायला सोपे आणि बनवावे लागत नाही, शिळे होत नाही हा त्यामागचा उद्देश असतो. ही बिस्किटे बऱ्याचदा दुधाबरोबर खायलाही अनेकजण रोज सकाळी न्याहारीप्रमाणे देतात. मुलेही सकाळी भूक लागल्याने ती भागवण्यासाठी बिस्किटांचे पुडेच्या पुडे संपवतात.
खाण्याच्या या चुकीच्या पद्धतीमुळे मुलांमध्ये हा “सिंड्रोम’ तयार होते. मुळात बिस्किटे हे बेकरी प्रॉडक्ट आहेत. त्यात असणारा मैदा हा आरोग्याला हानीकारक असतो. मूल सहा महिन्यांचे झाले, की त्याला पूरक पदार्थ देण्याला सुरूवात केली जाते. तेव्हा त्यास पौष्टिक पदार्थ देणे गरजेचे आहे. योग्य संतुलित आहार हे आपल्या बाळाच्या वाढीसाठी उत्तम आहे. मुळात रात्री झोपेचे आठ तास संपल्यानंतर सकाळचा पहिला आहार हा पौष्टिकच असावा असा सर्वसामान्यपणे नियम आहे. त्यातून लहान मुलाच्या आहारामध्ये तृणधान्ये आणि डाळींचे मिश्रण आणि विविध प्रकारच्या शाकाहारी आणि फळांचा समावेश असावा. परंतु त्याचा अभाव असल्याने हा “सिंड्रोम’ वाढीला लागतो.
याविषयी बोलताना, नवजात शिशू आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारीख म्हणतात की, “बाळाला सहा महिन्यानंतर देण्यात येणाऱ्या आहारात घन पदार्थ पौष्टिक असावेत, असा विचार करून अनेक जण आपल्या मुलांना दूध आणि एक बिस्किट देतात. परंतु हे मिश्रण मुलांसाठी निकृष्ट दर्जाचे अन्न आहे. जर मुलाने दूध, बिस्किटे किंवा प्रक्रिया केले आणि साखरेचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ खाल्ले तर मुलाला “मिल्क बिस्किट सिंड्रोम’ होण्याची लक्षणे दिसू शकतात. वारंवार सर्दी, छातीत कफ, खोकला किंवा घसा खवखवणे अशी ही लक्षणे आहेत. बद्धकोष्ठतेने पीडित उपचारासाठी आलेल्या मुलांमध्ये सुमारे 50% मुले “मिल्क बिस्किट सिंड्रोम’चे शिकार असल्याचे दिसून येते. ही मुले शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि लोहाची कमतरता ही दीर्घकालीन समस्यांना आमंत्रण देऊ शकते. दूध आणि बिस्किटे हे मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाहीत.