डॉ. शिरीष हिरेमठ (एमएस), कन्सल्टन्ट कार्डिओलॉजिस्ट
कोव्हिड-19 नंतरच्या काळात आरोग्यव्यवस्थेचे भवितव्य कसे असेल याविषयीची गहिरी चिंता महामारीच्या दुस-या टोकाशी आवासून उभी आहे. उपकरणांच्या टंचाईचा निषेध करणारे डॉक्टर्स आणि आरोग्यसेवा उपलब्ध होत नसल्याच्या बिगर-कोव्हिड रुग्णांच्या तक्रारी यांबद्दलच्या बातम्यांनी भारतीय आरोग्यव्यवस्थेला कित्येक दशकांपासून भेडसावणा-या एका अधिक तातडीच्या समस्येवर प्रकाशझोत टाकला आहे.
ही समस्या आहे असंसर्गजन्य आजारांच्या (non–communicable diseases-NCDs) आरोग्यव्यवस्थेवर असलेल्या भाराची. वर्ल्ड हेल्थ फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, ‘’भारतातील एकूण प्रौढ मृत्यूंपैकी 60 टक्के मृत्यू हे कार्डिओ व्हॅस्क्युलर आजारांसारख्या (CVDs) असंसर्गजन्य आजारांमुळे होतात व त्यातील एक चतुर्थांशांहून अधिक मृत्यूंना (26%) कार्डिओ व्हॅस्क्युलर आजार जबाबदार असतात.‘’ आज, या रुग्णांना या नव्या विषाणूची लागण होण्याचा धोका जास्त आहे. गेली अनेक दशके या आजारांच्या यशस्वी व्यवस्थापनामध्ये, तसेच या आजारांचा आरोग्यव्यवस्थेवरील भार परिणामकारकरित्या कमी करण्यामध्ये आपल्याला तंत्रज्ञानाची मदत मिळत आली आहे. धडाडीने हाती घेतलेल्या वैद्यकीय चाचण्या, अनेक वर्षांचे संशोधन आणि प्रगत तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून या नवसंकल्पनांना चालना मिळाली आहे.
आज महामारी भशी झगडत असताना, तंत्रज्ञानातील हे नवे बदल उपचारांचा दर्जा आणि रुग्णांचे आजारातून बरे होण्याचे प्रमाण वाढविण्याच्या कामी, विशेषत: असंसर्गजन्य आजारांचा भारतीय आरोग्यव्यवस्थेवरील भार कमी करण्याच्या कामी कशाप्रकारे मदत करत आहेत याकडे लक्ष देणे अधिकच महत्त्वाचे बनले आहे.
मिनिमल इन्व्हेजनच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार
प्रगत उपचारात्मक सोयीसुविधा, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात लागणारे नवे पथदर्शी शोध आणि रुग्णांच्या आजारांचे अधिक चांगले निदान करणा-या व त्यांच्या जगण्याचा दर्जा वाढविणा-या देखरेख यंत्रणा यांच्या मदतीने आपण या आजारांच्या भाराचे व्यवस्थापन कसे करत आहोत हे पाहणे रोचक आहे. आज लोक एकमेकांपासून अंतर पाळत असताना आणि डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे जास्तीचे वेगळे मार्ग शोधत असताना, रिमोट मॉनिटरिंग यंत्रणेच्या सहाय्याने त्यांना आपल्या हृदयाच्या स्थितीची नोंद ठेवता येत आहे व त्यातील चढउतारांचे विश्लेषण करता येत आहे.
हार्ट अर्हिदमियाच्या रुग्णांच्या हृदयाचे ठोके काही वेळा खूप जलद, काही वेळा अतिमंद पडतात, तर कधी त्यांची लय बिघडते. अशा रुग्णांच्या हृदयाच्या ठोक्यांची अनियमितता नोंदवून घेत रुग्णाच्या स्मार्ट फोनमधून ब्लूटूथच्या माध्यमातून ही माहिती पाठवण्याची सोय असणारे तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे. ही माहिती डॉक्टरांना पाठविल्यास रुग्णाच्या हृदयाची चालू स्थिती जगाच्या पाठीवर कुठेही त्यांच्यापर्यंत तत्काळ पोहोचू शकते.
उपकरणे उपलब्ध असली तरीही नेमक्या कोणत्या प्रकरणांमध्ये त्यांचा वापर करायला हवा हे ठरविणे हे कार्डिओलॉजिस्ट्सच्या समोरील सर्वात मोठे आव्हान राहिले आहे. हृदयाच्या देखभालीचा मुद्दा येतो तेव्हा सगळ्यांना सरसकट एकच उपचार देण्याचा दृष्टिकोन कामी येत नाही. एखाद्या मधुमेहाच्या रुग्णासाठी एखाद्या किडनीचा आजार असलेल्या रुग्णापेक्षा वेगळ्या प्रकारचे स्टेन्ट वापरावे लागते, कारण प्रत्येक रुग्णाच्या शरीराची गरज वेगळी असते.
काही प्रकरणांमध्ये केवळ अँजिओग्राफीच्या निष्कर्षांवरून रुग्णांच्या शरीरात स्टेन्ट बसविले जातात किंवा त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाते, जी प्रत्यक्षात टाळता येण्याजोगी असते. कोरोनरी आर्टरीच्या एका विशिष्ट भागामध्ये टाकलेल्या वायरद्वारे रक्तदाबाची अचूक मोजणी करणा-या Fractional flow reserve (FFR) सारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णासाठी कोणत्या प्रकारचे स्टेन्ट वापरावे किंवा मुळात स्टेन्ट वापरण्याची गरज आहे किंवा नाही हे डॉक्टर्स ठरवू शकतात. यूएसए आणि जपानसारख्या विकसित देशांमध्ये पहिल्या फळीतील निदानपद्धती म्हणून FFR चा वापर केला जातो, या निदानपद्धतीच्या यशस्वीतेचे सर्वाधिक पुरावे उपलब्ध आहेत व ESC च्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक सूचीमध्ये ही पद्धती समाविष्ट आहे.
वयोवृद्ध रुग्ण किंवा हृदय कमकुवत असलेले आणि फुफ्फुसे, किडनी किंवा मेंदूशी निगडित नॉन-कार्डिअॅक समस्यांचा पूर्वेतिहास असलेल्या रुग्णांसाठीही आज विज्ञानाकडे उपाययोजना आहेत. हृदयाची झडप नीट बंद न होण्यामुळे उद्भवणारी लिके मित्रल व्हॉल्फची समस्या असलेल्या रुग्णांना गेली अनेक दशके औषधे घेण्यावाचून किंवा पारंपरिक ओपन-हार्ट सर्जरी करण्यावाचून पर्याय नव्हता.
ओपन हार्ट सर्जरी म्हणजे छातीचा भाग उघडून चार ते सहा तास चालणारी शस्त्रक्रिया. या शस्त्रक्रियेनंतर पूर्ववत होण्यासाठी सहा ते आठ आठवड्यांसाठी अत्यंत काटेकोरपणे पथ्यपाणी सांभाळणे व इतर खबरदारी घेणे आवश्यक होते. आता कॅथेटरचा वापर करून शरीराला कमीत-कमी छेद देत केल्या जाणा-या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून हृदयाचा भाग न उघडताच बिघडलेली मिट्रल झडप दुरुस्त करता येते. या उपचारानंतर अवघ्या एका दिवसात रुग्ण पूर्ववत होऊ शकतो.