आपल्याला आयुष्य जगण्यासाठी जसा श्वास गरजेचा असतो, तसाच आपल्या आयुष्यात जगण्यापलीकडचं जीवन जगण्यासाठी विश्वास महत्त्वाचा असतो. आपल्या जीवनांत आपल्याला लाभलेलं जाज्वल्य हे फक्त श्वास-विश्वासावरच अवलंबून, टिकून राहत असतं. श्वसनप्रकाराच्या उपयोगातून आपलं जगणे अधिक सुलभ, सुरक्षित आणि सुंदर करणं आपल्यावरच अवलंबून असतं. जितका मोठा श्वास घेतला जातो, तितकंच आयुष्य मोठं, दीर्घ होत जातं. ह्या श्वासावर नियंत्रण करण्याचं शास्त्र आपण अवगत केलं की समजायचं, आपण आपल्या जगण्यावर विजय मिळवला. खरं तर अगदी सहज आणि नकळत घेतलेल्या श्वासाचं किती महत्त्व असतं, हे समजून घेण्याची जाणीव होणं जरुरीचं असतं.
प्रा. शैलेश कुलकर्णी
नकळत केलेल्या अनेक गोष्टी आपल्याकडून अनेकदा दुर्लक्षित राहत असतात. श्वास आणि विश्वासाचं देखील तसंच असतं. श्वास-विश्वासाच्या बाबतीत खरंच आपण नेहमीच गाफील रहात असतो, हीच खरी उणीव म्हणावी लागेल. अनेकदा आपल्या बाबतीत जसं श्वासाचं, तसंच विश्वासाचं सुद्धा असतं. आपण अगदी सहजपणे केवळ दृश्य, पण आभासी जगावर आंधळेपणानं विश्वास टाकत असतो. आपल्या डोळ्यांवर चढलेली विश्वासाची झापडं आपल्याला भ्रमांत अडकवतात. आपल्याला अगदी नुकत्याच भेटलेल्या व्यक्तीबरोबर एखाद्या योजनेसाठी, जाहिरातींना भुलून जाऊन आपलं सर्वस्वसुद्धा अर्पण करायला तयार होतो. अगदी काही क्षणांत आपण त्यांवर विश्वास ठेवतो आणि व्यवहार करून मोकळे होते. पण हे मोकळं होणं आपला खिसा, तिजोरी देखील मोकळं करत आहे ह्याची जाणीवही होत नाही.
आपल्या आयुष्यांत येणारी माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात. काही फांदीसारखी, जास्त जोर दिला तर तुटणारी; काही पानासारखी, अर्ध्यावर साथ सोडून देणारी; काही काट्यासारखी, सोबत असूनही टोचत राहणारी; आणि काही मात्र मुळासारखी, न दिसताही शेवटपर्यंत साथ देणारी. श्वास असेपर्यंत विश्वास टिकवून ठेवणारी. ही विश्वास टिकवून ठेवणारी माणसं प्रगल्भ विचारांची असतात. त्यामुळेच प्रगल्भ विचार, दिलदार मन लाभलेली कोणतीही व्यक्ती आकृती उरत नसते, तर ती स्वतःच एक कलाकृती बनून जगण्यापलीकडचं जीवन जगत असते. अशी व्यक्ती आपल्या संस्कृतीचं स्मरण ठेवून स्वतःच्या प्रकृतीला अनुसरून समाजातील विकृतीकरण थांबवण्यात सक्रीय असते. यांतूनच कलाकृती साकारली जात असते, पाहायला मिळते.
“आश्वस्त करणारा विश्वास
मोर फक्त भरून आलेल्या ढगांसाठी नाचत नाही, त्याचप्रमाणे कलावंत केवळ मैफिलीसाठी फुलत नाही. ह्या दोन्ही चमत्कारांना एक तिसरा विश्वासू साक्षीदार असावा लागतो. एक सावध जाणकार हवा असतो. तहानलेला जीव आणि तहान भागवणारा जीव ह्यांना लांबून पाहणारा एक जीव लागत असतो. पण तो ही कसा असला पाहिजे, तर त्याला तहानेची आर्तता समजली पाहिजे आणि ती भागवणाऱ्याची क्षमताही. तो अस्वस्थता दूर करणारा आणि आश्वस्त करणारा, ज्याच्यावर पूर्णपणे विश्वास टाकता येईल असाच असला पाहिजे.
आपण सगळेच जाणतो की, हे संपूर्ण जग केवळ विश्वासावर कार्यरत आहे. जगांतील प्रत्येक नातं, व्यवहार, आपापसातील संबंध हे पूर्णपणे विश्वासाशी निगडित असतात. कोणत्याही व्यवहाराला आणि नातेसंबंधाला सुद्धा आपण कितीही कायद्याच्या चौकटीत ठेवायचं ठरवलं, तरीही सरतेशेवटी त्याचा संबंध विश्वासाशीच येतो. मुळाक्षरे, बाराखडी अथवा वर्णमाला सगळेच शिकत असतात. पण ह्या वर्णमालेत सुसंवादातला “सु” मिसळला तर त्याचीच सुवर्णमाला तयार होत असते. ही सुवर्णमाला तयार करण्यासाठी आपल्याला आश्वस्त करणारा विश्वासच महत्त्वाचा आणि त्यामुळेच आवश्यक असतो.आश्वस्त करणारा विश्वास हा श्वासाइतकाच महत्वाचा असतो, ह्याची सतत जाणीव ठेवणं आवश्यक असतं. प्रामुख्यानं पति-पत्नीच्या नाजूक नात्याच्या बाबतीत तर एकमेकांमध्ये आश्वासकता टिकवून ठेवणारा विश्वास असावा लागतो. अलीकडच्या काळांत मात्र त्यांच्यातील विश्वासाला अगदी लहानसहान बाबींमुळे तडा जाताना दिसत आहे. का बरं, काही बिघडायच्या अगोदरच त्याची जाणीव होत नाही ?
“नातं विश्वासाचं
प्रॉब्लेम्स कोणाला नसतात…? ते शेवटपर्यंत प्रत्येकालाच असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तरही असतंच. काही वेळा त्यासाठी वेळ लागतो, तर कधी पैसा लागतो आणि त्याहीपेक्षा काहीवेळा विश्वासाचं नातं जपलेली आपली हक्काची माणसं लागतात. ह्या तिन्हींशिवाय काही असावंच लागत नाही. त्यांच्या पलीकडचा आणि त्या व्यतिरिक कोणताही प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो. ह्यासाठी प्रत्येकाचं परस्परांशी विश्वासाचं नातं असणं आणि ते तसंच टिकून राहणं जरुरीचं असतं. एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये आपापसातील नातेसंबधाची इमारत ही केवळ विश्वासाच्या पायावरच उभी असते. परस्परांतील विश्वास जितका दृृढ असतो, तितकीच नात्याची इमारत मजबूत असते. त्यामुळेच त्या विश्वासाला सहजपणे तडा जाऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी मन धावतं होत असतं. हे मनाचं प्रकरण खूप छान असतं. जागा न सोडता ते हजारो मैल भटकतं आणि विश्वासाच्या नात्यांतील प्रत्येकाला भेटत असतं. शरीर मात्र त्यांपैकी एकदोन ठिकाणीच जाऊ शकतं. विश्वासाच्या नात्याला शरीरानं भेटायची जरुरी पडतेच असं नाही, तर आपलं नातं मनानेच अगोदर पोहोचलेलं असतं. ह्यासाठी सतत सकारात्मक वातावरण टिकवून ठेवणं हे ज्याच्यात्याच्या विचारांवर अवलंबून असतं. सकारात्मक विचार करण्यासाठी आपल्या दृष्टिकोनात थोडा बदल करायला काय हरकत आहे, असा विचार करायला काय हरकत आहे, संपूर्ण जग सुंदर आहे, फक्त तसं पाहायला हवं; प्रत्येक नातं जवळचं-विश्वासाचं आहे, फक्त ते उमजायला हवं; प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे? फक्त तसं समजायला हवं, प्रत्येक वेळेत समाधान आणि आंनद आहे फक्त तसं जगायला हवं. केवळ ही जाणीव जरी झाली तरीही आपापसातील नातं अधिक दृढ होत जातं, त्यांतील उणिवा दूर होत जातात. नातं कोणतंही असो, परस्परांतील विश्वासच महत्त्वाचा असतो. ऑफिसमध्ये काम करणारी व्यक्ती विश्वासाचा गैरफायदा घेऊन मानसिक, शारीरिक अथवा आर्थिक पातळींवर फसवणूक करत असल्याची जाणीव वेळीच न होणं, ही उणीवच म्हणावी लागेल.
“विश्वसनीय व्यवहार
आपल्यापैकी अनेकांना सतत भेडसावत असलेली समस्या म्हणजे एकमेकांच्या व्यवहारातील अविश्वसनीयता. आपण कितीही विश्वासानं व्यवहार केला, तरीही त्याची अंतिम परिणती काय असेल काहीच समजत नाही. आयुष्यभराची जमापुंजी वार्धक्यात उपयोगी पडावी आणि चांगला परतावा येईल ह्या माफक अपेक्षेनं एखाद्या खाजगी उद्योगांत, खाजगी बॅंकेत गुंतवणूक करण्याच्या हेतूनं जमा करून ठेवावी, इतका प्रांजळ दृष्टिकोन समोर ठेवून केलेला व्यवहार विश्वसनीय ठरेलच ह्याची खात्री नसते. ह्याबाबतीत आपण अभ्यासपूर्वक विचार न केल्यामुळे अथवा भूल-थापांना बळी पडल्यामुळे आणि अधिक फायद्याचा हव्यास केल्यामुळे फसगत आणि कालांतरानं पश्चाताप झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याला ज्ञात असूनही आपण का बरं इतका गाफीलपणा दाखवतो? अनेकदा एकाच कुटुंबातील व्यवहारात देखील कटुता आल्याचं आणि आपापसातील वाद चव्हाट्यावर आल्याचं आपल्याला कळतं. नातं आणि व्यवहार एकाच तराजूमध्ये तोलायला सुरुवात झाली, की आपापसातील व्यवहारामुळे नातं संपुष्टात आल्याचं अनेकदा आपल्याला दिसून येतं. व्यवहारांत पारदर्शकता न ठेवण्याची प्रकृतीच नाही, तर ती विकृती म्हणावी लागेल. यामुळे नातेसंबंधात बाधा निर्माण होते. व्यवसायातील फसवणूक ही विश्वासाच्या नात्याला लागलेला काळिमाच म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.
“विश्वसनीय मैत्रीचं विश्व
मैत्रीचे धागे हे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात. पण लोखंडाच्या तारेहूनही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाही तर वज्राघातानेही तुटणार नाहीत. विश्वसनीय मैत्रीच्या विश्वात मैत्रीचं नातं देखील असंच मजबूत असतं आणि म्हणूच ते विश्वासावर निरंतर टिकून राहतं. आभाळातून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब आपल्याला काही ना काही देऊन, शिकवून जातो. जेव्हा तो तहानलेल्या धरतीवर पडतो, तेव्हा तो मातीला एक वेगळाच सुगंध देऊन जातो; ओल्या मातीचा गंध देण्यांत किती सामर्थ्य असतं, हेच तो नकळत आपल्याला सांगून जातो. जेव्हा तो झाडाच्या पानांवर पडतो, जास्त वेळ तो तिथे थांबत नसेलही, पण तरीही तो त्या पानांना अगदी टवटवीत करून जातो, ओझरता स्पर्श, ओझरत्या स्पर्शाची ताकद तो आपल्याला दाखवून जातो; कारण त्यांत लालसा नसते. त्यांत असते एक अनामिक ओढ आणि ती आपल्याला टवटवीत ठेवते. एका थेंबात देखील मैत्रीचं नातं टिकवण्याची जर इतकी ताकद असते; तर विश्वसनीय मैत्रीच्या नात्यात किती ताकद असेल? एक नवं भावविश्व निर्माण करण्याची ताकद तर निश्चितच त्या मैत्रीच्या नात्यात असते. मैत्री निर्माण होणं कदाचित सोपं असेल आणि नव्यानं निर्माण करणं शक्य होत असेल; परंतु ती विश्वासाच्या माध्यमातून टिकवून ठेवणं अधिक आव्हानात्मक असतं. परस्परांतील विचार, वर्तन आणि व्यवहार ह्याबाबतीत सकारात्मक विश्वसनीयता टिकवणे जरुरीचं असतं.
“श्वास-विश्वास
ज्या व्यक्तीला सतत शुभ, सकारात्मक, आशावादी विचार करण्याची सवय असते, त्याचं मन नेहमीच आनंदानं, उत्साहानं भरलेलं राहतं. अशा उत्साही मनाच्या व्यक्तीला नेहमीच यशप्राप्ती होत राहते. सकारात्मक, आशावादी, आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असते, ह्याची जाणीव सर्वप्रथम आपण करून घेणं आवश्यक असतं. गुरुकिल्लीद्वारे आपल्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकास आपल्यासारखंच घवघवीत यश मिळत राहण्यासाठी श्वास-विश्वास दोन्हींही महत्त्वाचं असतं. श्वास-विश्वास एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. परस्पर नातेसंबंधातील विश्वास हा श्वासासारखाच असतो. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत विश्वास टिकवून ठेवण्याची केवळ नैतिक जबाबदारीच नाही, तर कर्तव्य असल्याचं भान राखलं पाहिजे.