-हिमांशू
घरातली भांडणं उंबऱ्याच्या बाहेर जाऊ द्यायची नाहीत, ही शिकवण आपल्याला परंपरेनं मिळाली आहे. त्यामुळे आपल्याकडे घरातल्या भांडणाचा आवाज चारभिंतींच्या बाहेर जाऊ दिला जात नाही. अर्थात, हा आवाज शेजाऱ्यापाजाऱ्यांना फार आवडतो. शेजारच्या घरात भांडण चाललंय, हे ऐकून त्यांना आनंद मिळत असतो आणि तो त्यांना मिळू द्यायचा नाही, हे शहाणपण तावातावानं भांडतानासुद्धा लोक जपतात. शिवाय, घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणं स्वाभाविक आहे, हेही आपल्याला शिकवून ठेवलेलं असतं. असे भांड्याला भांडं लागण्याचे प्रसंग विशेषतः पती-पत्नीमध्ये अधिक घडतात.
काही जोडपी तर जितकी भांडतात तितकं त्यांच्यात प्रेम असतं. किंबहुना त्यांच्यातलं भांडण हाही प्रेमाचाच आविष्कार असतो. भांडणं ही ईगोमुळे होतात आणि ईगो म्हणजे स्वतःवरचं प्रेमच. जो स्वतःवर मनापासून प्रेम करतो, तोच जोडीदारावरही मनापासून प्रेम करतो, अशी ही थिअरी मांडली जाते. म्हणूनच, भांडणामुळे पती-पत्नींचं नातं अधिक दृढ होतं, असं मानणारेही बरेचजण आहेत; पण म्हणून केवळ एवढ्याच कारणासाठी मुद्दाम भांडण उकरून काढणारे लोक आपल्याला दिसत नाहीत. आपल्यात भांडण व्हावं, असं मनापासून वाटणारेही आपल्याला सापडत नाहीत. भांडण ही अपघातासारखी आपोआप आणि आकस्मात घडणारी गोष्ट असते. मुद्दाम भांडण करायचं ठरवलं तर फसलेल्या विनोदासारखी अवस्था होते. पण कुणाला भांडणच हवं असेल तर काय करणार?
पती-पत्नीमधला झगडा न्यायालयासमोर गेला तर न्यायालयाबाहेर काही तडजोड होण्याची शक्यता आहे का, याची चाचपणी केली जाते आणि तसं दोन्ही पक्षांना सांगितलं जातं. उत्तर प्रदेशातल्या संभळ जिल्ह्यात घडलेल्या ताज्या प्रकरणात शरिया न्यायालयाने अशाच प्रकारे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. पण पती-पत्नीमध्ये भांडण होत नाही, हाच भांडणाचा विषय होता.
नवरा अजिबात भांडत नाही म्हणून संबंधित महिलेनं थेट घटस्फोटाची मागणी केली होती आणि ती ऐकून मौलवीसुद्धा चक्रावून गेले. परस्पर संमतीनं हा वाद सोडवण्याची सूचनाही महिलेने अमान्य केली आणि स्थानिक पंचायतीकडे दाद मागितली. या महिलेचं म्हणणं ऐकून बऱ्याच जणांचे कान उभे राहतील. ही महिला म्हणते, “माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो. कधीही चिडत नाही; ओरडत नाही. घरकामात मदत करतो. अगदी स्वयंपाकसुद्धा करतो.
सुरुवातीला काही दिवस मला कौतुक वाटलं. पण आता मात्र या स्वभावाचाच त्रास होऊ लागलाय. मुद्दाम काही कारण काढून वाद उकरून काढला, तरीसुद्धा नवरा शांतच राहतो. अजिबात भांडत नाही.’ अशा शब्दांत आलेल्या तक्रारीचं काय करायचं? पतीनं पत्नीला घटस्फोटाचा अर्ज माघारी घेण्याची रितसर विनंती केलीय; पण काय होतंय कोण जाणे!
हे जगावेगळे प्रकरण पाहून राजकीय पक्षांच्या आघाड्या आठवल्याखेरीज राहणार नाहीत. किमान महाराष्ट्रातल्या लोकांना तरी सध्या हे प्रकरण पाहून राजकीय आठवणी नक्कीच होतील. एका पक्षाने रुसायचं, दुसऱ्याने समजूत घालायची आणि तिसऱ्याने “कोणताही वाद नाही,’ अशी पत्रकार परिषद घ्यायची, असा अजब अनुभव देणारा त्रिवेणीसंगम सध्या आपण अनुभवतो आहोत. शेजारी भिंतीला कान लावून बसलेत; पण घरातून भांडणाचा आवाज मात्र येत नाही. भांडण नाही, या कारणावरून धुसफूस सगळ्यात वाईट!