आई म्हणजे गजांत लक्ष्मीचे पदकमल. तिच्या भूपाळीने प्रभा फाकते. पक्षीराज मधुराभक्तीत तल्लीन होतात. मुक्तीची पहाट फुलवीत भावविव्हळ मनमुग्ध संगीत आळवतात. पूर्वेच्या नाक सुकुमार तरल रेशमी गालावर पदन्यास करून गुलाल उधळतात. तांबट कमळ पाकळीस्थित लोचनात मेरुमंदाराचे आई काजळ रेखून चिवचिवतात, तर कधी विद्ध पाखराचे आर्त सूर काजळकाठ ओलावतात. दर्दभऱ्या दु:खाची मखमली फुले व्हावीत अन् ती प्राजक्ती फुलं सड्यासारखी टपटपावीत. हीच का ती माता आविष्काराची सगुण भक्ती!
याच अग्निफुलांच्या रंगांनी सारा दरीया दिपून जावा. जसा काय शरद्चंद्राचा उत्सव! रंगोत्सव!! अन काळोखभरल्या धारेवर तारकांचा सुरेल दिपोत्सव!! अगदी दिनारंभाचा प्रथमेश प्रहर. सात्त्विक तेजाने फुलारलेले गंधित सुगंधी अंबर. साधनासिद्धीचा सोहम श्वास. मेघपटलाला नवोन्मेषशाली तेजाळणारे वत्सलनेत्र. असीमानंदाचे अर्थपूर्ण भान. आत्मानंद साकारणारे आनंदकंद सृष्टीवैभव. वैभवशाली नजराणा. अधून-मधून टपकणारे मयुरपंखी सुरेश रेशमी दंव. जणू नर्तनसोहळा. निर्झराचे तुषार. मखमली धरेचं मखमली काळीज कातर रहस्य. सुरेख गुंजारव. विद्ध पक्ष्याच्या अनिमिष नेत्रात नेत्रदीपक काळाचे तात्त्विक अधिष्ठान. जे की गोऱ्या मुलायम पाऊलखुणा रेखतयं. कळीकाळावर, सृष्टीभराचा चंदनगंधी भिज पाऊस, मुलायम पातळ काचेरी देखणा पाऊस, अमित मनोहर नजराणा बहाल करतयं मनमोहक गंधार वेळेला.
अश्राप जीव मात्र चिवचिवतात तर कधी चित्रासारखे स्तब्ध पण… शिल्पासारखे ठाम. विमल चारित्र्याचं विमनस्क पिंपळपान. एकच सळसळ. एकच फडफड. मृण्मयी मृद्गंध माधुर्य प्रतिबिंबीत करणारा सहस्त्ररश्मी चंद्रमा. नाजूक नजाकतदार नखरेल पहाट.
पहिल्या पहाटेचं पहिलं विहंगम मनोहरी दृष्य. पक्षी राजाची शाळा. आकाशमार्गे सैरभैर विहरणारे पांढरे शुभ्र पक्षाचे थवे. शुचिभूर्त देखावा. जणु काचेरी दर्पण. याच दर्पणाचं प्रतिरूप असतं. मातृत्व! महन्मंगल मन्मथ मातृत्व!! जसा काय सृजनशील पहिला पाऊस. नितळ काचेरी पाऊस. याच भिज पावसाच्या मातृत्वात गुलजार बाळराजाचे सोनेरी पदकमल रुणझुणले. भावोत्कट प्रीत सोहळ्यात चित्तवेधक एकाग्र रेंगाळलेले. म्हणूनच आईचे मर्मबंध असतात. अर्थगर्भ मौन!
दिक्कालाची सृष्टीही मनभावन सौंदर्याची उधळण करते चराचरावर. मोरही थुईथुईतात. मोहरीच्या बनात. नखरेल नजराण्याच्या फेर धरून नाचतात. केकारवाची सुंदर मेजवाणी देतात. म्हणूनच तर आईच्या राजीव लोचनात असतो सदाफुली गोकर्ण. पांढरा गोकर्ण अन् निळामंद गोकर्ण. नाजूक मनोरम फुलं. हे दोन्ही फुलं देवत्वावर वाहतात.
आई हृदयात असते विश्वमाधुरी निळी नीलिमा. निळी फुलं कधीच निर्माल्य होत नसतात; कारण ती असतात आई हृदयसंचित. फुलारलेल्या फुलपरडीसारखे. निळीनीलिमा ही अखंड शांतिप्रसादाची आराधना असते. म्हणून तर अस्तालाही फुटतात निळ्या निळाईचे भावविभोर भावदंग पल्लू. जसा काय विधात्याने रेखलेला शामल चांदणपुरा. तो कधीच निर्माल्यवत होत नाही. उलट फुलतो. फुलवितो दशदिशांना. शांतिब्रह्माचा उत्कटवेध घेण्यात ती सदैव तत्पर असतात. म्हणून तर ती भावदंग असतात.
त्यात असतो भावविभोर गहिरा रंग. महाकारुणिक भावछटा, तेजाळत्या सुस्वांत रेषा. धीरोदत्त पण … मुलायम. एखाद्या पुनवेचा दुधेरी धवलरंगी पाऊस. पुनवेचं चांदणं, सशाचं पळणं अन् हरळीचे घनश्याम वर्ण. रंगसंगतीचे खेळ खेळणारा, मनभावन खिलाडी, निळीनीलिमा खरंच काय असते? स्थितप्रज्ञ शिल्पालाही श्रोतावणारे भावदंग फूल असतं. निस्पंद नीलिमेवरती घन व्याकूळ होतात. भावोत्कट निळाईचा परमानंद लुटण्यासाठी. वाराही फिदा होतो. घनश्याम निळाईवर अन भणाणतो विश्व पसाऱ्यात. लोक हितैषी पसायदानाचा परिमल विराजीत करण्यासाठी. प्रेरक शक्तीचा समीरण वाराही समरस होतो. हृदयंगम मनमोहक पंकज कलिकेवरती. गुलाबस्नानात स्नात झालेला कस्तुरीमृगही उधाणतो. आई नावाचा अनुपम ओंकार.
– नरेंद्र नाईक