आज अलार्मचं घड्याळ त्याला सांगत होतं, “उठ अरे आणि जा तिला भेटायला. तिच्या छोट्या छोट्या अपेक्षा असतात त्या कधीतरी पूर्ण कर. पहाटेच भेटेल बघ ती तुला निवांत. मग तिला तरी कुठे असतो वेळ तुझ्याबद्दल आठवायला?
तुझ्याबद्दलच काय तिच्यासाठीसुद्धा तिला वेळ नसतो विचार करायला. पायाला आणि डोक्यातल्या विचारला भिंगारीच असते तिच्या. पण मला वाटतं, तिला सकाळी तुझ्याबद्दल वेळ मिळत असावा किंवा ती काढत असेलही. उठ. जाणून घे एकदा. एकदाच. कदाचित तीही झुरत असेल तुझ्यासाठी. पण व्यक्त व्हायला शब्द संमती देत नसतील. मनात असेल पण बुद्धीचे एथिक्स आड येत असतील तिचे. उठ अरे. मी पाहिलंय तिला, तुझ्याकडे आशाळभूत नजरेनं बघताना.तू दिलेला गजरा तिनं आजही आपल्या डायरीत ठेवलाय.सुकलाय खरा. पण तिच्या मनाच्या कुपीत तो ताजाच आहे. कितीदा बघते ती तुला त्या गजऱ्यात.तुझं डेरी मिल्कचं रॅपर जपून ठेवलंय पर्समध्ये. कदाचित झुरतेय तुझ्यासाठी. घे नं एकदा पुढाकार. मला का इतका पुळका? प्रश्न पडलाय नं तुला. अरे ज्या दिवशी तिनं तुझ्यासाठी हे अलार्मचं घड्याळ घेतलं, त्या दिवशी माझ्याकडून वचनही घेतलं होतं तिनं. म्हणाली, तुला देतेय त्याच्यासाठी. पण माझा स्वार्थ आहे. त्याच्याजवळच राहा.त्याच्या वेळा पाळ नी जमलं तर कधीतरी त्याला आठवण करून दे. मी तुझी वाट पाहत आहे म्हणून!
– डॉ. प्राजक्ता कोळपकर