ती येते आणिक जाते…
येताना ती कधी कळ्या आणिते
अन जाताना फुले मागिते…
खरेच किती सुंदर नितांत भाव आहेत हे! प्रेयसीचं येणं, भेटणं अन निघताना त्या भेटीचा आनंद चेहऱ्यावर फुलणं हे जणू कळ्यांची फुलं होण्यासारखेच असावे, नाही का? अल्लड, खट्याळ प्रेयसीला उद्देशून कवीने ही कविता करताना भेटीचे जे फलित वर्णीलेय, ते नक्कीच सार्थ, भेटीची सार्थकता अशीच असावी. “तूतू-मैमै’ करून भेटीची मजा जाऊन फक्त झुरणे. व्याकुळपण उरलेच, तर त्या भेटीत कळ्यांची फुलं न होता कळ्या उमलण्यापूर्वीच कळ्यातच संपतील मग नात्यातही दुरावा निर्माण होत राहील अन एक दिवस हे नातंही निर्जीव होईल.म्हणूनच कवीची ही कल्पना अफलातून !
कधी कधी मी विचार करते की, कळ्यांची फुलं होण्याची कल्पना फक्त प्रेयसी अन प्रियकर भेटीइतकीच मर्यादित नाही तर जीवनातल्या प्रत्येक गोष्टीबाबत अन नात्यांबाबत असावी. ती येते. मनात कल्पना येते, अन तिला शब्दरूपात बद्ध करून भावनांच्या जोडीने कवितेची फुलं उमलतात म्हणजेच कल्पनेची ही कळी जोपर्यंत मनात अवतरते तेव्हाच तिचे फूल करण्याची जबाबदारी येते. चित्रकाराला चित्रांची कल्पना सुचते अन मग अप्रतिम चित्र चितारले जाते!
कथेची कळी अशीच उत्स्फूर्त कुठंतरी अवचित मनात येत असते लेखक मग तिचे फूल बनवतो! उचकी लागते अन थांबते पण जाताना प्रिय माणसाची आठवण देते, समुद्राची गाज किनाऱ्यावर येते अन जाताना गाजेच्या खुणा रेतीत उमटवते.
जीवनातली प्रत्येक गोष्ट येते न जाते, कधी ती क्षणिक, तात्पुरती, कधी खूप वेळेकरता येते अन् जाते; पण जाताना ती कशी जाते? त्या मधल्या काळाला खूप महत्त्व आहे.कोणतीही गोष्ट आपल्याजवळ असते तेव्हाच तिचे फुलणे, बहरणे झाले तर ती गोष्ट आनंद देऊन जाते .
कवितेचे फुलणे, चित्र कागदावर साकारणे, शिल्पकाराचे शिल्प कोरणे या अन अशा कितीतरी अद्भुत, अवर्णनीय, सुंदर, आश्चर्यकारक गोष्टी या मधल्या काळामधेच घडल्या, येणे-जाणे मधेच !
येणे-जाणे हे नैसर्गिक असते येताना प्रत्येक गोष्ट कळी, कच्ची असते पण जाताना ती कशी जाते हे महत्त्वाचे नाही का? माणसाचे अंतरंग अन कृती या जाण्यावर ठसा उमटवते अन ती गोष्ट फक्त वैयक्तिक आनंद न रहाता वैश्विक बनते! जीवनात किती तरी छोटे-छोटे आनंदाचे क्षण येतात; पण तिकडे दुर्लक्ष करणे अन ते क्षण न अनुभवल्याने क्षणांचे फुलणेही होत नाही अन आनंद घेणेही!
आयुष्यात कितीतरी माणसे येतात-जातात; नात्यांचंही असंच असतं. ती जपली तर फुलतात अन फुलली तर आनंद देतात अन्यथा उमलण्यापूर्वीच कधी गळून पडतात, कळतही नाही! जेव्हा नाती एकत्र येतात तेव्हा जाताना ती आनंदाने फुलली तर मगच निरोप घ्यावा. जीवनात आलेली एखादी व्यक्ती आनंदाने बहरून आपल्याजवळून गेली तर बहरल्यानंतर पसरलेल्या सुगंधाने आपले जीवन सुगंधी होते.
मानवी जीवनही असेच असते नाही का? तो येतो अन जातो पण जाताना तो फूल होऊन सुगंध पसरून जातो की नाही, यावरच जन्माची कृथार्थता आहे. नाहीतर,
जो आला
तो रमला
पण शेवटी गेला…
असेच आपले ही !
परमेश्वर प्रत्येकाला अशा ओंजळभर कळ्या देत असतो कधी एकदम देतो. पण आपल्या ओंजळीत त्याची फुले होणार की कळ्याच कोमेजणार? हे आपले कर्म अन कर्तृत्वच असते! प्रत्येक गोष्ट येते-जाते जाताना ती खरेच फुले मागते कारण तिची अपेक्षा असते, आपलेही फूल व्हावे.
– सुचित्रा पवार