आज छान थंडीचा आनंद घेत गॅलरीत चहा घेत बसले होते. जाता येता मित्र-मैत्रिणी हात दाखवत होते आणि मी गंमत म्हणून त्यांना चहाचा कप दाखवत होत्या. खूप छान वाटत होते. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. आता हा एवढ्या सकाळी कुणाचा फोन वाजला म्हणून बघितला तर माझी आवडती रिंकू.
मी तिला बोल म्हणायचा अवकाश की, ती सुरू झाली. रिंकू अतिशय गोड सुंदर देखणी आणि खूप बोलकी मला तिच्या बोलण्यातून नेहमी जाणवायचे की थोडी अस्वस्थ आहे. त्यामुळे ती नेहमी नकारात्मक बोलते. आज तिने फोन यासाठी केला की, “आपण संध्याकाळी भेटायचे का?’ हे विचारण्यासाठी.
रिंकू अतिशय हळवी भावूक.तिला एक मुलगी. आई-वडिलांचा आधार होता तोही संपलेला. नवऱ्याचे आणि तिचे पटत नसल्यामुळे ते दोघे एकत्र राहत नव्हते. त्यामुळे तिला नेहमी एकटेपणाची जाणीव व्हायची. त्यामुळे तिच्यात नकारात्मकता खूप आली होती. आपण तिला काही सांगितले तरी त्याचा ती नकारात्मकच विचार करायची. माझ्याशी ती रोज बोलायची.
रिंकूच्या अन माझ्या गप्पा एकेक तासभर चालायच्या. त्यामध्ये मी तिला खूप समजवायचे. कधी खूप चिडायचे; तिलाही राग यायचा. पण ती कधी तो दाखवत नव्हती. हळूहळू आमचं बोलणं खूप वाढू लागलं. कधी मस्करी कधी राग चिडणं-ओरडणं असं चालूच रहायचं. रिंकूला मी एकदा बोलावलं. माझ्या ऑफिसमध्ये बसवलं आणि नीट समजावलं की, “तुझा हा नकारात्मकपणा तुला तुझ्या भावी आयुष्यात खूप त्रास देईल. तुला संपवेल. तुझ्याबरोबर तुझी मुलगी आहे तिची जबाबदारी तुझ्यावर आहे हा सगळा नीट विचार कर.’
तिला मी समजावत होते की, “प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीच पूर्ण सुखी नाही. त्यामुळे तुझ्या दुःखात तू बुडून जाऊ नको. त्याला थोडं विसरण्याचा प्रयत्न कर. तुझं मन रमव. तू कशात तरी गुंतण्याचा प्रयत्न कर. तुला जे चांगलं छान वाटतंय त्या गोष्टी कर. छान मित्र-मैत्रिणी बनव; त्यांच्याबरोबर वेळ घालव.’ अशा काही गोष्टी तिला समजावण्याचा प्रयत्न मी केला. रिंकू इतकी गोड, सगळं शांतपणे ऐकत होती. मध्येच चिडून म्हणायची “मला नाही जमणार; मी अशीच आहे.’
आयुष्यात आपल्याला एक छान मित्र किंवा मैत्रिण असणे खूप गरजेचे असते. पण ती व्यक्ती विश्वासू असली पाहिजे. दोघांचा एकमेकांवर विश्वास असला पाहिजे. आपल्याला त्याच्याशी बोलताना कोणतीही भीती किंवा शंका असता कामा नये. जर अशी आपली एखादी मित्र-मैत्रिण असेल, तर आपलं आयुष्य खूप सुंदर व तणावरहित होऊ शकते. पण मैत्रीचे नाते हे सुंदर निखळ असायला हवे. त्यात कोणताही स्वार्थ, अपेक्षा नको हेवे दावे नको. जर असं असेल तर तुमच्या सारखे तुम्हीच.
रिंकूच्या आयुष्यातही काही दिवसांनी एक छान मित्र आला; रितेश, तिच्या लहानपणीचा मित्र. दोघे एकत्र खेळले होते. रितेश एवढा छान होता की, त्याने रिंकूला खूप छान समजावले. तिचा तो खरा मित्र बनला. तिला सगळी मदत करत होता. त्यामध्ये कोणताही स्वार्थ नव्हता. वेळोवेळी तिला सल्ला देत, तो तिला खूप मदत करत होता. रितेशची बायको ही खूप छान. तीही रिंकूला खूप समाजवून घेत होती. रितेशला रिंकूकडून काहीही अपेक्षा नव्हती. फक्त रिंकू जी भरकटलेली आहे, तिच्याबरोबर तिची मुलगी आहे ही काळजी होती.
थोडी भांडणं पण होत होती. तरीही तो न चिडता तिला समजावून घेत होता. त्यातून रिंकू सावरत होती. थोडी थोडी बदलत, चालली होती. रितेशमुळे रिंकूत झालेला बदल दिसून येत होता. तिचा स्वभाव शांत झाला होता. काम करण्याची उमेद तिची वाढली होती. रितेश सारखा छान मित्र रिंकूला मिळाला. त्यांच्यात निखळ छान असे फक्त मैत्रीचे नाते होते. कोणताही स्वार्थाचा दुर्गंध त्या नात्याला नव्हता. फक्त मैत्रिचा सुगंध होता. त्यांमुळे हे नातं छान टिकलं बहरलं. आणि रिंकूचं आयुष्य बदलण्यास मदत झाली.
मित्र-मैत्रिणींनो मला यातून एकच सांगायचे आहे. छान मित्र-मैत्रिणी बनवा पण त्यात वहात जाऊ नका. विश्वासाचं नातं बनवा. आपल्या नात्यात किती पुढे जायचे आणि कुठे थांबायचे हे तुम्हाला ठरवता आले पाहिजे. तरच तुम्ही सुखी होणार नाहीतर त्रासाला सामोरे जावे लागेल. माझ्या मित्र-मैत्रिणांनो मला एकच सांगायचे आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. त्यामध्ये एका मिनिटाचा भरोसा नाही. त्यामुळे तुम्ही ते व्यर्थ गोष्टी, राग, द्वेष यात वाया घालवू नका. आयुष्याचा आनंद घ्या. आणि छान जगा. मनुष्य जन्म हा ईश्वराने दिलेली छान देणगी आहे. त्याचा आनंद घ्या.
(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)
– भाग्यश्री साळुंके