फरसबी : फरसबी मूळची अमेरिकेतील. फरसबीचा मोसम थंडीमध्ये असतो. याच्या शेंगा चार ते पाच इंच लांब असतात.
गुणधर्म ः फरसबीच्या रसामुळे इन्सुलिनच्या प्रवाहात वाढ होते. त्यामुळे मधुमेहाच्या रोग्यांना फरसबी फायदेशीर ठरते. मधुमेही रुग्णांनी फरसबीचा 275 मि.लि. रस घ्यावा. फरसबी जड, स्निग्ध, थंड, रुचकर आणि पित्तनाशक असते. फरसबीच्या रसामध्ये नैसर्गिक घटकांचे संतुलन पाहावयास मिळते.
घटक ः जीवनसत्व ए100 ग्रॅम
जीवनसत्त्व बी178 मि. ग्रॅम
जीवनसत्त्व बी259 मि. ग्रॅम
नियासिन0.3 मि. ग्रॅम
जीवनसत्व सी14 मि. ग्रॅम
पाणी82 टक्के
प्रोटिन1.7 टक्के
चरबी0.1 टक्के
कार्बोदित पदार्थ4.5 टक्के
रेषा (तंतु)1.8 टक्के
कॅल्शियम0.05 टक्के
फॉस्फरस0.03 टक्के
लोह1.7 मि. ग्रॅम
औषधी उपयोग ः फरसबी वाटून अगर किसून जाड कपड्यात घालून रस काढता येतो. फरसबीच्या ताज्या रसात पोषक घटकांचे मोठ्या प्रमाणात संतुलन असते. फरसबीच्या रसाच्या सेवनाने ज्ञानतंतू सुदृढ व उत्तेजित होतात. या रसामुळे इन्सुलिनच्या प्रवाहात वाढ होते. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना हा रस लाभदायक आहे. कोबीच्या रसात हा रस मिसळून सेवन केल्यास मधुमेहाच्या रोग्यांना अधिक गुणकारी असतो. जुने किरकोळ आजार फरसबीच्या रसाने बरे होतात. औषधांच्या ऍलर्जीवर हा रस उपयुक्त आहे. आजारपणानंतर येणाऱ्या अशक्तपणासाठी आणि गाउट नामक संधिवाताच्या विकारावर फरसबीच्या रसाची शिफारस केली जाते. त्यासाठी रोज साधारणपणे 150 मि.लि. रस सेवन करावा.
बटाटा – बटाटा हा मूळचा द. अमेरिकेतील. बटाट्याचा वेल असतो आणि जमिनीखाली मूळांच्या रूपात बटाटे तयार होतात. सोळाव्या शतकात बटाट्याला विषारी पदार्थ समजण्यात येत होते. बटाट्यांत भरपूर प्रमाणात क्षार असतात.
गुणधर्म ः बटाटा थंड, मधुर, जड, शुष्क, बलप्रद व वीर्यवर्धक असतो. तो रक्तपित्तामध्ये गुणकारी आहे, तो कफकारक व वायुहारक आहे. तो चवीला रूचकर व स्वादिष्ट आहे.
घटक ः पाणी74.7 टक्के
प्रोटिन1.6 टक्के
कार्बोदित पदार्थ22.9 टक्के
कॅल्शियम 0.01 टक्के
फॉस्फरस0.03 टक्के
लोह0.7 टक्के
जीवनसत्त्व ए100 ग्रॅम याशिवाय बटाट्यात जीवनसत्व बी1, बी2, नियासिन आणि थोड्या प्रमाणात सी जीवनसत्व देखील असते. धान्यात असणारे सर्व घटक बटाट्यांत असतात. बटाट्यातील 95 टक्के घटक पचनसुलभ स्वरूपात असतात. बटाट्यात जीवनसत्त्व सी भरपूर असते. रक्तपित्तावर बटाट्याचा रस उपयुक्त असतो. बटाटा जसा जुना होत जातो, तसे त्यातील मसीफ जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी होत जाते म्हणून जास्त जुन्या बटाट्याच्या रसाचे सेवन करु नये.
औषधी उपयोग ः बटाटा वापरण्यापूर्वी तो खूप वेळ आधी चिरुन ठेवू नये. त्यामुळे त्यातील मसीफ जीवनसत्त्व नष्ट होते. सालं काढून बटाटे वाफवले तरी देखील त्यातील घटक नष्ट होतात. बटाट्यांचा उपयोग करण्यापूर्वी किंवा त्यांचा रस काढण्यापूर्वी त्यांच्यावरील हिरव्या रंगाचे डाग काढून टाकावेत, कारण त्यांत मसोलोनाईनफ नावाचा विषारी घटक असतो. बटाट्यांवर उगवलेले अंकूर देखील खाण्यापूर्वी कापून काढून टाकावेत. बटाट्यांच्या सेवनाने आतड्यातील अन्न आंबण्याची क्रिया बंद होते.
बटाट्यामुळे सहजिवाणूंना उत्तेजन मिळते, आतड्यांना व्रण पडले असता, बटाट्यांचा रस अत्यंत गुणकारी आहे. बद्धकोष्ठता व मूळव्याधीमध्ये देखील हा रस फायदेशीर असतो. त्यात सोडा व पोटॉश असल्याने त्याच्या सेवनाने शरीरातील आम्लता कमी होते आणि शरीराला पुरेसे क्षार मिळतात. बटाट्यात असणारे क्षार रक्तात असणारे युरिक ऍसिड कमी करतात.अनेक प्रकारच्या त्वचारोगांत, विशेषतः खरजेमध्ये बटाट्याचा रस अत्यंत परिणामकारक आहे. उष्णतेच्या विकारांवर तसेच उष्माघातावर बटाटा किसून त्याचे लेपन करावे व कच्च्या बटाट्याचा रस किंचित शेंदेलोण किंवा पांदेलोण, जिरेपूड घालून द्यावा. त्याने उष्माघातावर त्वरित आराम मिळतो. चेहऱ्यावर मुरुमं किंवा पुटकुळ्या आल्यास बटाट्याचा रस लावावा. डोळ्यांची जळजळ होत असेल तर डोळ्यांवर बटाट्याच्या रसात भिजवलेल्या पट्टया ठेवाव्यात.
बीट –बीट हे एक कंदमूळ असून त्याचा आकार भोवऱ्यासारखा असतो. बीट दोन प्रकारच्या रंगाचे असते. एक लालजांभळट व दुसरे पांढऱ्या रंगाचे. बीट हे मूळचे दक्षिण-पश्चिम आशिया, आणि मेडिटरेनियन या भागातील.
गुणधर्म ः बीट जड, स्निग्ध, शीतल, पौष्टिक, पित्तशामक, रक्तवर्धक, शक्तिवर्धक आहे. त्यात मबेटिनफ नावाचा एक घटक असतो. त्यामुळे जठर व आतडी स्वच्छ ठेवली जातात. बीट या फळाच्या रसात कॅन्सरनिवारक घटक आहेत. बीटमुळे रक्ताला थंडावा प्राप्त होतो.
घटक ः जीवनसत्त्व बी 1100 ग्रॅम
जीवनसत्त्व बी 290 माइक्रो ग्रॅम
नियासिन0.4 मि. ग्रॅम
जीवनसत्त्व सी 8.8 मि. ग्रॅम
पाणी83.8 टक्के
प्रोटिन1.7 टक्के
चरबी0.1 टक्के
कार्बोदित पदार्थ13.6 टक्के
कॅल्शियम0.20 टक्के
फॉस्फरस0.06 टक्के
औषधी उपयोग ः कोशिंबीरीसाठी बीटचा उपयोग करण्यात येतो. बीट वाटून किंवा बारीक किसून त्याचा रस काढता येतो. गाजर, कोबी, आंबा किंवा पपईच्या रसाबरोबर बीटचा रस मिसळला तर ते एक जास्त औषधी पेय बनते. आजारपणानंतरचा अशक्तपणात भरुन येण्यासाठी बीटचा रस उपयुक्त ठरतो.
बीटचा रस निर्दोष आणि गुणकारी आहे. तो पौष्टिक असल्याने कोणत्याही प्रकारच्या शारीरिक दुर्बलतेमध्ये तो उपयुक्त ठरतो. रक्त शुद्ध करून रक्ताचा लाल गुण वाढवण्यास बीटचा रस उपयुक्त आहे. बीट रसाच्या सेवनाने शरीरातील गाठ कमी होते. वजन वाढवायचे असेल तर बीट रस नियमित सेवन करावा.
लसूण – लसूण मूळचा मध्य आशियातील. लसणीला संस्कृतमध्ये रसोन म्हणतात. रसोन म्हणजे केवळ एकाच रसाची उणीव असणारा. मधुर, आम्ल, खारट, कडवट, तिखट आणि तुरट या सहा रसांपैकी लसणीमध्ये फक्त आम्लरसाची कमतरता असते. लसणीच्या कांद्यात अनेक लहान कळ्या असतात. एका कळीची लसूण अधिक गुणकारी असते. लसणीला एक प्रकारचा उग्र दर्प असतो.
गुणधर्म ः लसूण जखम लवकर भरून काढणारा तसेच अरूची, कफ, वायू, कृमी, हृदयरोग, शरीरावरील सूज, फेफरे, दम, कोड, ऍसिडिटी, मूळव्याध, पीनस, गुल्म, उदरशूळ, जीर्णज्वर, अग्निमांद्य, खोकला, मलावष्टंभ आणि क्षयामध्ये लसणीचा खूप उपयोग होतो. लसूण, तिखट, उष्ण, जड, वीर्यवर्धक, स्निग्ध, स्वादिष्ट, रसायन, पाचक, रुचकर, घशास हितकर, डोळ्यांचे तेज वाढविणारा, बलकर, सारक, अग्निदीपक, आणि केसाला हितकर असतो.
घटक ः लोह1.3 मि. ग्रॅम
जीवनसत्त्व सी 13 मि. ग्रॅम
पाणी62.8 टक्के
प्रोटिन6.3 टक्के
चरबी0.1 टक्के
कार्बोदित पदार्थ29.0 टक्के
कॅल्शियम0.03 टक्के
फॉस्फरस0.31 टक्के
औषधी उपयोग ः लसूण चटणीच्या स्वरूपात आणि भाज्यांच्या वाटणात खाल्ला जातो. लसणीचा रस पाण्यात मिसळून घेता येतो. लसूण प्रभावी जंतुनाशक आहे. समभाग पाण्याबरोबर लसणीचा रस सेवन केला असता कॉलऱ्याचे जंतू नष्ट होतात. लसणामध्ये सर्व प्रकारच्या जिवाणूंचा नाश करण्याची क्षमता असते.टाइफॉईड झाला असता लसणीचा रस घ्यावा. लसणीमधील सल्फाइडफ नामक द्रव्य श्वसनसंस्थेच्या रोगांवर उपयुक्त आहे.
लसूण हे न्युमोनियावरील खास औषध आहे. ताप, जलद श्वासोच्छ्वास, आणि हृदयाची धडधड ही न्युमोनियाची लक्षणे लसणीच्या सेवनाने लवकर कमी होतात. रक्तदाबावर लसूण रस घ्यावा. नसा संकुचित होत असतील तर लसूण रसाचे सेवन करावे. लसणीमुळे हृदय सुदृढ बनते आणि त्याची कार्यक्षमता वाढते. लसूण सर्व प्रकारच्या वायूविकारांवर चांगला उपाय आहे. तो पक्षाघात, सर्वांगवायू, ऊरूस्तंभ, आर्दितवायू, कटिशूळ, कुक्षिशूळ आणि पोटातील वायूचा नाश करतो. खोकला आणि श्वासनलिकेत आलेल्या सुजेवर लसूण गुणकारी असतो. क्षय झालेल्या रुग्णासही लसूण रसाचा उपयोग होतो. लसणामुळे कफ सुटतो, झोप चांगली येते. पचनशक्ती सुधारते आणि वजन वाढते. लसूण रसामुळे आतड्याचे आजार बरे होतात. आतडी निकोप बनतात.
फेफरे, अजीर्ण, अग्निमांद्य आणि गॅसेस विकारामध्ये लसूण गुणकारी औषध आहे. अतिसारावरावर लसूण रस घ्यावा. जखमा आणि व्रण चिघळू नयेत म्हणून लसणीचा उपयोग केला जातो. पाव भाग लसणीच्या रसात पाऊण भाग पाणी मिसळून या मिश्रणाने जखम धुतली असता जखमेला येणारी दुर्गंधी कमी होते. वेदना कमी होतात. पू वाहणे कमी होते. लसणीचा उपयोग मलमपट्टीसाठी देखील करतात. विविध प्रकारच्या व्रणांवर लसणीच्या रसाचे ड्रेसिंग करतात. लसूण मूतखड्यामध्ये गुणकारी आहे. कानात दडा बसला असेल तर, किंवा कान दुखत असेल तर लसणीच्या रसाचे तीन थेंब कानात टाकावेत.
लिंबू – आपल्या आहारात लिंबाला मानाचे आणि धार्मिक स्थान मिळाले आहे ते त्याच्या गुणांमुळे. लिंबू अधिक आम्लता असणारे आणि कमी साखर असणारे संत्रेच होय. भारत, श्रीलंका, मलेशिया, मॅक्सिको आणि वेस्ट इंडिजमध्ये हे फळ मुबलक प्रमाणात होते. कच्च्या लिंबाचा रंग हिरवा असतो आणि पिकल्यावर त्याचा रंग पिवळा होतो.
गुणधर्म ः लिंबू आंबट, पाचक, दीपक, हलके, नेत्र सतेज करणारे, रुचकर, काहीसे तिखट व तुरट असणारे असे आहे. लिंबू पित्तशामक, जठराग्नी प्रज्वलित करणारे, तोंड स्वच्छ ठेवणारे असून ते कफहारक व वायूहारक आहे. लिंबू हे खाल्लेले अन्न पचवते आणि बद्धकोष्ठता दूर करते. तसेच ते उलटी, कंठरोग, कॉलरा, गुल्म, आमवात, वातरक्त आणि कृमी यांचा नाश करते. लिंबू चवीला आंबट असले तरी पिकल्यावर ते क्षारधर्मी बनते. चयापचयानंतर ते शरीरात क्षार शिल्लक ठेवते.
यामुळे रक्ताम्लतेमध्ये ते अत्यंत गुणकारी आहे. लिंबाचा रस तीव्र जंतुनाशक आहे. मलेरिया, कॉलरा, घटसर्प, टाइफॉईड तसेच इतर रोगांचे जंतू लिंबाच्या रसाने नष्ट होतात.
घटक ः लिंबाच्या रसात सायट्रिक ऍसिड(7.2%) हा महत्त्वाचा घटक असतो. लिंबामध्ये सफरचंद व द्राक्षापेक्षा अधिक प्रमाणात पोटॉशियम आहे. ते हृदयास हितकारक आहे. लिंबामध्ये थोड्या प्रमाणात ए जीवनसत्व व सी जीवनसत्वही असते. शिवाय मबायोक्लोवोनॉइड्सफ जीवनसत्त्व मपीफ असल्यामुळे ते अधिक परिणामकारक बनते. लिंबाच्या रसात नियासिन आणि थायमिन देखील थोड्या प्रमाणात असते.
पाणी85 टक्के
प्रोटिन1 टक्के
चरबी0.9 टक्के
कार्बोदित पदार्थ11.1 टक्के
रेषातत्व1.8 टक्के
कॅल्शियम0.07 टक्के
फॉस्फरस0.03 टक्के
लोह2.3 मि.ग्रॅम
जीवनसत्त्व सी39 मि.ग्रॅम
औषधी उपयोग ः लिंबाचा रस नेहमी पाण्यात मिसळून प्राशन करावा. नुसता लिंबाचा रस घेऊ नये. नुसत्या रसात तेजाब असते जे दातावरील इनॅमलला घातक ठरते. सकाळच्या प्रहारी रिकाम्या पोटी एक ते दोन ग्लास थंड पाण्यात लिंबाचा रस व मध घालून ते पाणी प्राशन केल्यास शरीर शुद्ध होते. अधून मधून गरम पाण्याचा देखील उपयोग करावा; त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो. लिंबाचा रस फ्लू आणि न्युमोनियामध्ये गुणकारी असून त्यामुळे सर्दी देखील नाहीशी होते. नोबल पारितोषिक विजेते प्रोफेसर फॅनमुलर यांनी केलेल्या प्रयोगामध्ये लिंबू जंतुनाशक असल्याचे सिद्ध केले आहे.
लिंबाच्या रसात जंतुनाशकतेचा व रोगप्रतिकारतेचा गुण असल्याने पावसाळ्यात लिंबाचे अधिक सेवन करावे. लिंबाचा रस तापामध्ये गुणकारी आहे. लिंबू-पाणी मधुमेहाच्या रुग्णांची तहान भागवण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. पोट बिघडले असता लिंबू पाणी घ्यावे. या रसामुळे उत्तेजित झालेल्या ज्ञानतंतूंना स्थैर्य प्राप्त होते. हृदयास आराम वाटतो व हृदयात होणारी धडधड कमी होते. लिंबाच्या रसात असणारे सी जीवनसत्व अत्यंत गुणकारी आहे. समुद्रप्रवासात वरचेवर लिंबू पाणी घ्यावे. लिंबामध्ये असलेल्या बायोक्लेवोनॉइड्समूळे शरीरातील रक्तवाहिन्या सुदृढ होतात.
या रसामुळे शरीरातील अतंर्भागात होणारा रक्तस्राव थांबतो. लिंबाच्या रसातील या गुणामुळे रक्तदाब वाढला असता रुग्णांच्या रक्तवाहिन्या तुटण्याचा संभव असतो तो टळतो. दातांच्या व हाडांच्या मजबूतीसाठी लिंबू अत्यंत उपयुक्त आहे; कारण लिंबामध्ये असणाऱ्या मसीफ जीवनसत्त्वाचा कॅल्शियमच्या चयापचयाच्या क्रियेत महत्त्वाचा वाटा आहे. संधिवाताच्या विकारात लिंबू रसाचे सेवन करावे. लिंबाचा रस मूत्रगामी आहे.
त्यामुळे मूत्रपिंड व मूत्राशयाच्या रोगामध्ये ते गुणकारी आहे. उचकी येणे, उलटी होणे तसेच यकृताचे विकार वगैरे अनेक रोगांमध्ये लिंबाच्या रसाचा उपयोग होतो. गिर्यारोहकांना सुध्दा लिंबूपाण्याचा क्षुधानिवारणासाठी उपयोग होतो. ज्या ठिकाणी ऑक्जिन कमी असेल आणि श्वास घेण्यात त्रास होत असेल तर लिंबूपाणी उपयुक्त असते. पित्तशमन करण्यासाठी लिंबू पाणी प्राशन करावे.
हळद – हळदीमध्ये यकृताला उत्तेजित करून त्याला सुदृढ करण्याची शक्ती असून, रक्त शुद्ध करण्याचा देखील तिच्यात गुण आहे. हळद मुळाच्या स्वरूपात जमिनीखाली होते. तिचा रंग पिवळा असतो. आपल्या आहारात कोरड्या हळदीचा समावेश रोजच असतो पण ओल्या हळदीचा उपयोग फारसा केला जात नाही. कोरड्यापेक्षा ओली हळद गुणकारी असते.
गुणधर्म ः आयुर्वेदाच्या मते हळद तीव्र, तिखट, उष्ण, भूक वाढविणारी, कृमीनाशक, कफनाशक, शोधघ्न, वायुनाशक, शुष्क, व्रणशोधक, यकृत उत्तेजक, कांतिवर्धक आणि वर्णसुधारक आहे. सर्दी, कफ, वायू , रक्तदोष, कोड, मधुमेह, कंड सुटणे, त्वचादोष, सूज, पांडुरोग, नाकाच्या दुखण्यात, अरुची वगैरे विकारांमध्ये हळद उपयोगी आहे.
घटक ः पाणी13.1 टक्के
प्रोटिन6.3 टक्के
चरबी5.1 टक्के
कार्बोदित पदार्थ69.4 टक्के
खनिज पदार्थ3.5 टक्के
कॅल्शियम0.15 टक्के
फॉस्फरस0.28 टक्के
लोह18.6 मि. ग्रॅम
जीवनसत्त्व ए100 ग्रॅम
औषधी उपयोग ः हळद वाटून तिचा रस काढावा. दोन ते तीन चमचे रस नुसताच किंवा थोड्या पाण्यामध्ये मिसळून सेवन करावा. यकृताला उत्तेजित करून सुदृढ करण्याची शक्ती हळदीत असते. हळदीच्या रसाने यकृताची शक्ती वाढते. वृद्धत्वातही उत्साह वाढतो व इतर व्याधी दूर होतात. यकृत सुदृढ व कार्यक्षम बनते. काविळीमध्ये हळदीचा रस गुणकारी असतो. ओल्या हळदीचा रस रक्तशोधक व कफनाशक आहे.
काचबिंदू, फुल पडणे, रातधांळेपणा येणे या डोळ्यांच्या विकारांत, हळदीचा रस डोळ्यांत घातला असता फायदा होतो. कोड, हात किंवा पाय अत्यंत स्थूल होणे या रोगांमध्ये रस सकाळ-संध्याकाळ नियमितपणे घेतल्यास गुण येतो. हळदीचा ताला रस सेवन केल्याने अगर हळदीची पूड (चूर्ण) गरम दुधात घालून प्यायल्याने सर्दी-खोकल्यामध्ये निश्चितपणे फायदा होतो. मुका मार बसल्याने अगर कोणत्याही प्रकारचा मार लागल्याने रक्त साकळले तर हळदीची पूड व मीठ यांचा गरम लेप त्यावर लावल्याने चांगला फायदा होतो.
नाक, गळा किंवा श्वसनलिकेतून कफ बाहेर पडत असेल तर हळदीचा रस अत्यंत गुणकारी आहे. तो त्वचेत रुक्षता आणून कफ कमी करतो. त्वचा रोगांत हळद फारच गुणकारी आहे. हळदीच्या सेवनाने मातेचे दूध शुद्ध होते. लोण्यात हळद मिसळून शरीराला मालीश केले असता त्वचा मुलायम होते व त्वचारोग नाहीसे होतात.
मध – अति प्राचीन काळापासून भारतात मधाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. इजिप्तमध्ये देखील अनेक औषधे बनविण्यासाठी मधाचा उपयोग केला जात असे. मधाच्या एका थेंबात हजारो फुलांचा रंग आणि मनमोहक सुगंध लपलेला असतो. मध म्हणजे फुलांचा सुगंध आणि माधुर्य यांचे एकत्रीकरण असते. मधमाशा फुलांमधून मधूर रस शोषून घेऊन मधाच्या पोळ्यामध्ये साठवतात.
एक किलो मध तयार करण्यासाठी मधमाशांना दोन ते पाच लाख फुलांवर बसावे लागते. कित्येकदा फुलांच्या शोधात मधमाशी स्वतःच्या पोळ्यापासून दोन मैल लांब देखील जाते. मधाच्या पोळ्यामध्ये साठलेल्या मधात सुरवातीला 75 टक्के पाणी असते; पण काही दिवसांनंतर त्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन जाते. शेवटी मधामध्ये 20 टक्केच पाणी राहते.
घटक ः फुलांचा रस म्हणजे इक्षुशर्करेचाच एक प्रकार आहे. परंतु मधाच्या पोळ्यात त्या रसामध्ये रासायनिक फेरफार होत असतात; त्यामुळे इक्षुशर्करेचे द्राक्षशर्करेमध्ये आणि फलशर्करेमध्ये रूपांतर होत असते. यामुळेच मधात फक्त 1.9 टक्केच इक्षुशर्करा असते. 76.4 टक्के एकूण शर्करेमध्ये 40.5 टक्के लॅव्युलोज आणि 34 टक्के डॅक्स्ट्रोजचे प्रमाण असते. इतर पदार्थात डॅक्स्ट्रीन 1.5टक्के आणि राख 0.18 टक्के असते.
मधामध्ये अल्प प्रमाणात लोह, फॉस्फरस, कॅल्शिक्षरयम , सोडियम, पोटॉशियम, सल्फर आणि मॅंगेनीज देखील असते. मधाचा रंग जो जो गडद होत जातो तो तो त्यातील क्षारांचे प्रमाण वाढत जाते. मधामध्ये थोड्या प्रमाणात जीवनसत्त्वे देखील आहेत; थायमिन 6 मायक्रोग्रॅम, रिबोफ्लेविन 60 मायक्रोग्रॅम, नियासिन 32 मायक्रोग्रॅम आणि मसीफ जीवनसत्त्व 5 मायक्रोग्रॅम.
औषधी उपयोग ः कष्टदायक खेळानंतर खेळाडूंना गरम पाण्यात मध घालून दिला तर तो उपयुक्त ठरतो. मध दीर्घायुष्य मिळवून देणारा आहे. मध चक्षुष्य आहे, तो डोळ्यांच्या विविध औषधांमध्ये वापरला जातो. मध रसायन, संधान, मेदहर आणि कफनाशक आहे. मध योगवाही असतो. कार्बोदित पदार्थांपेक्षा तो पचनसुलभ आहे. फुफ्फसाचा क्षय झालेला असेल तर रोज 500 ते 750 ग्रॅम मध रुग्णाला द्यावा. त्यामुळे रुग्णाचे वजन वाढते. त्यांचा खोकला कमी होतो आणि रक्तदेखील शुद्ध होते. मधसेवनाने शरीराला उष्णता मिळते. मधातील शर्करा पूर्वपाचित असते. त्याचे शोषण जिभेपासूनच सुरू होते. मधाच्या पचनासाठी पचनसंस्थेच्या अवयवांना शक्ती खर्च करावी लागत नसल्याने अशक्त माणसांना मध उपयुक्त असतो. अपचन, पोटातील सूज व आम्लतेमध्ये -ऍसिडिटीमध्ये मध अतिशय गुणकारी आहे.
तापामध्ये पचनक्रियेची शक्ती वाढवण्यासाठी, रुग्णाची शक्ती टिकवून धरण्यासाठी मधपाणी उपयुक्त ठरते. टाइफॉइड आणि न्युमोनियामध्ये मधपाणी सेवन करावे. हृदय आणि यकृताच्या विकारांत मधपाणी घ्यावे. हृदय दुर्बल झाले असता अगर मूर्च्छा आली असता गरम पाण्यात मध घालून दिल्याने शक्ती वाढते. मधामध्ये प्रभावी असे जंतुनाशक गुण असतात. जुलाब होत असतील तर मधपाणी घ्यावे. तसेच पॅराटाइफॉइड आणि टाइफॉइड झाला असता मधपाण्याचा उपाय करतात. कुठल्याही व्रणांवर मध चोळल्यास जखमा लवकर भरून येतात. मध सौम्य विरेचक आहे. त्याच्या सेवनाने बद्धकोष्ठता नाहीशी होते; तसेच सर्दी खोकला आणि गळा दुखत असता मध गुणकारी आहे. मूत्रविकारात आणि संधिवातामध्ये मधपाणी अत्यंत उपयुक्त ठरले आहे.
नीरा (ताडगोळ्यांचा रस) – मधूर चवीची, तरतरी आणणारी नीरा हे आबाल वृद्धांचे आवडते पेय आहे. या पेयात नैसर्गिक साखर असल्याने नीरा घेताच तरतरी वाटते. याशिवाय लोह, जीवनसत्व क जीवनसत्व ब1 व ब2, नायासिन एवढे घटक असतात. नीरा आंबू नये म्हणून त्यात थोडा चुना(कॅल्शियम) घालतात. अशा प्रकारे नीरा पिल्याने कॅल्शियमचीसुद्धा प्राप्ती होते. नीरा पिल्याने लघवी साफ होते व लघवीवाटे अनेक विषारी द्रव्यांचा निचरा झाल्याने अनेक तक्रारी कमी होतात.
यामुळेच मुलातील खरूज, नायटा यासारचे विकार नीरा पिल्याने नष्ट होतात. नीरा पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते, दात व हिरड्यांचे आरोग्य सुधारते, मूत्रमार्गातील अडथळे दूर होतात, रक्ता हिमोग्लोबीन वाढते. उंची वाढण्याच्या काळात नीरा पिल्यास उंची वाढण्याससुद्धा मदत होते. नीरा पिल्याने लघवीवाटे शरीरातील कचरा त्वरीत बाहेर टाकला जातो व रक्तशुद्धी होते. म्हणूनच हे सौंदर्य वर्धक पेय आहे. लोह रक्ताचा प्राण असून लोहाचे महत्व सांगण्याची गरज नाही. शरीरात रोज कमीतकमी 12 मि. ग्रॅम लोह मिळालेच पाहिजे व त्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाव्या लागतात.
हिरव्या भाज्या पहाताच ज्यांना मळमळ होते त्यांनी रोज ग्लासभर नीरा घेतल्यास त्यांना 62 मि.ग्रॅ. नैसर्गिक लोहाची हमखास प्राप्ती होऊ शकते. ग्लासभर नीरेत थायमिन व रायबोफ्लोविन ही ब वर्गातील जीवनसत्वे प्राप्त होतात. या जीवनसत्वांमुळेच तारुण्याचा उत्साह वाढतो, वृद्धत्व रोखून ठेवता येते, ज्ञानतंतू निकोष राहतात, पचन व दृष्टी सुधारते. नीऱ्यातील बी 2 जीवनसत्वामुळेच नियमीत घेणाऱ्यांमध्ये तोंड येण्याची तक्रार कमी होते. या व्यक्तींना भूक चांगली लागते व झोपही नीरा घेतल्याने चांगली येते कारण ती चढते असे नसून त्यातील नायासिन या घटकामुळे झोप सुधारते. नीरेचे ताडीत रूपांतर झाल्यास ती चढते.