साहित्य – एक लिटर म्हशीचे मलईयुक्त दूध, ३ वाट्या साखर, १ वाटी मैदा, अर्धा चमचा वेलची पूड, पाव किलो साजूक तूप, केशर, १ लिंबू.
कृती – कढईमध्ये दूध आटवत ठेवावे. ते निम्म्यापेक्षा थोडे कमी होईल इतपत आटवावे. त्यात केशर घालावे. ४-५ चमचे पिठीसाखर घालावी. ५० ग्रॅम (लहान वाटीभर) तूप घालून तूप मिश्रणात एकजीव होईपर्यंत ढवळत राहावे. तूप चांगल्या प्रकारे मिसळल्यावर गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर त्यामध्ये १ वाटी मैदा घालून मिश्रण एकसर करून घ्यावे. एकही गुठळी राहू नये. हे मिश्रण साधारणपणे ईडलीच्या पिठाइतपत करावे व २० मिनिटे बाजूस ठेवावे. यानंतर पॅनमध्ये साजूक तूप घालून तूप तापल्यावर पुरीच्या आकाराचे मालपुवे करून घ्यावेत.
पाकासाठी ३ वाट्या साखरेत दीड वाटी पाणी घालून एकतारी पाक करून घ्यावा. त्यात अर्ध्या लिंबाचा रस व अर्धा चमचा वेलची पूड घालावी. तयार झालेले मालपुवे या पाकात टाकावेत. अर्ध्यातासाने पाकातील मालपुवे डिशमध्ये काढून घ्यावेत व त्यावर काजू, बदाम, पिस्ते यांचे काप व केशराच्या काड्या घालाव्यात.