दूध हे धातुवर्धक व बलकारक असते. दुधाच्या सेवनाने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते व शरीर निरोगी राहते. दूध हे जीवनदायी रसायन व पूर्ण अन्न आहे. दुधापासून दही, लोणी, तूप, ताक बनविले जातात, हे सर्वांनाच माहीत आहे. त्याचप्रमाणे दुधापासून अजून एक पदार्थ बनविला जातो, “पनीर’. दूध नासवून त्यापासून पनीर बनविण्याची सुरुवात पर्शियन लोकांपासून झाली.
पनीर दुधापासून बनत असल्याने शरीराला आवश्यक असणारे दुधातील पोषक घटक व जीवनसत्त्वे पनीरमध्ये असतात. पनीर बाजारात विकत मिळते. तसेच ते घरच्या घरी बनविता येते.
कृती :
1 लिटर दूध, 1/2 टेबलस्पून व्हिनेगर किंवा लिंबाचा रस हे साहित्य लागते. प्रथम दुधात व्हिनेगर घालून दूध उकळण्यास ठेवा. दूध उकळताना सतत मिश्रण ढवळत राहा. हळूहळू दूध नासण्यास सुरुवात होते. दूध पूर्णपणे नासून चोथा-पाणी वेगळे झाल्यावर गॅस बंद करून 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवा. स्वच्छ पातळ फडक्यात चोथा घालून सर्व पाणी दाबून काढून टाका. पनीर बाहेर काढून मळून घ्या.
अशा मऊसूत पनीरला बंगालीत छेना म्हणतात. ते रसगुल्ला, रसमलाई, संदेश अशा बंगाली मिठायांत वापरले जाते. पंजाबी पदार्थांसाठी पनीरचे चौकोनी तुकडे लागतात.
त्यासाठी पनीर फडक्यात घालून आतील गोळा चौकोनी होईल, अशा आकाराचे जड वजन फडक्यावर 2 ते 3 तास ठेवून द्यावे. नंतर वड्या कापाव्यात.
पनीर संपूर्णत: शाकाहारी असते. त्यातून कॅल्शियम व प्रोटीन्स मिळतात. रसमलाईच्या पनीरसाठी गाईचे दूध वापरावे.
पनीर भुर्जी- 125 ग्रॅम पनीर कुस्करून घ्यावे. पातेल्यात तेलावर चिरलेला कांदा व दोन हिरव्या मिरच्या परतून घ्या. त्यात गरम मसाला व तिखट घालून परता. वरून कुस्करलेले पनीर, मीठ, कोथिंबीर घालून दोन मिनिटे परता व गॅस बंद करा. पनीर जास्त परतल्यास चिवट होते.