मद्यसेवनाने यकृत विकारात वाढ
नियमित दारूच्या व्यसनामुळे शरीरातील जवळ-जवळ सर्व क्रियांवरती लक्ष ठेवण्याची महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या यकृतावर विपरित परिणाम होत आहे असे वोक्हार्ट हॉस्पिटलने निदर्शनास आणले आहे.
दारूचा आजार हा मधुमेहाप्रमाणेच जन्मभराचा असतो, तो शारीरिक, मानसिक, बौद्धिक, नैतिक, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय पातळीवर फक्त आणि फक्त बरबादीच करतो. नियमित दारूच्या व्यसनामुळे शरीरातील जवळ-जवळ सर्व क्रियांवरती लक्ष ठेवण्याची महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या यकृतावर विपरित परिणाम होत आहे असे वोक्हार्ट हॉस्पिटलने निदर्शनास आणले आहे.
यकृत हा एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. तो खनिजं, जीवनसत्त्वं साठवून ठेवतो आणि शरीरातील 80 टक्के चांगल्या कोलॅस्टेरॉलची निर्मिती करतो. यकृतामध्ये पित्त या घटकाची निर्मिती होते. पित्तामुळे शरीरातील मेदाचं पचन होतं परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे यकृताच्या आजारांमध्ये वाढ असल्याचे दिसून आले आहे.
कामाचा ताण, अवेळी खाणे – पिणे, एकाच ठिकाणी बसून काम करणे, आर्थिक अडचणी, मानसिक ताण, नियमित दारूचे व्यसन या सगळ्यांचा परिणाम म्हणजे वाढत जाणारा लठ्ठपणा. लठ्ठपणा वाढल्याने शरीरातील मेदाचे प्रमाण वाढते. यकृतातील मेदाचेही प्रमाण वाढल्याने कार्यक्षमता कमी होऊन ते कठीण होत जाते म्हणजेच त्याचे कार्य थांबते.
आजमितीला भारतामध्ये 100 पैकी 20 ते 30 जणांना यकृतातील मेद वाढीचा आजार जडलेला आहे. वेळीच उपचार केल्यास आजार बरा होऊ शकतो पण, निदान झाले नसल्यामुळे याची जाणीव अनेकांना नसते. भरपूर दारू पिणाऱ्यांच्या यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशांना अल्कोहोलिक हेपॅटिटिस, मेदयुक्त यकृत आणि अल्कोहोलिक सिरॉसिस (यकृत काठीण्य) हे आजार जडू शकतात.
सध्याची कुटुंब व्यवस्था ही स्वतंत्र असून आधुनिक मम्मी डॅडीना मुलांना वेळ देता येत नाही. पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धती नसल्यामुळे कुटुंबांचा धाक असणं हा प्रकार आता पाहायला मिळत नाही. त्यामुळे आजच्या युवा पिढीला व्यसनांपासून दूर ठेवणे फार अवघड आहे. वाईन शॉपच्या बाहेर असणारी आजच्या युवा वर्गाची गर्दी पाहता भविष्यात भारतामध्ये यकृताच्या आजारांमध्ये नक्की वाढ होणार असे तज्ञ डॉक्टरांचे मत आहे. यकृताचा कर्करोग आणि सायरोसिसमुळे भारतामध्ये तब्बल तीन लाखावर व्यक्ती दगावतात. तर दरवर्षी दोन लाख यकृताने आजारी व्यक्तींना अखेरच्या क्षणी निदान होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मृत्यूच्या कारणांमध्ये यकृताचा आजार हे तिसरे कारण ठरत आहे.
यकृताचा विकार वाढण्याची भीती
विषाणूमुळे होणारा हेपॅटायटिस ही चिंतेची बाब होऊ लागली आहे. हा संसर्गजन्य रोगांचा समूह आहे. त्याला हेपटायटिस ए, बी, सी, डी आणि ई असे म्हणतात. जगभरात लक्षावधी व्यक्तींना या रोगाची लागण होत आहे. यापैकी हेपॅटायटिस बी आणि सी हे गंभीर स्वरूपाचे यकृताचे विकार आणि यकृताच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरू लागले आहेत.
बैठी जीवनशैली आणि मधुमेह, स्थूलपणा यासारखे विकार हे चरबीयुक्त यकृतासाठी कारणीभूत ठरू लागले आहेत. यकृताला इजा झाल्यामुळे हेपॅटायटिस होऊ शकतो किंवा कर्करोग होण्याचीही शक्यता असते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) भारतात 40 दशलक्ष व्यक्तींना हेपॅटायटिस बी या विकाराची लागण झालेली आहे आणि 6 ते 12 दशलक्ष व्यक्तींना गंभीर स्वरूपाचा हेपॅटायटिस सी झालेला आहे.
गंभीर स्वरूपाचा हेपॅटायटिस असलेल्या व्यक्तींपैकी केवळ 5% व्यक्तींनाच या विकाराचा संसर्ग झाल्याची जाणीव आहे. यापैकी केवळ 1% व्यक्तींना यावरील उपचार उपलब्ध आहेत. हेपटायटस ई हा विषाणू संसर्गजन्य हेपॅटायटिससाठी कारणीभूत आहे. मुलांमध्ये बहुधा हेपॅटायटिस ए हा विषाणू आढळतो. यकृत निकामी होण्यासाठी बहुधा हेपटायटिस ई हा विषाणू कारणीभूत ठरतो.
मुंबईतील रिजनरेटिव्ह मेडिसीन रिसर्चर डॉ. प्रदीप महाजन म्हणतात, यकृताचा बहुतेक भाग हा यकृताच्या पेशींपासून तयार झालेला असतो. त्याला हेपॅटोसाइट्स म्हणतात. या पेशींचे सरासरी आयुर्मान 150 दिवसांचे असते. याचा अर्थ हा की यकृत नियमितपणे स्वत:ची पुनर्निर्मिती करत असते. हा एकमेव अवयव असता आहे ज्याची पुनर्निर्मिती होऊ शकते. यकृताच्या कर्करोगाचे प्रमाणही वाढू लागले आहे. यात कर्करोग पसरून यकृतापर्यंत पोहोचण्याऐवजी त्याची सुरुवातच यकृतापासून होऊ लागली आहे. याचा संबंध हेपटायटिस सी या विषाणूच्या संसगार्शी आहे.
या विषाणूमुळे यकृताचा दाह होतो. हेपॅटायटिस सी या विषाणूची वाढ हळूहळू होत असल्याने, ज्यांना आता कर्करोग झाला आहे त्यांना हेपॅटायटिस विषाणूचा संसर्ग 20, 30 किंवा 40 वर्षांपूर्वी झालेला असतो.
यकृतातील मेदाचे प्रमाण वाढते आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात अनेक जण आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात.
त्यामुळे मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा या आजारांबरोबरच अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव या कारणांमुळे 100 पैकी 20 ते 40 जणांच्या यकृतातील मेदाचे (फॅटी लिव्हर) प्रमाण वाढत आहे. तसेच शहरी जीवनशैलीमुळे लहान वयातच जवळपास 35 टक्के मुलांत लठ्ठपणा वाढत असल्याचे दिसून येत असल्याने तरुण वयात यकृतातील मेदाचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
भारतात दरवर्षी 2 लाख लोक यकृत निकामी झाल्यामुळे मृत्यू पावतात. केवळ मद्यपानामुळे यकृत खराब होत नाही तर जीवनशैलीही निगडित आजार, अनुवंशिकता यामुळेही यकृतातील मेदाचे प्रमाण वाढते आहे. यापैकी जवळपास 60 टक्के एनएएफएलडी (नॉन अल्कोहलिक फॅटी लिव्हर डिसिज) तर 40 टक्के दारू चे व्यसन असल्यामुळे यकृतात मेदाचे प्रमाण वाढत आहे.
हेपॅटायटीस बी करता उपलब्ध असलेली लस आणि हेपॅटायटीस बी व सी करता केले जाणारे परिणामकारक औषधोपचारांमुळे यकृत निकामी होण्याच्या घटना कमी होऊ लागल्या आहेत, परंतु अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजारांमुळे कर्करोगही होण्याची शक्यता असते. यकृताच्या कर्करोगामुळे होणा-या मृतांच्या आकडयातही वाढ होते आहे.
यकृत हा मानवी शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, परंतु 50 टक्के समस्या या यकृतात मेदाचे प्रमाण वाढल्यामुळे निर्माण होतात. त्यामुळे अनेकदा यकृत प्रत्यारोपणाची गरज भासते. याशिवाय हेपॅटायटीस बी किंवा सी यापेक्षाही यकृतात मेदाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने मधुमेहानंतर भारतात यकृताचा आजार 9 व्या स्थानावर आहे.
तरुणांत यकृत निकामी होण्याचे प्रमाण अधिक
दारू शरीराला हानिकारक असतानाही जगातील सर्वच देशांत तरुणांपासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत दारू पिणा-यांचे प्रमाण वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, 2014 मध्ये भारतात 33 लाख लोकांचा मृत्यू दारूमुळे झाला होता. तर 15-20 वयोगटातील पुरुषांच्या मृत्यूसाठी दारू हेच प्रमुख कारण होते.
दारूचे सेवन केल्यामुळे यकृतात चरबीचे प्रमाण वाढत राहिल्यामुळे यकृत निकामी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दारू पिण्याचे सरासरी वय भारतात 27 वर्षे होते, मात्र सध्याच्या बदलत्या युगात 17 वर्षातील तरुणही बिनधास्त दारूच्या आहारी जाऊ लागले आहेत. त्यामुळे तरुणांत यकृत निकामी होण्याची भीती अधिक प्रमाणात आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात 60 कोटी लिटर मद्यनिर्मिती केली जाते व तेवढीच खपवलीसुद्धा जाते. त्यामुळे आज कोणत्याही खासगी किंवा सरकारी रुग्णालयात जा; तेथे 10 ते 12 टक्के रुग्ण हे यकृत निकामी झाल्याने त्रस्त आहेत. त्यामुळे दारूचा प्रसार आणि प्रचार रोखण्यासाठी राज्य स्तरावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
मधुमेहामुळे यकृताच्या कर्करोगाचा धोका
मधुमेहामुळे यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढतो, असे संशोधन शास्त्रज्ञांनी केले आहे. मधुमेह हा आजार आयुष्यभराची साथ करणारा आहे. हा आजार झाल्यास तो बरा होत नाही. त्याला नियंत्रणात ठेवावे लागते. त्यामुळे औषधांबरोबरच नियमित पथ्य केल्यावरच तो नियंत्रणात राहू शकतो. या मधुमेहामुळे अन्य आजार होण्याची शक्यता वाढते. मधुमेहामुळे यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढतो, असे संशोधन शास्त्रज्ञांनी केले आहे.
या नवीन आजाराचे नामकरण शास्त्रज्ञांनी हेप्टोसेल्यूलर कार्सिनोमाफ असे केले आहे. पन्शेत्मधुमेह नसणा-या व्यक्तींपेक्षा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये यकृताचा कर्करोग होण्याचे प्रमाण तिप्पट असते. लठ्ठपणा आणि मधुमेह प्रतिबंधक उपाययोजना कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेने प्रयत्न करायला हवेत, असे दक्षिण कॅलिफोर्नियातील केक स्कूल ऑफ मेडिसीनचे सहाय्यक प्राध्यापक व्ही. वेंडी सेटियावन यांनी सांगितले.
काही विशिष्ट वंशांच्या गटांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक वाढलेले दिसले. मधुमेहाची काळजी न घेणाऱ्या व्यक्तींमध्ये यकृताच्या कर्करोगाचे प्रमाण वाढलेले आढळले. 1993 ते 1996 दरम्यान मधुमेह झालेल्या एक लाख 50 हजार व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. यात यकृताचा कर्करोग झालेले 506 जण आढळले.
यकृत आणि आयुर्वेद
हल्लीच जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्ल्यूएचओ)एक अहवाल जाहीर झाला. या अहवालानुसार दीर्घकालीन यकृत आजारांमुळे एकटया भारतात दरवर्षी दोन लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडतात. अशा वेळी यकृताची काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं.
शरीरातील जवळ-जवळ सर्व क्रियांवरती लक्ष ठेवण्याची महत्त्वाची भूमिका निभावणारा यकृत हा एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. तो खनिजं, जीवनसत्त्वं साठवून ठेवतो आणि शरीरातील 80 टक्के चांगल्याफ कोलॅस्टेरॉलची निर्मिती करतो. यकृतामध्ये पित्तफ या घटकाची निर्मिती होते. पित्तामुळे शरीरातील मेदाचं पचन होतं. यकृतामुळे शरीरातील रक्त साकळण्याची क्षमताही वाढते. त्यामुळे रक्ताची गुठळी होण्यास मदत होते. या क्रियेचा फायदा शरीराला इजा झाली असता रक्ताचा अतिप्रवाह थांबतो. यावरून यकृताला किती जपलं पाहिजे, हे लक्षात येतं.
काळजी कशी घ्यावी?
यकृताचं आरोग्य सुधारण्याचे योग्य पर्याय म्हणजे समतोल आहार, नियमित व्यायाम. हल्ली यकृताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी लसीही दिल्या जातात. या लसींमुळे कावीळ या आजाराचा धोका कमी होतो. यकृताची काळजी घेण्यासाठी पुढील उपाय करावेत.
भरपूर दारू पिणाऱ्यांच्या यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशांना अल्कोहोलिक हेपॅटिटिस, मेदयुक्त यकृत आणि अल्कोहोलिक सिरॉसिस (यकृत काठीण्य) हे आजार जडू शकतात. नियमित दारू पिणाऱ्यांनी व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन दारू सोडावी.
अंमली पदार्थामुळेही यकृत पेशींचं आरोग्य धोक्यात येतं. अमली पदार्थाचं सेवन करणा-याची सवय असणाऱ्यांनी व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन सोडवणूक करावी. डॉक्टरांद्वारे दिली गेलेली काही औषधंसुद्धा यकृतासाठी घातक असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांनी सल्ला दिल्याशिवाय शिफारीत डोसापेक्षा अधिक औषध घेऊ नका.
रंगांच्या थिनरपासून निघणारा विषारी धूर, ढेकूण मारण्याची औषधं आणि तत्सम फवारे फुप्फुसातील अत्यंत छोटया रक्तवाहिन्यांमधून शरीरात शिरकाव करू शकतात. यकृतापर्यंत जाऊन तिला इजा करू शकतात. तेव्हा अशी उत्पादने वापरण्याआधी संरक्षणात्मक मुखवटा (मास्क) वापरावा.
एफ, बीफ, सीफ, डीफ आणि ईफ या काविळीच्या (हेपिटायटीस) विविध प्रकारांमुळे यकृताला सूज येते. यकृताच्या नेहमीच्या कार्यावर विपरित परिणाम होतो. सततच्या काविळीमुळे यकृतावर जखमा होऊन त्याची परिणीती यकृताच्या कर्करोगात होते.
वनौषधी आणि यकृताचं आरोग्य
नैसर्गिक आहारामुळे यकृताचं एकंदरीत स्वास्थ्य चांगलं राहातं. रोजच्या आहारात लसूण, लिंबू, हळदीचा समावेश असावा. जसं की, लसणीमुळे यकृतातील एन्झाइम (विकरं) प्रेरित होतात. ही एन्झाइम शरीरातील टॉक्सिन (विषद्रव्यं) काढून बाहेर टाकण्यास मदत होते. सकाळी लिबांचा ताजा रस प्यायल्याने यकृताला चालना मिळते, तर हळदीतील क्युमीन हा रासायनिक घटक कर्करोगासाठी घातक घटकांचा शरीरातून नाश करतो. यकृताचे शुद्धीकरण वाढतं. या व्यतिरिक्त, काही कमी माहीत असलेल्या वनऔषधींमध्ये यकृताचं रक्षण करणारे गुण असल्याचे संशोधनात आढळून आलं आहे.
चिकोरी (कासनी):
ही वनस्पती भारताच्या उत्तर आणि दक्षिणेकडील जंगली भागात वाढते. सक्षम विषद्रव्यं निष्कृतीकारक आहे. या वनस्पतीमुळे पित्त निर्मितीसुद्धा वाढते
काबरा (हिम्सरा) :
पी-मेथॉक्सी बेंझोइक ऍसिडचं प्रमाण काबरा या वनस्पतीत असतं. या वनस्पतीमुळे यकृताची कार्यक्षमता वाढते.
कांगणी (काकामाची) :
हे रासायनिक द्रव्यांमुळे इजा पोहोचलेल्या यकृताच्या उपचारासाठी फायदेशीर आहे.
अर्जुन :
या झाडाच्या सालीचा उपयोग यकृताच्या आरोग्यासाठी होतो. यकृतासाठी ही साले प्रतिऑक्सिडीकारक म्हणून गुणकारी ठरते. विषद्रव्यांपासून यकृताचं संरक्षण करण्याचा गुणधर्म या सालीत आहे.