[[{“value”:”
कात्रज – कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची मुदत फेब्रुवारी २०२४ मध्ये संपल्यानंतर पुन्हा डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, अवघ्या महिनाभरात काम पूर्ण होण्याची शक्यता ही धूसर आहे. त्यातच येथील वाहतूक वळविण्याच्या नियोजनाअभावी हे रखडले आहे. त्यामुळे या पुलाचे काम पूर्ण होण्यास नवे वर्षे २०२५ उजाडणार, अशी स्थिती आहे.
कात्रज चाैकातील वाहतूक वळविण्याच्या दोन चाचण्यातील त्रुटींबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व वाहतूक पोलीस विभागाकडून अभ्यास सुरू आहे. वाहतूक कोंडीचा कळीचा मुद्दा ठरत असलेले पीएमपीएल प्रशासन गांभीर्याने घेणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याचे काम मुख्य कात्रज चौकात आले आहे. हे काम करण्यासाठी वाहतूक वळविणे आवश्यक असून वाहतुकीला पर्यायी व्यवस्था करून द्यावी लागणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक वळविण्याबाबत दोन वेळा चाचण्या घेत प्रयत्न केला. मात्र, परिपूर्ण नियोजन नसल्याने वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात कोंडीला सामोरे जावे लागले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, भारती विद्यापीठ वाहतूक विभाग,एस.टी.महामंडळ, पीएमपीएल प्रशासन, खासगी वाहतूक, रिक्षा थांबे यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेत झालेल्या त्रुटीबाबत अभ्यास करून नियोजन केले जात आहे. कात्रज चौकातील कोंडी फोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी वाहतुकीत बदल, पीएमपीएलसह सर्वच वाहतूक घटकांनी प्रतिसाद देणे गरजेचे ठरत आहे.
या उपाययोजनांची गरज
– अवजड वाहने, बस नवीन बोगदा मार्गे नवले पूल, सिहगड रस्तावर वळवणे.
– जुन्या बोगद्यातून येणाऱ्या पीएमटी बस गुजरवाडी फाटापर्यंत थांबवणे.
– स्वारगेट- कात्रज पीएमटी बस कात्रज डेअरी चौकातून वळवणे.
– कात्रज बाह्यवळण, नवले पुलाकडून येणारी वाहतूक बेलदरे पंप पासून वळवणे.
– कोंढव्याकडून कात्रजकडे येणारी वाहतूक राजस चौकातून वळवणे.
– कात्रज चौक, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे व पार्किंग हटवणे.
उड्डाणपुलाचे काम करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वाहतुकीबाबत सगळ्या उपाययोजना करून आपण कामासाठी मुभा देणार आहोत. पीएमपी आणि इतर बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असून, यातून स्थानिक नागरिकांना कमीत त्रास होईल याकडे आपण लक्ष देणार आहोत.
– अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक
हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे. कात्रज चौकाचा टप्पा ओलांडल्यास पुलाच्या कामाला मोठ्या प्रमाणावर गती येणार आहे. हे काम नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे आणि पुण्याच्या वैभवात भर घालणरे आहे. सर्वांनी सहकार्य करावे अशी आमची अपेक्षा आहे.
– श्रुती नाईक, कार्यकारी अभियंता
सदर कामात आमच्याकडून पूर्णपणे सहकार्य राहील. तसेच, वाहतूक विभागाकडून सुचविण्यात आलेल्या विविध पर्यायी मार्गांवरून पीएमपीच्या गाड्या वळविण्यात येतील. कात्रज डेअरी, राजेस सोसायटी चौक, गुजरवाडी फाटा आदी ठिकाणी तसे नियोजन करण्यात येईल.
– गोविंद हांडे, आगारप्रमुख, कात्रज
The post pune news : पूल पूर्ण होण्यास नवे वर्षे उजाडणार ! कात्रज चौकातील कामात वाहतुकीचा अडथळा कायम appeared first on Dainik Prabhat.
“}]]