पुणे – क्षय रोगावरील (टीबी) प्रतिबंधक औषधांचा अद्यापही तुटवडा कायम आहे. एकाबाजूला गेल्या अनेक दिवसांपासून औषध खरेदी सुरू असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे औषधेच उपलब्ध नाहीत अशी स्थिती आहे. जागतिक क्षयरोग प्रतिबंधक दिन पाळत असताना क्षयरोग्यांचे असे हाल होत असल्याची स्थिती आहे.
एका १२ वर्षाच्या मुलीला क्षयरोगाची लागण झाली आहे. तिच्या वडिलांनी क्षयरोग प्रतिबंधक औषधे मिळणाऱ्या सगळ्या केंद्रात चकरा मारल्या शेवटी त्यांना पुणे महापालिकेच्या क्षयरोग निवारण केंद्रात ती मिळाली. परंतु, केवळ दोन दिवसांचाच डोस मिळाला. “आमचे कुटुंब रोजंदारीवर काम करते, मी रिक्षाचालक आहे, असे असताना दर दोन दिवसांनी काम सोडून मी केंद्रावर कसा येऊ शकतो,’ असा प्रश्न त्यांनी सेवा उपसंचालकांना विचारला आहे.
सन २०२३ मध्ये देशात एकूण २५.४८ लाख क्षयरोगाची प्रकरणे नोंदवली गेली. ज्यातील अंदाजे ८५ टक्के जणांना औषधांची अत्यंत जरूरी आहे. केंद्रीय क्षयरोग प्रतिबंधक विभागाने १८ मार्च २०२४ रोजी सर्व राज्य क्षयरोग अधिकाऱ्यांना पत्र पाठवून औषधांची स्थानिक खरेदी सुरू करण्याला सांगितले आहे. मात्र, या खरेदीला तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागू शकत, असे या विभागाचे म्हणणे आहे.
जर औषधे देऊ शकत नसेल तर रुग्णाला ही औषधे घेण्यासाठी पैसे द्यावेत असा नियमही आहे. याबाबत उपमहासंचालक डॉ. राजेंद्र जोशी यांनी सर्व विभागांना पत्रही दिले आहे. औषधांचा तुटवडा असल्याने, काही डॉक्टरांनी प्रौढांना लहान-मुलांसाठी समायोजित केलेली औषधे देण्याला सुरूवात केली आहे. याचे कारण म्हणजे औषधोपचार करण्याला उशीर झाल्यास रुग्ण क्षयरोगाच्या पुढच्या टप्प्यात जाऊ शकतो.
“छत्तीसगडमधील आदिवासी बांधवांत मोठ्या प्रमाणात टीबीचा प्रादुर्भाव आहे. पूर्वी ड्रग रेझिस्टंट अँटी-टीबी औषधांचा तुटवडा होता, आता आपल्याकडे ड्रग-सेन्सिटिव्ह टीबी-विरोधी औषधांचा तुटवडा आहे. काही ठिकाणी डॉक्टर अॅडजस्ट करून लहान मुलांसाठी टीबीविरोधी औषधे वापरत आहेत. डोस. ड्रग सेन्सिटिव्ह अँटी-टीबी औषधांच्या औषधांना उशीर केल्याने, रुग्ण औषध प्रतिरोधक बनण्याची आणि अधिक लोकांमध्ये संसर्ग पसरवण्याची दाट शक्यता असते.” – डॉ. चैतन्या मलिक, “संगवारी’ , छत्तीसगडमधील आदिवासींसाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था
“महाराष्ट्रातही औषधांचा तुटवडा दिसून येत आहे. आम्ही क्षयरोगविरोधी औषधांसाठी निविदा काढल्या आहेत आणि येत्या १५ दिवसांत आम्ही या औषधांचा वापर करू. सध्या काही जिल्ह्यांमध्ये पुरवठा कमी आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पुरेसा पुरवठा आहे.” – डॉ. सुनीता गोल्हाईत, आरोग्य सेवा सह संचालक (क्षयरोग)
“पूर्वी ड्रग रेझिस्टंट अँटी-टीबी औषधांचा तुटवडा होता. पण, आता ड्रग सेन्सेटिव्ह औषधेही उपलब्ध नाहीत. अधिकारी आमच्या जीवाशी खेळत आहेत. सरकारचा हेतू कसा आहे? औषधे न पुरवता क्षयरोगाचे निर्मूलन करायचे? यामुळे रुग्णांनी त्याचे पालन न केल्याने आणखीनच संसर्ग अधिक लोकांपर्यंत पसरेल.” – गणेश आचार्य, क्षयरुग्ण हक्क कार्यकर्ते, मुंबई
The post Pune: क्षयरोगावरील औषधांचा अद्यापही तुटवडाच appeared first on Dainik Prabhat.