एका मोठ्या नामांकित शाळेतील 3-4 मुलांना मोबाईलवर पॉर्न साईटस बघताना शाळेच्या शिपाई काकांनी बघितलं आणि त्यांना घरून थेट मुख्याध्यापकांच्या समोरच उभ केलं. मुख्याध्यापक त्यांना अर्थातच खुप ओरडले आणि ताबडतोब त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून घेतले. पालकांसाठी हे सगळ म्हणजे मोठा शॉक होता. त्यांना काय बोलावे कळेना.
एका मुलाच्या वडिलांनी तर त्याला तिथेच मारायला सुरुवात केली आणि मुलांना वर्गात पाठवून दिलं. मुल वर्गात गेल्यानंतर त्यांनी सगळ्या पालकांना या मुलांना समुपदेशनासाठी घेऊन जाण्यास सुचविले.
समुपदेशन एका पालकांसाठी हा आणखी एक नवा धक्का बसला. अहो, माझा मुलगा काय वेडा झालाय का समुपदेशनाला न्यायला की त्याला काही मानसिक आजार झालाय? त्यांच्या या प्रश्नांवर मुख्याध्यापकांनी त्यांना समुपदेशन म्हणजे नक्की काय हे समजावून सांगितले. तेव्हा कुठे हे पालक मुलांना घेऊन जायला तयार झाले.
पालक मित्रहो ! पालक म्हणून आपण हे लक्षात घ्यायला हवं की आपलं मुल वयाच्या प्रत्येक नव्या टप्प्यात काहीतरी नवीन शिकत असतं. प्रगती करत असतं. अगदी लहान बाळसुद्धा जसं मोठ होऊ लागतं तस तस नवीन नवीन क्रिया शिकत असतं.मग ही सगळी तर तुमची मोठी म्हणजे वयात येण्याच्या उंबरठ्यावर उभी आहेत. या वयात शरीर, मन, भावना, विचार यात खुप मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. मुल स्वत:ची ओळख शोधण्याच्या प्रयत्न करत असतात.
तुम्हाला त्यांच्यात जाणवणारे बदल जसे नवे वाटत असतात तसेच ते त्यांच्यासाठीही खुप नवीन असतात. मुलं त्यांच्या पद्धतीने त्यांचे अर्थ लावण्याचे प्रयत्न करत असतात. प्रसारमाध्यम, समाजात अनेक गोष्टी पाहत असतात. ऐकत असतात. आपल्या समवयस्कांबरोबर बोलत असतात आणि यातून मिळणारी माहिती ही बहुतांश वेळेला चुकीची अशास्त्रीय अशीच असते. एकीकडे स्वत:ला स्वत:च्या दुसऱ्याच्या शरीराला जाणून घेण्याची नैसर्गिक तीव्र इच्छा आणि दुसरीकडे उपलब्ध होणारी अशास्त्रीय चुकीची माहिती या चक्रात मुलं अडकतात आणि ती माहिती मिळवण्याचा चुकीचा मार्ग स्वीकारतात.
या विषयावर तुम्ही पालक म्हणून ते तुमच्याशी मोकळेपणाने बोलतात. मनातल्या शंका विचारतील अशी आपली संस्कृती नाही. आणि घरात इतक मोकळ वातावरणही नाही. मग या मुलांनी कुठं जायच? कोणाशी बोलायच? कोण याच्या शंकाच निरसन करेल? त्यांना तर काहीच समजत नसते. ते स्वत:च धडपड करून आपल्यातल्या उत्सुकतेचे शमन करण्याचा प्रयत्न करत राहतात. आणि नेमके इथच त्यांच पाऊल चुकीचं पडण्याची शक्यता असते.
म्हणूनच अशा वेळी किंवा वयाच्या या टप्प्यात आपला पाल्य पदार्पण करतो हे तुम्हाला जाणवायला लागलं की पालक म्हणून तुम्ही पुढाकार घ्यायला हवा. त्यांच्या मनातल्या उत्सुकतेला शास्त्रीय माहितीची जोड देणं गरजेचे असतं. म्हणजे वयात येणं म्हणजे नक्की काय? या वयात शरीरात काय बदल होतात? ते का होतात? त्यांचे अर्थ काय? मनात विचारात होणारे बदल कोणते? ते कसे नियंत्रणात ठेवायला हवेत? आपल्या बदललेल्या शरीराचा स्वीकार आणि आदर कसा करावा? या गोष्टींची मनमोकळी माहिती द्यायला हवी आणि अर्थातच ती शास्त्रीय असावी. मुलांच्या उत्सुकतेच एकदाच पण समाधानकारक उत्तर त्यांना मिळालं की मग त्यांच पाऊल चुकीचं पडण्याची शक्यता कमी कमी होत जाते.
उलट ते हा बदल स्वीकारायला तयार होतात. मुलांना अश्लील चित्र पाहिली, पॉर्नसाईट पाहिल्या म्हणून त्यांना मारण्यात, शिक्षा करण्यात काहीच अर्थ नसतो. उलट या वयातली मुलं बंडखोर बनतात. त्यांची उत्सुकता, भावना भागविण्यासाठी ते अधिक वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करतात. तुमच्या शिक्षेचा त्यांच्यावर कोणताच परिणाम होत नाही.
पालक मित्र हो! एक गोष्ट लक्षात घेण व स्वीकारणं अतिशय गरजेचे आहे की प्रत्येक मुलामुलीच्या आयुष्यात ही पायरी येतेच. आपणही या पायरीतुन गेलोय. ही पायरी किंवा आयुष्यातला हा वादळी काळ त्यांच्या आयुष्यात येणारच आहे. तो पूर्णपणे नैसर्गिक आहे. त्यामुळे तो टाळणं अशक्य आहे.
मग आयुष्याची ही पायरी चढायची हे जर निश्चित आहे तर त्याला योग्य पद्धतीने कसे स्वीकारावे? खोट्या माहितीपासून कसे दूर राहावे हे तुमच्या मुलांना तुम्हीस शिकवायला हवं. जर ते तुम्हाला शक्य नसेल तर डॉक्टर, समुपदेशक यांची मदत घ्यावी आणि या त्यांच्या वादळी वयात त्यांना उत्तम साथ द्यावी. जेणेकरून त्यांची पावलं कधीच चुकीचा मार्ग स्वीकारणार नाहीत.
-मानसी तांबे-चांदोरीकर