“”अहो आमच्या या शंतनूला काय झालंय बघा. आजपर्यंत एकाही विषयात नापास न झालेला शंतनू इंजिनिअरिंगमध्ये नापास! ते ही 4-4 विषयात. इतका हुषार मुलगा म्हणून मोठ्या हौसेने घातलं याला. तर हा पठ्ठा चक्क नापास! काय करू याचं? आणि हेही एकदा नाही हो तीनदा!!”
शंतनूचे वडील अजून खूप काही बोलत होते. त्यांच्याशी बोलून झाल्यावर अर्थातच शंतनूबरोबर समुपदेशन सत्रे सुरू झाली. या सत्रांमध्ये काही मानसोपचार तंत्र वापरून सत्र घेतल्यावर लक्षात आले की, शंतनुला इंजिनिअरिंग करायचेच नव्हते. त्याला फोटोग्राफीची खूप आवड होती आणि त्याला त्यातच करिअर करायचे होते, पण वडिलांच्या कडव्या विरोधासमोर तो फारसा टिकू शकला नाही आणि त्यामुळे नाईलाजाने त्याने इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली, पण तो त्याचा आवडीचा विषय नसल्याने त्याचा तो अभ्यासच करत नव्हता. परीक्षेत अभ्यास न करता तो मुद्दामून नापास व्हायचा. कारण त्याला इंजिनिअर बनायचेच नव्हते. त्याला फोटोग्राफीच करायची होती. त्यातच करिअर करायचे होते.
वरील केस अगदी थोडक्यात दिली, पण बरेचदा करिअर निवडीबाबत निर्णय घेताना हे चित्र आपल्याला पाहायला मिळत. मुलांच्या करिअर निवडीत पालकांचा मोठा आणि लुडबुडीचा वाटा असतो. “लुडबुडीचा’ असं मुद्दाम म्हणलं; कारण मुलांना करायचं असतं वेगळंच आणि पालकांच्या हस्तक्षेपामुळे मुलं करतात वेगळंच. याचा परिणाम मुलांवर होताना बऱ्याचदा दिसतो.
आता शंतनूचंच उदाहरण घ्या ना. त्याला ज्या क्षेत्रात करिअर करायचं होतं ते घरच्यांना मान्यच नव्हतं. त्याने इंजिनिअर व्हायला पाहिजे हाच त्यांचा अट्टहास होता. म्हणून नाईलाजाने का होईना किंवा बंडखोरी म्हणून का होईना त्याने इंजिनिअरिंगचा अभ्यासच केला नाही आणि आयुष्यातली 2-3 वर्षे वाया घालवली. आपल्या मनाप्रमाणे करता आलं नाही की मग मुलं अशी काहीतरी विचित्र वागतात.
पालक मित्रहो, मागच्याच लेखात म्हणाल्याप्रमाणे मुलांचे आपण मार्गदर्शक आहोत. हुकूमशहा नाही. ते आपला प्रत्येक हुकूम पाळणार नाहीत. कारण ते स्वतः एक स्वतंत्र व्यक्ती आहेत, त्याचं स्वतःचं असं व्यक्तिमत्त्व, विचार, इच्छा आहेत. त्या पूर्ण करण्याचा त्यांना निश्चितच अधिकार आहे.
हा! त्यासाठी म्हणजे त्यांचे इच्छा, विचार, स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्यात येणाऱ्या धोक्यांसाठी फायद्यांसाठी तुम्ही त्यांना नक्कीच मदत केली पाहिजे. म्हणजे त्यांची स्वप्नं आणि त्यांच्या क्षमता व मर्यादा यांचा त्यांचा त्यांनाच अंदाज येईल आणि मग ते खुलतील, बहरतील “त्यांना अजून काय समजतंय लहानेत ती,’ असा विचार न करता त्यांच्याही विचारांना, इच्छांना मान दिला गेला पाहिजे.
आपण आपल्याच इच्छा त्यांच्यावर लादत गेलो की मुलांना त्याचा तणाव जाणवायला लागतो. ते सतत त्याच दडपणाखाली वावरायला लागतात आणि मग या सगळ्याचा कळत नकळत त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर परिणाम व्हायला लागतो. मग आपली मुलं बुजतात तरी; नाहीतर बंडखोरी करायला शिकतात तरी आणि आपण म्हणतो “आम्ही एवढं केलं याच्यासाठी, इतके कष्ट घेतले, प्रसंगी मन मारून जगलो पण याला त्याचं काहीच नाही. हा आपला मनाला येईल तेच करतो. आमच्याबद्दल याला काही वाटतच नाही.’
पण पालकहो, जेव्हा तुम्ही मुलांच्या मनाचा विचार कराल तेव्हाच ते तुमच्या मनाचा विचार करतील ना! तुम्ही केलेले कष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचतील ना! यासाठीच प्रथम माझं मूल म्हणजे माझ्यापेक्षा एक वेगळं नवं व्यक्तिमत्त्व आहे हे आपण मान्य केले पाहिजे. पालक म्हणून तुम्ही जेव्हा हे मान्य कराल तेव्हा तुम्ही त्यांचे त्यांच्या दृष्टिकोनातून पाहू शकाल आणि त्यांना मदत, मार्गदर्शन करू शकाल. आपली मतं त्यांच्यावर न लादता त्यांच्या मतांचा आदर करू शकाल.
“किती सोपं आहे ना हे तुम्हाला बोलणं,’ असं तुम्ही म्हणाल. हे सोपं नाही. पण शक्यही नक्कीच नाही. हे जर तुम्हाला जमलं तर तुमचं आणि तुमच्या मुलांचं आयुष्य नक्कीच सुखासमाधानाचं जाईल. कारण आपण पैसा छापणारं मशीन न बनवता आपल्या मुलाला बहरू दिलं, खुलू दिलं याचं समादान तुम्हाला मिळेल आणि मुलांनाही आपण आपलं स्वप्न साध्य केल्याचा आनंद मिळेल. मग त्यांच्या वाटेत कितीही अडचणी आल्या तरी ते कणखरफणे त्याला सामोरे जातील आणि त्यात यश मिळवतीलच. याची खात्री बाळगा.
– मानसी तांबे-चांदोरीकर