हॅलो मित्र – मैत्रिणींनो कसे आहात सगळे? आनंदात ना? तुम्ही म्हणाल हे असं काय विचारताय? पण मुद्दामुनच विचारलं. कारण आज आपण या आनंदावरच बोलणार आहोत. हा आनंद प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपल्या मनावर कसा परिणाम करतो हेच पाहणार आहोत. विशेषतः मुलांच्या वर्तनावर याचा काय, कसा आणि किती खोलवर परिणाम करतो हे पाहणार आहोत.
तुम्हाला आठवत असेल तर मागील आठवड्यात आपण बक्षीस व शिक्षा या तंत्राचा मेळ कसा सांभाळायचा हे पाहात होतो. त्यापैकी शिक्षा या विषयावर आपण अगदी सविस्तर चर्चा केली. आता थोडं बक्षिसांबद्दल बोलुया. “बक्षीस’ शब्द ऐकला तरी उत्साह, आनंद, कुतूहल सगळं सगळं जागृत होतं ना? आणि त्यातून बक्षीस जर स्वतःलाच मिळालं असेल तर अंगावर मूठभर मांसच चढतं, छाती अभिमानाने फुलते, जग ठेंगणं वाटायला लागतं. म्हणूनच म्हणलं तसं बक्षिस प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. लहान मुलांना चुकीच्या तीव्रतेनुसारच जसी शिक्षा मिळायला हवी. तसंच चांगल्या गोष्टीच्या, वर्तनाच्या तुलनेत त्यांना बक्षिस देखील मिळायला हवे.
मानसशास्त्र असे सांगते की आपल्या कोणत्याही कृतीला समोरून जो प्रतिसाद मिळतो त्यानुसार आपण घडत जातो. आपलं व्यक्तिमत्त्व घडत जाते. उदाहरण बघू. एखाद्या 3-4 वर्षांच्या मुलांनी घरातल्या एखाद्या मोठ्या/वडीलधाऱ्या माणसाला काही कारणाने मारलं किंवा तो त्यांच्याशी किंचाळून किंवा उलट बोलला तर घरातले इतर सदस्य त्या मुलाला मारतात किंवा रागावतात. तो मुलगा ज्या ज्या वेळी ही कृती करतो तेव्हा तेव्हा इतरांकडून मिळणारी प्रतिक्रिया तीच असते. असे वारंवार घडले आणि या वर्तनाला सतत नकारात्मकच प्रतिक्रिया मिळाली की, हे वर्तन “अमान्य’ आहे हे त्या मुलाला लक्षात येते. आणि मुलं ते वर्तन हळूहळू कमी करत नेते व ते वर्तन थांबवते. “चुकीचे वर्तन बरोबर शिक्षा’ हे असोसिएशनफ त्याच्या मेंदूत पक्के होते.
अगदी याचप्रमाणे तेच मुलं एखादी चांगली गोष्ट करते, चांगले वर्तन करते तेव्हा जर त्याला लगेच त्याचे बक्षीस मिळाले तर हे वर्तन “सर्वमान्य’ वर्तन आहे हे असोसिएशन देखील त्याच्या मेंदूत पक्के बसते आणि तसेच चांगले वर्तन अधिकाधिक करण्याचा ते प्रयत्न करते. आता तुम्हाला असं वाटेल की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी मुलाला बक्षीस द्यायला लागलो तर ते मुल फक्त बक्षिसासाठीच चागलं वागेल की पण मित्र-मैत्रिणींनो बक्षिस म्हणजे काहीतरी गिफ्ट असा संकुचीत अर्थ इथे अपेक्षित नाही. तर बक्षिस म्हणजे तुम्ही त्याचं केलेलं कौतुक, त्याच्या पाठीवर शाब्बासकीची एखादी दिलेली थाप, त्याला कौतुकाने मारलेली मिठी, त्याच्यासाठी त्याच्या आवडीचा केलेला एखादा पदार्थ, त्याच्या आवडत्या ठिकाणी नेऊन किंवा आवडत्या मित्र-मैत्रिणींकडे खेळायला सोडून त्याचे केलेले कौतुक ही सारी सारी त्याच्यासाठी बक्षिसंच असताच.
तुमच्या कौतुकाचे शब्द हे तर मुलांसाठी असलेलं सगळ्यात मोठं बक्षिस असतं. त्यांच्या चांगल्या वागण्याची तुमच्याकडून नोंद घेतली गेली याची ही पोचपावती त्यांना मिळते आणि मग मुलं अधिकाधिक चांगलं वागण्याचा प्रयत्न करायला लागतात. पण अर्थातच शिक्षा जशी आपम न चुकता प्रत्येकवेळी देतो तसेच हे बक्षिसही प्रत्येक वेळी न चुकता दिले गेले पाहिजे हं! नाहीतर शिक्षा 10 आणि बक्षिस 2 असं होऊन नाही चालणार.
सध्याच्या या स्पर्धेच्या युगात प्रत्येक वयात मुलांनाही अनेक छोट्या-मोठ्या ताणांना सतत सामोरं जावं लागतं हे तर सर्वांनाच मान्य आहे. या तणावात या स्पर्धेत तुमचं हे बक्षिस त्यांच्या प्रत्येक वयातील मानसिक विकासावर परिणाम करत असतं ही बक्षिसंच त्यांना स्पर्धेत टिकून रहायचं. स्वतःला घडवायचं बळ देत असतात त्यांचा “स्व’ सकारात्मक असा विकसित होत असतो.
आमच्या काळात ना एखाद्या स्पर्धेत बक्षीस म्हणून सर्टिफिकेट किंवा 11/21 रु. असे पैसे मिळायचे. केवढा अभिमान वाटायचा त्या छोट्याशा किमतीचा पण. त्या बळावर लगेच उत्साहाने पुढच्या स्पर्धेला नाव द्यायला जायचं.
खरंच पालक मित्रहो आपलं कुठे चुकतं माहीत आहे का? मुलाच्या चुकांवर आपण लगेच आणि सतत टीका करतो, त्यांना शिक्षा देतो. पम त्यांच्या या छोट्या छोट्या का असेना पण चांगल्या वर्तनावर आपण कधीच भाष्य करत नाही.
“त्यात काय एवढं? हे तर त्याने/तिने केलंच पाहिजे.’ असं बोलून त्यांच्या या वर्तनाची नोंदच घेत नाही. त्यांना सकारात्मक प्रतिसादच देत नाही. मग “चांगले वर्तन बरोबर बक्षीस’ हे “असोसिएशन’ कसे निर्माण होणार आणि मुलं कशी चांगली वागणार? म्हणूनच आजपासून मुलांना चांगल्या-वाईट दोन्ही प्रतिक्रिया समान पातळीवर देण्याचा प्रयत्न करा आणि मुलातले बदल हळूहळू अनुभवा. म्हणजे तुम्हीही आनंदी आणि मुलेही.
– मानसी तांबे/ चंदोकरीकर