आपण आपल्या त्वचेची काळजी खूप करतो. पण काही वेळा हाताच्या कोपरावर, मांडीवर, मानेवर किंवा शरीराच्या कुठल्याही भागावर जोरात मार बसल्यावर त्वचा जशी काळीनिळी पडते, तसे डाग दिसतात. हे डाग नेमके कशामुळे पडतात आणि त्यावर उपाय काय याबद्दल…..
काही वेळा हातपाय धुताना, कपडे बदलताना हातावर, पोटावर, पायावर किंवा मानेवर मुका मार बसल्यासारखे काळेनिळे डाग पडल्याचे आपल्याला दिसते. आपण विचार करू लागतो, आपण कुठेही धडपडलेलो नाही, कुणालाही धडकलेलो नाही की मारामारी केलेली नाही, मग हे काळेनिळे डाग कुठून आले. लागले असेल काहीतरी असे मनाला समजावत आपण त्या डागांकडे दुर्लक्ष करतो. एकदोन दिवसांत ते डाग नाहीसेही होतात. मग तो विषयच आपण विसरून जातो. काही दिवसांनी पुन्हा शरीराच्या एखाद्या भागावर असा काळानिळा डाग पडलेला दिसतो. हे असे वारंवार होऊ लागल्यावर मात्र आपल्याला काळजी वाटू लागते. हे डाग पडण्यामागची कारणे काय असतात आणि त्यावर उपाय काय असतो?
1. वय वाढणे
तुमचे जसे वय वाढते, म्हणजे तुम्ही वृद्धत्वाकडे झुकता तेव्हा तुमची त्वचा पातळ आणि नाजूक बनते. त्यावरील चरबीचा संरक्षक थर नाहीसा होतो. हा थर एखाद्या कुशनप्रमाणे त्वचेचे संरक्षण करत असतो. तुम्ही जेव्हा कशावर तरी आदळता तेव्हा हे संरक्षक कवच नसल्याने त्वचेवर काळेनिळे डाग पडतात. वय वाढेल तशा रक्तवाहिन्याही नाजूक बनतात आणि त्यामुळे हे डाग पडतात.
2. औषधे
तुम्ही रक्त पातळ होण्याची औषधे घेत असाल किंवा ऍस्पिरीन घेत असाल तर असे काळेनिळे डाग पडणे अगदी सामान्य असते. फिश ऑईलसारख्या काही सप्लीमेंटमुळेही असे डाग पडतात.
इतकेच नाही तर काही स्टिरॉईड्समुळेही त्वचेवर काळेनिळे डाग पडतात. अशा वेळी औषधे बंद करू नका, पण डॉक्टरांना भेटून या समस्येबद्दल त्यांना सांगा.
3. “क’ जीवनसत्त्वाची कमतरता
तसे बघितले तर “क’ जीवनसत्त्वाची कमतरता शरीराला भासत नाही. पण व्यक्ती जर वृद्ध असेल किंवा धूम्रपान करत असेल तर या जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी होते. बरे होण्यासाठी “क’ जीवनसत्वाची आवश्यकता असते आणि त्याचेच प्रमाण कमी असेल तर तुमच्या त्वचेवर काळेनिळे डाग पडण्याचा संभव अधिक असतो.
4. सूर्याची उष्णता
तुम्ही उन्हात जास्त फिरत असाल तर असे डाग सहजपणे पडू शकतात. हे घडते कारण सूर्याच्या उष्णतेमुळे तुमची त्वचा आणि त्याखालील रक्तवाहिन्या दुबळ्या होतात. हे डाग बरे होण्यास वेळ लागतो, ते लवकर बरे होत नाही आणि स्पर्श केल्यावर ते खडबडीत लागतात. असे डाग अनेकदा आपल्या हातांच्या मागच्या बाजूला आणि ढोपरांवर पडलेले दिसतात.
5. रक्ताचे विकार
रक्ताच्या काही विकारात रक्त साकळत नाही. हेमोफिलिया हा असा विकार आहे. यात रक्त साकळण्याची क्रियाच होत नाही. म्हणजे छोटी जखम झाली तरी रक्त वाहत राहते. असे विकार दुर्मिळ आहेत, पण योग्य वेळी उपचार केले नाहीत तर जीवावरही बेतू शकते. रक्ताचे विकार असतील तर केवळ त्वचेवर काळेनिळे डागच पडतात असे नाही तर नाकातून रक्त येणे, हिरड्यांतून रक्त येणे किंवा साधे खरचटले तरी भळाभळा रक्त वाहणे अशा समस्याही उद्भवतात.
6. महिलांमध्ये प्रमाण जास्त
एरवी स्त्री-पुरुष भेदभाव करणे अयोग्य असले तरी इथे हा भेदभाव आहे. त्वचेवर काळेनिळे डाग पडण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असते. याचे सरळ कारण एकच आहे ते म्हणजे स्त्रियांच्या तुलनेत पुरूषांची त्वचा अधिक जाड असते आणि त्यांच्यात कोलेजनचे प्रमाणही जास्त असते, जे रक्तवाहिन्यांना घट्ट धरून ठेवते.
7. अतिव्यायाम
काही लोकांना फीट राहण्याचे व्यसन असतात. जिममध्ये किंवा घरात तासन्तास व्यायाम करण्यात घालवले की आपण तंदुरुस्त राहतो, ही समजूत चुकीची आहे. व्यायामाचाही अतिरेक झाला तर त्याचेही दुष्परिणाम होतात. खूप प्रयत्नांनी स्नायूंना ताण देण्याने म्हणजे स्ट्रेचिंग करण्याने त्वचा काळीनिळी पडते. हे घडते कारण स्नायूंना अशा प्रकारे जबरदस्तीने ताण देण्याने रक्तवाहिन्या किंचित फाटतात आणि त्यामुळे त्वचेवर काळेनिळे डाग पडतात.
8. अतिमद्यपान
अतिमद्यपान केल्यावर व्यक्ती सारखी कुठे पडते असे नाही. पण अतिमद्यपान करणारी व्यक्तीच्या त्वचेला काही मार लागल्यास ती काळीनिळी पडण्याचा संभव जास्त असतो. यातून तुमचे यकृत बिघडले असल्याचाही संकेत मिळतो. यकृतात रक्त साकळण्यास मदत करणारे प्रोटीन तयार होते. मद्यपानाचा सर्वात मोठा दुष्परिणाम यकृतावर होतो आणि यकृतच जर नीट काम करत नसेल तर ते प्रोटीन तयार होत नाही आणि तुमची त्वचा काळीनिळी होण्याचा धोका वाढतो.
टाळायचे कसे?
* व्यायाम करताना संरक्षक गियर घालायला विसरू नका
* पौष्टिक आणि समतोल आहार घ्या.
* डॉक्टरांकडे कधी जायचे?
* तुम्हाला इजा झाल्यावर त्वचेवर काळेनिळे डाग पडलेले असतील आणि त्याबरोबर वेदना आणि सूजही असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जा.
* जर हे काळेनिळे डाग दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस काहीही बदल न होता राहिले तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
* या काळ्यानिळ्या डागांबरोबर ताप, थंडी, वजन कमी होणे आणि त्यावर रक्ताचे बारीक डाग दिसले तरच डॉक्टरांकडे जा.
* कोणतेही कारण नसताना त्वचेवर काळेनिळे डाग वारंवार पडत असतील तर डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
अनेक वेळा कोणत्याही कारणाशिवाय त्वचेवर काळेनिळे डाग पडले तर ते चिंताजनक नसते. ते येतात तसे जातातही. पण त्या डागांबरोबर इतर काही समस्या असेल आणि ते बर्फाने किंवा आठवडाभरानेही ते गेले नाहीत तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
डॉ. संजय गायकवाड