[[{“value”:”
Prasad Recipes: गणेश चतुर्थी म्हटलं की घराघरात गणपती बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू होते. घराची सजावट, पूजा, आरती आणि त्यासोबत बाप्पाला नैवेद्य काय दाखवायचा, याचीही तयारी केली जाते. गणपती बाप्पाला मोदक प्रिय असल्याचं मानलं जातं. त्यामुळे गणेशोत्सवात मोदक हमखास केले जातात. मात्र दरवर्षी मोदक करण्याऐवजी यंदा काही वेगळे आणि सोपे प्रसादही करून पाहता येतील.
विशेष म्हणजे यासाठी फार महाग साहित्य किंवा जास्त वेळ लागत नाही. घरात सहज उपलब्ध असणारे रवा, बेसन, नारळ, गूळ, मखाना, खजूर आणि ड्रायफ्रूट्स यांचा वापर करून स्वादिष्ट प्रसाद तयार करता येतो. हे पदार्थ बनवायलाही सोपे आहेत आणि कुटुंबातील प्रत्येकालाच आवडतील. चला तर मग जाणून घेऊया असे ७ सोपे प्रसाद…
१. रव्याचा शिरा
गणपतीच्या नैवेद्यासाठी रव्याचा शिरा हा अगदी सोपा आणि पारंपरिक पर्याय आहे. कढईत तूप गरम करून त्यात रवा चांगला भाजून घ्यावा. रव्याला छान सुगंध आला की त्यात पाणी आणि साखर घालावी. मिश्रण नीट शिजल्यानंतर त्यात वेलची पूड आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालावेत. काही मिनिटांत गरमागरम शिरा तयार होतो.
२. नारळाचे लाडू
नारळाचे लाडूही कमी वेळात तयार होतात. किसलेल्या नारळात कंडेन्स्ड मिल्क घालून मंद आचेवर हे मिश्रण थोडं शिजवून घ्यावं. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे छोटे लाडू वळावेत. वरून सुक्या नारळाचा किस लावला तर लाडू आणखी छान दिसतात.
३. बेसनाचे लाडू
बेसनाचे लाडू हा प्रसादासाठी नेहमीच आवडीचा पर्याय आहे. कढईत तूप घेऊन त्यात बेसन मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यावं. बेसनाचा रंग बदलून सुगंध येऊ लागला की गॅस बंद करावा. मिश्रण थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर किंवा बुरा आणि वेलची पूड मिसळावी. त्यानंतर छोटे लाडू वळून घ्यावेत.
४. गूळ आणि मखान्याची खीर
मखाना आणि दूध वापरून अतिशय चविष्ट खीर बनवता येते. सुरुवातीला तुपात मखाने हलके भाजून घ्यावेत. त्यानंतर ते दुधात घालून चांगले शिजवावे. खीर घट्ट झाली की गॅस बंद करून त्यात चवीनुसार गूळ घालावा. वरून ड्रायफ्रूट्स घातल्यास खीर आणखी स्वादिष्ट लागते.
५. झटपट पंजीरी
वेळ कमी असेल तर पंजीरी हा उत्तम पर्याय आहे. तुपात गव्हाचं पीठ चांगलं भाजून घ्यावं. त्यात मखाने, ड्रायफ्रूट्स आणि साखर किंवा बुरा मिसळावा. चव वाढवण्यासाठी वेलची पूडही घालता येते. हा कोरडा प्रसाद पटकन तयार होतो आणि नैवेद्यासाठीही योग्य आहे.
६. खजूर आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू
साखर न वापरता काहीतरी गोड बनवायचं असेल तर खजूर आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू करून पाहा. खजुराच्या बिया काढून ते मिक्सरमध्ये बारीक करावेत. त्यात बदाम, काजू किंवा आवडीनुसार इतर मेवे मिसळावेत. मिश्रण एकत्र करून त्याचे छोटे लाडू वळावेत.
७. मोतीचूरचे लाडू
गणपती बाप्पाला मोदकांसोबत लाडूही प्रिय असल्याचं मानलं जातं. त्यामुळे नैवेद्यासाठी मोतीचूरचे लाडूही करता येतील. बुंदी तयार करून ती साखरेच्या पाकात मिसळावी आणि त्याचे लाडू वळावेत. मोतीचूरचे लाडू दिसायला आकर्षक आणि खायलाही चविष्ट लागतात.
गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी पदार्थ करताना नेहमीच खूप वेळ आणि मेहनत घ्यावी लागते असं नाही. घरात उपलब्ध असलेल्या साध्या साहित्यापासूनही प्रेमाने स्वादिष्ट प्रसाद तयार करता येतो. यंदाच्या गणेश चतुर्थीला मोदकांसोबत या पदार्थांपैकी एखादा प्रसाद नक्की करून पाहा आणि बाप्पाला प्रेमाने नैवेद्य दाखवा.
“}]]
