स्मरणशक्ती वाढते आणि आरोग्यही सुधारते
Power Nap : दुपारच्या जेवणानंतर झोपण्याच्या प्रक्रियेला वामकुक्षी असे म्हटले जाते आणि या प्रक्रियेवरून अनेक प्रकारचे विनोदही केले जातात. पण आता अमेरिकेत झालेल्या एका संशोधनाप्रमाणे रोज दुपारच्या कालावधीमध्ये जर 15 ते 45 मिनिटांची वामकुक्षी घेतली तर ती आरोग्याला फायदेशीर असते. त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि आरोग्यालाही चालना मिळते.
सर्वसाधारण कोणत्याही प्रौढ व्यक्तीला रात्री 7 ते 8 तासांची झोप घेणे चांगले असते पण विविध कारणामुळे ही जर झोप मिळाली नाही तर त्याचे आरोग्यावर अनिष्ट परिणाम होऊ शकतात. रात्री न मिळालेली झोप दिवसा घेण्याकडे अनेकांचा कल असतो. पण या झोपेचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे असे या संशोधकांचे म्हणणे आहे.
दिवसाच्या कालावधीमध्ये जास्त काळ झोपलात तर तुमच्या आरोग्यात काहीतरी गडबड आहे असे सिद्ध होते त्यामुळे तुम्ही जाणीवपूर्वक 15 ते 45 मिनिटांची वामकुक्षी घेणेच महत्त्वाचे आहे. ज्याला इंग्रजी भाषेत पॉवर नॅप असेही म्हटले जाते. ॲरिझोना युनिव्हर्सिटीतील स्लिप अँड हेल्थ डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे संचालक मायकल ग्रॅडनर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जर दिवसा तुम्हाला झोप अनावर होत असेल तर ते चुकीचे आहे पण तुम्हाला झोप आली नसताना तुम्ही 15 ते 45 मिनिटे डोळे बंदकडून करून पडून राहणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
अनेकांना रात्री व्यवस्थित झोप न झाल्यामुळे दिवसा त्यांना झोपण्याची सवय लागते ते चांगले नाही पण जाणीवपूर्वक पॉवर नॅप घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दुपारची वामकुक्षी घेतल्यानंतर व्यक्तीला फ्रेश वाटले पाहिजे आणि कंटाळा निघून जायला पाहिजे तरच ही प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण झाल्याचे सिद्ध होऊ शकते असेही तज्ञांचे म्हणणे आहे. दुपारी जर प्रमाणाबाहेर झोप घेतली तर मात्र त्याचे शरीरावर अनिष्ट परिणाम होऊ शकतात असा इशाराही तज्ञांनी दिला आहे.
The post Power Nap : दररोज 15 ते 45 मिनिटांची वामकुक्षी घेतल्याने ‘हे’ होतात फायदे appeared first on Dainik Prabhat.