अश्विनी महामुनी
माझा भाऊ नेहमी पॉवर बॅंक जवळ ठेवतो. पॉवर बॅंक म्हणजे मोबाईल चार्जिंग करण्याचे एक पोर्टेबल उपकरण, हे मला त्याच्याकडूनच समजले. मोबाईलचा-नेटचा वापरच इतका वाढला आहे, की बॅटरी कधी डाऊन होईल हे काही सांगता येत नाही. मग कोठे जातायेता, प्रवासात काय करणार? अशा वेळी चार्जर तर निरुपयोगी. येथे उपयोगी पडते पॉवर बॅंक. आजकाल मोबाईल वापरणारांची संख्या प्रचंड झालेली आहे. आणि रात्रंदिवस त्यावर काही ना काही काम चालू असतेच.
आता वर्ल्ड कप क्रिकेट मॅचेस चालू आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या हातातील मोबाईल आणि कानाचा ईयरफोन दूर होणे कठीण आहे. आणि गेम्स-सिनेमा ही तर रोजचीच करमणूक. त्यात मोबाईलची बॅटरी पटकन डाऊन होते. ती सतत रिचार्ज करावीच लागते. त्यासाठी पॉवर बॅंक सतत जवळ ठेवणे आलेच.
जशी मोबाईलची बॅटरी अतिवापराने डिस्चार्ज होते. तसे आपले शरीरही आणि मनही अति कामाने, अतिविचाराने, चिंतेने थकते. प्रत्येकजण आज पुढे जाण्यासाठी उर फुटेस्तोवर धावत आहे. “थांबला तो संपला’ ही म्हण आजच्या जगात अगदी तंतोतंत लागू पडतेय. आज धावण्याची व्याख्या बदलली आहे. आता सारे आयुष्य-आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एक शर्यत झाली आहे. सगळ्या बाजूने लढाई करताना आपलीच दमछाक होत असते. अशा वेळी इतर सर्व गोष्टींबरोबरच नितांत गरज असते ती पाठीवर फिरणाऱ्या मायेच्या हाताची, जिव्हाळ्याच्या दोन शब्दांची. पण नेमके तेच दुर्मीळ झाले आहे. दमछाक झाल्यावर आपली काळजी घेणारं “आपलं माणूस’ आज आपण हरवून बसलो आहोत.
माणूस माणसाला पारखा झाला आहे. जिंकल्यावर झालेला आनंद आणि हरल्यावर वाटणारं दु:खं, दोन्ही ज्याच्याकडे मोकळं करावं असं माणूस आज राहिलेलं नाही. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया ह्या सगळ्यात आपण अलगद अडकलो गेलो आहोत. आवडो/न आवडो, त्यांचा स्वीकार केलाच पाहिजे. त्यातून सुटका नाही. वाढलेली स्पर्धा, बदललेले नात्यांचे संदर्भ, मोबाईल-इंटरनेट-सोशल मीडिया ह्यावरून होणाऱ्या गोष्टींचा भडीमार यामुळे नाही म्हटले तरी थकवा येतो, जीव उबतो.
आणि ह्या सगळ्यात आपण आपल्या माणसांच्या रूपाने धीर देणारे, प्रोत्साहन देणारे, ऊर्जा देणारे चार्जिंग पॉइंट-पॉवर बॅंक्स गमावून बसलो आहोत. एके काळी प्रचंड मोठी कुटुंबं आणि तितकेच विविध चार्जिंग पॉइंट असायचे. काका, मामा, दादा, ताई असे सारे चार्जिंग पॉइंट आपल्या घरात असायचे. त्यांची कमी भासली तर जोडीला आपले मित्रमैत्रीण असायचे. पण काळाच्या स्पर्धेत आपण हे सगळेच मागे सोडून बसलो आहोत. एकेकाळी घरात भांडण झाल्यावर, चल सोड. जाऊ दे रे! असं म्हणत खांद्यावर हात टाकून बोलणारा मित्र किंवा हातात हात घेऊन, समजू शकते! असं बोलणारी मैत्रीण हरवून गेली आहे. अडचणीच्या वेळेस स्वत:हून धावून येणाऱ्या काका, मामा, दादांना आपण गेल्या कित्येक वर्षात भेटलो नाही.
दादा,ताई आज फक्त आभासी जगातून आपल्या भिंतीवर डोकावतात आणि तिकडूनच अदृश्य होतात. आज वाढलेल्या स्पर्धेत आपल्याला पुन्हा ऊर्जा देणारे हे चार्जिंग पॉइंट वाढायला हवे होते. पण आपण नकळत त्यांनाच मागे सोडून आल्याचे परिणाम आज दिसत आहेत. मनाचा होणारा कोंडमारा होत आहे. आभासी जगातून मिळालेल्या यांत्रिक, भावनाहीन कमेंट आणि लाईक्सवरून आज आपण आपल्या जीवनाचं मूल्यमापन करत आहोत. आज आपल्याला अशा चार्जिंग पॉइंटसची-पॉवर बॅंकांची खूप गरज आहे.
ऊर्जा मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी आधाराची गरज असते असं काही नाही. कोणीतरी ऐकून घेणारे, कोणाकडे मन मोकळं करावसं वाटणारे आणि ते केल्यावर मनाला उभारी देणारे चार्जिंग पॉइंट आज आवश्यक आहेत. अशा पॉवर बॅंकांची गरज प्रत्येकाला आहे. आपल्या घरापासून ते आपल्या कार्याच्या क्षेत्रात, अगदी आवडीच्या क्षेत्रात सगळीकडे असायला हवेत. हे जर आपल्यासोबत असतील तर ह्या स्पर्धेच्या युगात आपण कधीच मागे पडणार नाही. पडलो तरी पुन्हा राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभारी घेऊ. आणि त्यासाठी ऊर्जा देणारा चार्जिंग पॉइंट-पॉवर बॅंक बनायचं काम आपल्यापासूनच सुरू केलं पाहिजे.