खुरसनि
खुरसनि (इंडियन हैनबेन)
हायोसायामस नायगर
कुल : सोल्यानेसी
भारतीय नावे :
मराठी – खुरसनि ओवा
हिंदी – खुरसिन आजावइन
बंगाली, गुजराती – खुरसानी, अजवायन
संस्कृत – पारसीकय, मदकारिणी
हे झाड सर्वसाधरणपणे पश्चिम हिमालयात 1500 ते 3000 मीटर उंचीवर काश्मीरपासून ते गढवालपर्यंत, वस्तीजवळ आणि ओसाड जागी सापडते. भारताच्या अनेक भागांत उदा. काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि निलगिरी पर्वतात ते लावले जाते.
दुर्गंधीयुक्त, वार्षिक किंवा द्विवार्षिक औषधी, दाट ग्रंथी रोमांनी आच्छादलेली; खोड 1 मीटरपर्यंत उंच, खालची पाने 15-20 से.मी., कडा दातेरी; वरची पाने लहान व अनेक भागात विभागलेली; फुले 2-3 से.मी. परिघाची, फिकट हिरवी आणि जांभळ्या रेघोट्यांनीयुक्त, काही एक-एक फांद्यांच्या जागेवरून खोडावर लागणारी, इतर लांब अग्राच्या कणिसात; फळ 1.3 से.मी. परिघाची गोल.
उपयुक्तता : वाळवलेली पाने आणि फुले आल्यावर फुलांचे शेंडे जमा करण्यात येतात यास “हायोसायामस’ किंवा खुरसनि ओवा म्हणतात.
या औषधात बेलाडोनासारखेच (अट्रोपा बेलाडोना) औषधी गुणधर्म आहेत. स्नायूंच्या वेदनांवर, हिस्टेरियासारख्या मज्जा संस्थेच्या त्रासात आणि कफ वगैरेत ते गुणकारी आहे. डोळ्यांचे बुबुळ याने विस्तार पावते. म्हणून नेत्र विकारांवर खुरसनी उपयुक्त आहे. स्नायू दुखत असतील तर खुरसनी पोटात घ्यावी तसेच कफ विकार नाहीसे होतात.
या झाडाच्या बियांमध्येसुद्धा औषधी गुणधर्म आहेत. सामान्यत: त्या त्रासाच्या जागी चिकटवण्यात किंवा लावण्यात येतात.
हे झाड हिमालयात काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशात लावले जाते.
इतर जाती
हायोसायामस म्यूटिकस हे काश्मीर आदी ठिकाणी लावले जाते. या जातीत ऍल्कलॉईडचे प्रमाण इंडियन हेनबेनपेक्षा जास्त आहे; त्यात जास्त तीव्र गुंगी आणणारा गुणधर्म आहे. इजिप्शियन हेनबेनची पाने कैफ येण्यासाठी ओढली जातात, पण तरीही उपयुक्त वनऔषधी आहे ओवा.
देवनाल
लोबेलिया निकोशियानिफोलिया
कुल : लोबेलिअेसीई
भारतीय नावे :
मराठी – देवनाल
हिंदी – नरसल
बंगाली – बनत माकू
गुजराती – नाली
कानडी – काडूहोगेसोप्पेल
तमिळ, मल्याळी – काट्टूपुकैला
संस्कृत – बिभीषण, देवनाल
तेलुगू – अदारिपोगकू
हे झाड भारताच्या दक्षिणेकडील द्वीपकल्पी डोंगराळ भागात व त्या लगतच्या सपाट मैदानी भागात सापडते. खोड मजबूत, पोकळ, 3-5 मीटर उंच, अधून-मधून वरच्या भागात शाखीय; पाने फार मोठी, खोडाच्या खालची पाने 45 से.मी. पर्यंत लांब, वर लहान, कडा साध्या, व्यतिरिक्त; पानांची मुख्य शिर पांढुरकी; फुले मोठी पांढरी, अग्रास फार मोठ्या गुच्छांमध्ये; फळ 8 मि.मी., गोलाकार बिया पुष्कळ, लहान पिवळसर-तपकिरी.
उपयुक्तता : ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात या झाडाचे जमिनीवरील सर्व भाग जमा करण्यात येतात आणि सावलीत वाळवले जातात. हेच या झाडाचे औषध आहे.
या औषधाचे गुणधर्म जवळपास “निकोटिन’ या औषधासारखेच आहेत. ते फुप्फुसांच्या नळ्यांना येणाऱ्या सुजेवर, दम्यावर वापरले जाते. या औषधाने घाम येतो, मळमळ वाटते आणि शेवटी उलट्या होतात, यामुळे दम्यात आराम वाटतो. हे औषध जर उलट्या होऊन बाहेर पडले नाही तर काही वेळा धोकादायक असून विषारी ठरू शकते व त्यामुळे मृत्यूसुद्धा येऊ शकतो.
यातील “लोबेलिन” नावाचे ऍल्कलॉइड श्वसनात उत्तेजन देते. मादक पदार्थाच्या जास्त सेवनाने किंवा गुंगी आणणाऱ्या औषधामुळे जेव्हा श्वसन बंद पडते तेव्हा ते नियमित करण्यासाठी या औषधाचा उपयोग करण्यात येतो. देवनालचा पांढरा रस औषधी आहे. कदाचित वाळवलेल्या झाडामुळेच लांबूनसुद्धा नाक, कान आणि घशाच्या आतील त्वचेत आग होते.
लोबेलिया इनफ्लॅटा हे मूळचे अमेरिकेतील झाड भारतात लावण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. द्वीकल्पी भारत आणि आसाम हे प्रदेश या झाडाच्या लागवडीस योग्य असल्याचे सांगण्यात येते. लोबेलियापासून निघणारे “लोबलिन’ भारतात आयात करण्यात येते. तथापि, भारतीय जातींचे वर सांगितलेले लोबेलिया औषध लोबेलिया इनफ्लॅटाच्या ऐवजी वापरण्यास योग्य आहे. अशा प्रकारे देवनाल ही उपयुक्त वनऔषधी आहे.
– सुजाता गानू