कारले म्हटले की बहुतेकजणांचे तोंड वाकडे होते. दुधात घोळा, साखरेत घोळा कडू ते कडूच.. असे कारल्याचे वर्णन केले जाते, पण हे कारले कडू असले तरी त्याच्यात विशिष्ट औषधी गुण अनेक आहेत. कारल्यात एक गुण असतो तो म्हणजे तोंडाची चव गेली असली तर जिभेवरच्या सर्व चव देणाऱ्या ग्रंथीना ते खाल्ल्याने रसनाग्रंथी जाग्या करते.
खानदानी पंजाबी खाण्यात एक हमखास भाजी असतेच ती म्हणजे भरणा करेला! ही भाजी तर अनेकजणं आवडीने खातात. किंवा कारल्याची परतून भाजी, रस्सा भाजी, कारल्याचं पंचामृत आवडीने खाणारे काही कमी नाहीत.
मीठ चोळून कडू रसाचे पाणी पिळून भाजी केली म्हणजे कारल्याचा कडूपणा जाऊन खमंग भरली कारली तयार करता येतात किंवा चिंचगुळाचा कोळ घालून दाण्याचे, तिळाचे कूट, खोबरं घालून रस्साभाजी केली तर कळणारही नाही कारल्याची भाजी आहे की पंचामृत!
- आरोग्याला उपयुक्त कारले :
कारलं उष्ण आहे. त्यामुळे हिवाळ्यात अधून मधून खाण्यात ठेवले तर सर्दी खोकला, जड डोके इ. त्रास बऱ्यापैकी दूर ठेवता येतील. - पित्त वाढून डोके दुखण्याची किंवा आंबट घशाशी येण्याची सवय असेल तर त्या गृहिणींनी आवर्जून कारले खावे.
- कारले खाण्याने अतिरिक्त वाढलेले पित्त कोठ्यात येऊन संडासवाटे सहज बाहेर टाकले जाते.
- मूळव्याधीचा त्रास असणाऱ्यांसाठी हे कारले औषध बनून कामी येते. यकृत तसेच अग्न्याशयाचे काम सुधारून रक्तातील साखर आटोक्यात ठेवण्यासाठीही कारले उपयोगाचे आहे.
- जेव्हा हातापायांची “धग’ होते त्यावेळी कारल्याची पाने आगआग होत असलेल्या भागांवर लावत राहावे. हळूहळू दाह कमी होऊ लागतो.
- गुणांनी गरम असल्याने वाढीव गॅस कमी होतो. वेदना वातामुळे असतील तर त्या कमी होण्यास मदत होते.
- मातृस्तन्यामुळे बाळाला गॅसेसेचा त्रास, अपचन होत असेल तर दुधातील दोष नाहीसे करून ते सकस व हलके येण्यासाठी आईला कारले खायला द्यावे.
- पाळीच्या तक्रारीसाठी व रक्तदोषामुळे चेहऱ्यावरील उठणाऱ्या तारुण्यपीटिकांसाठी पित्त कमी करणारे, वात घालविणारे कारले तरुणींनी आनंदाने आपलेसे केले पाहिजे.
- वजन कमी करण्यासाठीही कारल्याचा रस उपयुक्त आहे; पण त्याचा डोस किती व केव्हा घ्यावा हे मात्र वैद्यांच्या सल्ल्याने ठरवावे.
मधुमेहींसाठी कारले :
मधुमेहाचे रुग्ण इन्सुलिन तयार करण्यास एक तर कमी पडतात. किंवा ते इन्सुलिनची निर्मिती करू शकत नाहीत.
कारल्यात इन्सुलिनसारखे तत्त्व असतात आणि त्यामुळे संशोधक त्याचा वनस्पती इन्सुलिन असा आवर्जून दावा करतात. रक्त आणि मूत्र यातील साखरेची पातळी कमी करण्यास कारले अतिशय गुणकारी ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मधुमेहींच्या आहारात त्याचा सढळपणे उपयोग करायला पाहिजे. कारल्याच्या बियांच्या चूर्णाचा आहारात वापर करता येतो. पाण्यात कारल्याचे तुकडे उकळून काढून किंवा कोरड्या चूर्णाच्या स्वरूपातही मधुमेही त्याचा वापर करू शकतात.
मधुमेहासाठी एक लोकप्रिय औषधी म्हणूनही आयुर्वेदात फार पूर्वीपासून कारल्याचा वापर होत आहे. कारल्याच्या नियमित वापराने अनेक गुंतागुंतीच्या आजारांना आळा बसला आहे. अति रक्तदाब, नेत्र विकार, मज्जातंतू विकार, कारल्यात पूर्णत: अत्यावश्यक अशी जीवनसत्त्वे (जीवनसत्त्व ए बी 1, बी 2, सी ) व खनिजे (कॅल्शिअम, फॉस्फरस, आयर्न, कॉपर पोटॅशिअम) आहेत.
कारल्याचे योग्य प्रमाणात सेवन केले तर कारल्यासारखा नैसर्गिक उपचार अतिशय परिणामकारक ठरू शकतो. मधुमेहाच्या अनेक आयुर्वेदिक औषधातील मिश्रणात कारले हा महत्त्वाचा घटक आहे. ज्याच्यांत बरोबर नीम, तुलसी, सुंठ, गुंगल आणि कुटकीचा वापर होतो. सिरप, चूर्ण टॅबलेटस तसेच कॅपसुल्सच्या स्वरूपात उपलब्ध असणारे फॉर्म्युलेशनस, शरीराची रोग प्रतिकार क्षमता जी मधुमेहाच्या अवस्थेत शरीरातील प्रथिने कमी झालेल्यांना त्यांचा चांगला उपयोग होतो.
कित्येक कोटी व्यक्ती भारतात मधुमेहग्रस्त आहेत.पण 12% हून कमींवर औषधोपचार होतो. तरुण वयात मधुमेह होण्याचे प्रमाणही वाढत आहे. वाईट गोष्ट अशी की मधुमेह झालेल्यांपैकी 50% लोकांना आपल्याला मधुमेह झालेला आहे याचे ज्ञान नसते आणि आजार बळावताच त्यांना त्याची कल्पना येते. उपचार न झालेल्या किंवा आजार कळून आलेला मधुमेह मोठ्या रोगांना कारणीभूत ठरू शकतो. जसे हृदयविकार, उच्चरक्तदाब, मुत्राशय विकार, अंधत्व आणि रक्त संचारण बंद झाल्यामुळे शरीरातील अवयवही कापावे लागू शकतात.
रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवून मोठ्या आजाराची गुंतागुंत टाळता येते. युनिव्हर्सल मेडिकामेन्टसचा दावा आहे की त्यांच्या मधुमेह प्रतिबंध कारनिम कॅपस्युल्स सखोल शोध तसेच वैद्यकीय चाचणी घेवून तयार करण्यात आल्या असून 14 पेक्षा अधिक देशात त्याची निर्यात होते. कारले व नीम म्हणजेच हे कारनिम त्याचे दोन मुख्य घटक आहेत. इन्सुलिनची उणीव कारले दूर करते तर नीम इन्सुलिनच्या स्रवणाच्या प्रक्रियेस चालना देते. रक्तातील ग्लुकोजच्या आणि पेशीद्वारे ग्लुकोज उपयोगात आणण्याच्या प्रमाणावर, ज्याच्यामुळे आपल्या स्नायूंना बळकटी मिळते. त्याला इन्सुलिन नियंत्रण करते.
संतुलित आहाराने आपल्या आजारावर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येते तसेच अधिक क्लेशमुक्त वाटते. ज्यांच्या कुटुंबात मधुमेह वांशिक आजारासारखा आहे त्यांना अधिकच खबरदारी घ्यायला हवी कारण त्यांना मधुमेह होण्याची शक्यता असते. अशांनी आपल्या आहारात कारल्याचा वारंवार वापर ठेवावा.
-सुजाता गानू