आम्लता जास्त झाल्याने किंवा जठराची आम्ल सहन करण्याची शक्ती कमी झाल्याने हळूहळू जठरव्रण तयार होतो. अल्सर किंवा जठरव्रण हे मध्यम वयात बऱ्याच लोकांमध्ये आढळणारे दुखणे आहे. सतत काळजी, ताण, गडबड, जेवणातील अनियमितता, तिखट, तेलकट आहार यांच्यामुळे आम्लता वाढून अल्सर होण्याची शक्यता असते. हा आजारही आता जीवाणूंमुळे (हेलिकोबॅक्टर) होतो असे सिद्ध झाले आहे.
पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त असते. जेवणानंतर तास-दोन तासांनी पोटातले दुखणे वाढत असल्यास जठराऐवजी त्यापुढच्या लहान आतडयांच्या भागात (आमाशय) आतडे व्रण असण्याची शक्यता असते. भारतात जठरव्रणापेक्षा हा प्रकार जास्त आढळतो.
रोगनिदान
पोटात जळजळ, क्वचित उलटी याबरोबर पोटात बेंबीच्या वरच्या भागात विशिष्ट ठिकाणी (मार्गदर्शक तक्ता पाहा – पोटावरील भाग क्र. 2,5) वारंवार दुखणे हे अल्सरचे निदर्शक आहे. जेवणानंतर हे दुखणे वाढते किंवा कमी होते. तसेच तेलकट, तिखट खाल्ल्याने ते वाढते असे रुग्णाच्या लक्षात आल्यावर त्याच्या जेवणात आपोआप बदल घडून येतो. व्रणातून काही वेळा अचानक रक्तस्राव चालू होतो. अशा वेळी रक्ताची किंवा लालसर रक्तमिश्रित उलटी होते.
पचनमार्गात बारीक रक्तस्राव कायम चालू राहिल्यास विष्ठेचा रंग काळसर दिसतो. क्वचित जठरव्रणाच्या जागी भोक पडून जठरातले पदार्थ, आम्ल पोटात (उदरपोकळीत) सगळीकडे पसरतात. यामुळे एकदम गंभीर परिस्थिती (उदरसूज) निर्माण होते.
दुर्बीण तपासणी – एंडोस्कोपीने जठर किंवा आमाशयात असलेला व्रण/अल्सर स्पष्ट दिसून येतो.
उपचार / आहारविषयक सल्ला : साधे हलके अन्न तीन-चार वेळांत विभागून खाणे. (थोडेथोडे अन्न, थांबूनथांबून खाणे) तेल, तिखट, जड जेवण टाळणे. रात्री उशिरा जेवण टाळणे.
अँटासिड – आम्लविरोधी गोळ्या. रॅनिटिडीन किंवा फॅमोटिडीन गोळ्यांनी व्रण भरून येण्यास खूप मदत होते. या गोळ्या एकूण दीड महिना रोज घ्याव्या लागतात. ओमेप्रॅझॉल, रेबिप्रेझॉल यांचाही उपयोग होतो.
जीवाणू- कारणावर उपाय म्हणून सात ते चौदा दिवस डॉक्सी/ मॉक्स गोळयांचा वापर केला जातो. यामुळे अल्सर बरा होऊ शकतो.
आयुर्वेद
आम्लता, जळजळ होणाऱ्या व्यक्तींना पथ्यापथ्य सांगणे फार महत्त्वाचे असते. एक सल्ला म्हणजे शिळ्या अन्नापेक्षा गरम व ताज्या अन्नात आम्लता कमी असते. म्हणून ताजे अन्न घ्यावे; शिळे अन्न घेऊ नये.
डाळीपैकी मूगडाळ ही सौम्य असून इतर डाळी (तूरडाळ, हरभराडाळ) आम्लता वाढवतात. म्हणून आहारात मूग वापरणे चांगले. मूगडाळीपेक्षा सालासह मूग अधिक चांगले.
मीठ व खारट पदार्थ (लोणचे, इ.), मिरच्या, सांडगे, पापड, आंबील, दारू, आसवारिष्टे, सॉस, टोमॅटो केचप, ताकाची कढी, तळलेले पदार्थ (वडे, भजी), अतिगोड भात, इत्यादी पदार्थ आम्लता वाढवतात, म्हणून हे पदार्थ वर्ज्य करावेत.
याउलट आवळा, डाळींब, कागदी लिंबू (आंबट असले तरी) हे पदार्थ आम्लता वाढवत नाहीत. गव्हाचे फुलके, ज्वारीची भाकरी, मुगाचे वरण, इत्यादी पदार्थ आम्लता, जळजळ कमी करतात. कोणत्या पदार्थाने आराम पडतो आणि कोणत्या पदार्थाने त्रास होतो, हे रुग्णाला स्वत:लाच हळूहळू कळते.
जठरव्रण नाही याची खात्री असल्यास (म्हणजे नुसती जळजळ, आम्लता असल्यास) वमन, विरेचन या उपायांचा चांगला फायदा होतो. यासाठी आधी ज्येष्ठमध 100 ग्रॅम (याची पुडी मिळते) भांड्यात घेऊन त्यावर 500 मि.ली. उकळते पाणी ओतून अर्धा तास तसेच ठेवावे. हे गार झालेले पाणी वमनासाठी वापरावे. वमन करण्यासाठी हे पाणी प्यायला देऊन लगोलग रुग्णास त्याच्या स्वत:च्या बोटांनी घशात स्पर्श करून उलटी करण्यास सांगावे.
औषधयोजनेत अविपत्तिकर चूर्ण दीड ग्रॅम दिवसातून दोन-तीन वेळा 20 ते 28 दिवस द्यावे. यामुळे सकाळी शौचास जास्त पातळ होत असल्यास अविपत्तिकर चूर्ण कमी करून परत 14 दिवस हाच प्रयोग करावा.
पित्तखड्याचे निदान
यकृताखाली पित्ताची एक पिशवी (पित्ताशय) असते. त्यात दाह झाल्यावर नंतर खडे तयार होतात. खड्यांमुळे पित्ताशयातून कळा येतात. या कळा उजव्या बरगडीखालून सुरू होतात. त्याबरोबर उलटी होण्याचा संभव असतो. पित्तखड्यांची वेदना फार तीव्र असते. काही पित्तखडे पोटाच्या क्ष-किरण चित्रात दिसतात. काही प्रकारचे खडे मात्र दिसत नाहीत.
मात्र, निश्चित निदानासाठी सोनोग्राफीचा उपयोग होतो. (सोनोग्राफी ही एक फोटो काढण्याची पध्दत आहे. यात ध्वनिकंपने वापरतात.) क्ष किरणाच्या मानाने ही पध्दत निरुपद्रवी आणि या कामासाठी जास्त उपयुक्त आहे.
उपचार
पित्तखड्यांची कळ अगदी तीव्र असते. त्यामुळे ताबडतोब डॉक्टरकडे पाठवून द्यावे. कळ थांबण्यासाठी मॉर्फिनचे इंजेक्शन दिले जाते. हे इंजेक्शन अफूपासून तयार करतात. हल्ली पेंटाझोसिन नावाचे एक वेदनाशामक इंजेक्शन दिले जाते, तेही अगदी परिणामकारक आहे. वारंवार त्रास असल्यास पित्तखडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून काढून टाकावे लागतात.
अन्ननलिकेपासून गुदद्वारापर्यंत पचनसंस्थेचा मार्ग नेहमी वाहता असतो. अन्नपचनाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक तेवढा वेळ अन्न या मार्गात राहते व उरलेले पुढे सरकत असते. अन्नाच्या या पुढे सरकण्यासाठी स्नायूंची विशिष्ट हालचाल व्हावी लागते. अनेक कारणांमुळे ही प्रक्रिया बंद पडू शकते. या घटनेला आपण आतडीबंद म्हणू या.
- आतड्यात जंत होऊन अडथळा येणे.
- हर्निया अडकणे, आतड्याला पीळ पडणे.
- आतडे शर्टाच्या बाहीप्रमाणे एकमेकात सरकणे.
- कर्करोगाची वाढ
- क्षयरोग किंवा इतर जंतुदोषांमुळे आतड्याचा अंतर्भाग अरुंद होत जाणे.
- पोटसूज होऊन आतड्यांची क्रिया मंदावणे.
- स्नायूंचे कामकाज थंडावणे
अशा अनेक कारणांमुळे आतड्यांमध्ये अन्न सरकण्याची क्रिया बंद पडते व आतडीबंद उद्भवतो. कधीकधी ही घटना 24 तासांत घडून येते. याउलट कर्करोग, क्षयरोगासारखे कारण असेल तर आतडीबंद होण्यास कित्येक दिवस लागतात.
एकदा पूर्ण आतडीबंद झाला, की पोट खूप दुखते. पोट फुगते व उलट्या होतात.
सुरुवातीला आतड्यांचे आवाज वाढतात, पण नंतर ते मंदावतात (हे आवाज नळीने कळते). आतडीबंद फार गंभीर घटना असते. याची शंका आल्यावर ताबडतोब रुग्णालयात पाठविणे आवश्यक असते. बहुतेक वेळा यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते.
जलोदर
यकृतातून जाणाऱ्या नीलाप्रवाहात अडथळा आल्यामुळे जलोदर होतो. सर्व आतडी, जठर, यकृत, प्लिहा, पांथरी, इत्यादींवर एक पातळ दुपदरी आवरण असते. या दुपदरी आवरणात नेहमी थोडासा द्रवपदार्थ असतो. या आवरणामुळे आतड्याची हालचाल सोपी होते. यामुळे मार, आजार यांपासून आतील अवयवांचे संरक्षण होते. जलोदर म्हणजे या दुपदरी आवरणात प्रमाणाबाहेर पाणी साठणे. या आजाराची कारणे अनेक आहेत.
हृदयाच्या निरनिराळ्या आजारात रक्ताभिसरणाची क्रिया नीट न होऊन पाणी साठणे. यकृत निबर होऊन यकृतातून जाणाऱ्या नीलांना अडथळा होऊन या आवरणात पाणी साठणे. उदरपोकळीच्या आवरणात टी.बी., कॅन्सर हे आजार होणे. तीव्र कुपोषणाचे आजार, यामुळे प्रथिनांची कमतरता. जलोदर हे गंभीर आजाराचे लक्षण असून यासाठी लवकरात लवकर तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे. आयुर्वेद
जलोदराची कारणे अनेक आहेत. यकृतसूजेनंतर येणाऱ्या जलोदराचा प्रकार आधुनिक वैद्यकाप्रमाणे साध्य (बरा होणारा) आहे.
परंतु आयुर्वेद रुग्णालयांमधून केल्या जाणाऱ्या उपायांचा चांगला उपयोग होतो हा अनुभव आहे. मीठ, पाणी जरासुध्दा न घेता केवळ पूर्णपणे दुधावर सहा महिनेपर्यंत निग्रह दाखवू शकणाऱ्या रुग्णांना चांगला उपयोग झाला आहे. आहारातील एक अट म्हणजे सर्व प्रकारच्या उसळी टाळणे. असे पथ्य पाळल्यानंतर हळूहळू पचनशक्तीप्रमाणे चतकोर भाकरी, ओवा-जिरे मिसळलेली लसणीची चटणी यांचा प्रयोग करावा. एकूण पथ्यापथ्य तीन ते नऊ महिनेपर्यंत पाळावे लागते.
या आजारात सौम्य जुलाब होत राहणे चांगले असते. यासाठी आहारातल्या डाळींवर रुईचा चीक आधीच टाकून द्यावा. यासाठी 20 ग्रॅम डाळीवर रुईचा चीक दोन-तीन थेंब टाकावा (जास्त टाकू नये नाहीतर जुलाब होतील). भाकरी-पोळीचे पीठ भिजवताना त्यामध्येही दोन थेंब रुईचा चीक मिसळावा. या जुलाबामुळे शरीरातले अनावश्यक पाणी कमी होत राहते.
आरोग्यवर्धिनी (500 मि.ग्रॅ) हे औषध यकृताचे कामकाज सुधारण्यास उपयोगी आहे. याच्या 1-2 गोळया दिवसातून 2-3 वेळा याप्रमाणे 3 ते 9 महिने द्याव्या. याबरोबरच कुमारी आसव आणि पुनर्नवारिष्ट 2-2 चमचे तेवढयाच पाण्यात मिसळून देत राहावे. सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत पुनर्नवा (खापरखुट्टी, वसू) भाजी म्हणून खेड्यांमध्ये मिळू शकते. या वनस्पतीचा 50-100 ग्रॅम या मात्रेत रोज 2 वेळा वापर केल्यास यकृतपेशींचे काम सुधारते. 3 ते 6 आठवडे हे उपचार सुरू ठेवावेत.
-डॉ. राजेंद्र माने