‘आयुष्यात ज्यांना रंगांची भाषा कळते त्यांना जगण्याचे सारे रंग कळतात,’ असे मानले जाते आणि ते खरेही आहे. त्या सगळ्या रंगांचा इंद्रधनुष्य एकदा समजून घेतला की, समाजातलेही विविध रंग कळतात; जसे दुःखाचे, सुखाचे, हसण्याचे, रडण्याचे, एकट्याचे, दुकट्याचे, मैत्रीचे इतकेच नाही तर शत्रुत्वाचे रंगही कळतात. तरीही ही रंगांची भाषा समजायला वेगळी नजर लागते, ती नजर मला सापडली स्वातीत. स्वाती म्हणजे स्वाती गोडबोले.
स्वातीच्या रम्यनगरीमधल्या छोट्याशा सदनिकेजवळ एक छोटीशी बाग आहे, मागे दत्ताचे मंदिर आहे, भिंतींवर काढलेली वारली चित्रे, बागेला छोटुशी कमान, त्याला लटकते झुंबर, बाजूला सुंदरशी घंटांची माळ, त्या बागेतही तऱ्हेतऱ्हेची झाडे! कुठून तरी फुलांचा सुवास दरवळतो, कुठूनतरी कळी डोकावते, कुठून कोवळ्या कोंबाने डोके वर काढलेले असते, तर कुठलीतरी पिकली पाने गळून मातीत मिसळत असतात. या सगळ्या निसर्गाच्या भूमिकांना ती स्वतःच्या लेकरांच्या बाललीला बघाव्या तसे ती गोंजारत असते; कारण स्वाती या रंगांच्या माध्यमातून जगते; आणि जगवते तिच्याकडे येऊन शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला.
स्वातीच्या चित्रकलेच्या वर्गात कुणीतरी तिला विचारले, “ताई, हिरवा रंग कोणता देऊ?’ तर तिने त्याला त्या बागेत नेले आणि हिरव्या पानांच्या विविध रंगातील सजीव छटा दाखवल्या. त्या अनुभुतीने तो आनंदाने नाचलाच. चित्रकलेच्या वर्गाला येणाऱ्यांनी आधी त्या निसर्गातले रंग जाणावे, अनुभवावे आणि मग भरावे, हा तिचा नित्यनियम.
ती रंग जगते, ती रेषा जगते, ती चित्र जगते आणि या पिढीच्या मनात चित्रकला रुजवतेय गेल्या 20 वर्षांपासून. स्वातीला चित्रकारच व्हायचे होते. मात्र, काही कारणास्तव तिला चित्रकलेचा अभ्यासक्रम करता आला नाही. अपुऱ्या साधन सामग्रीतही तिने कलेचा ध्यास घेतला. खराट्याच्या काडीवर स्वेटर विणायला शिकली, वहीच्या रेषांच्या कागदावरच चित्र काढायची, सायकलच्या स्पोक्स्च्या सुया करून क्रोशिया शिकली, पण अचानक रस्ता बदलला. म्हणून काही दिवस पार्लर चालवले. रंगांशी खेळायला आवडतच होते म्हणून तिने मेकअपमध्येही बरेच प्रयोग केले. बुटीक चालवले, शाळेत आर्ट टीचर म्हणूनही काम केले. यात ती रममाण होत असली तरी तिच्यातला प्रयोगशील चित्रकार मात्र अस्वस्थ होत होता.
तिला हे सगळे बंदिस्त वाटत होते शेवटी तिने मुक्तपणे उद्याचा मनातला मानस योजलाच; अर्थात या सगळ्यात तिचे शनिवार रविवारचे वर्ग कधीच थांबले नाही. ‘मला स्वत:ला उत्कृष्ट आर्ट आणि क्राफ्ट टीचर व्हायचे असेल, तर मीच यात खूप अभ्यास केला पाहिजे, संशोधन केले पाहिजे, सतत विद्यार्थी दशेत राहून शिक्षण घेतले पाहिजे,’ हा विचार तिच्या मनात भुंग्यासारखा घर करत होता आणि शेवटी वयाच्या चाळिशीत तिने आर्ट टिचरचा डिप्लोमा केला. दोन्ही वर्षी अव्वल राहीली. ती तिच्याच परीक्षेत खऱ्या अर्थाने पास झाली होती. आजही रोज नवनवे प्रयोग ती करत असते. कधी पोस्टर कलर पेंटिंग, कधी तेल खडू आर्ट, तर कधी पेन्सिल स्केच, कधी ऍक्रालीक, कॅनव्हास पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग, मधुबनी, वारली, गोंड, गोपुरा तसेच मातीकाम, भरतकाम तर कधी कागदी फुले याच जगात ती वावरत असते.
मॅक्रमसारखी सत्तरीतली कला पुन्हा नव्याने जोपासण्याचा तिचा मानस असल्याने त्याच कलेला ती नवा आयाम देण्यास निघाली आहे. एक इंचापासून ते एक फुटापर्यंतची कागदी फुले करणे यात तिचा हातखंडा आहे. त्यावर ती अशा पद्धतीने ज्या काही प्रक्रिया करते की, ते कागदी फूल हे कागदी आहे हे सांगितल्याशिवाय कुणाला कळणारच नाही. इतकी तिच्या बोटांमध्ये जादू आहे. मला तर तिची बोटेच रंगीत वाटतात.
तिच्या घरी गेल्यावर सगळे घर तिच्या कलात्मक वस्तूंनी विराजमान झालेले दिसते; तिच्या कणाकणात, क्षणाक्षणात रंग आणि चित्र सामावलेले आहे. तिच्याकडे चित्रकला शिकण्यासाठी पाच वर्षांपासून ते साठ वर्षांपर्यंतची विद्यार्थ्यांची हजेरी असते. प्रत्येकाला चित्र समजावून सांगतांना ती कधीच थकत नाही, चिडत नाही. कायम मंद आवाजात आणि प्रेमळपणे विद्यार्थ्यांना सांगणे असा स्वातीचा गुण चित्राइतकाच बघण्यासारखा असतो.
मला कायम तिच्या या गुणांचे कौतुक वाटते. “तू चिडत कशी नाहीस गं?’ यावर ती कायम हसून उत्तर देते, “आता त्यांच्यावर चिडले ना तर त्यांना या चित्रकलेचा, या रंगांचा आणि या रेषांचा राग येईल आणि कदाचित या कारणांसाठी ही कला त्यांच्या मनातून उतरून जाईल. जर या कलेचे बीज रोवायचे असेल तर ते तितक्याच प्रेमाने ते रुजले ना की चित्रकला बहरेल, या माझ्या बागेसारखी. मला ही सगळी मुले निसर्गातली झाडेच वाटतात. विना तक्रार स्वतःच्या छटा साकारणारी. त्यामुळे ही रंगांची बाग फुलवणे माझे काम आहे आणि ते स्वीकारल्यामुळे त्या बागेची मशागत करणे हा माझ्या आनंदाचा भाग आहे.’
स्वाती हाडाची “रंगकर्मी’ आहे, हे तिच्या वागण्या-बोलण्यातून जाणवतेच.
आतापर्यंत तिच्याकडे किमान 500 विद्यार्थी तरी आले असतील. तिच्याकडे मुलांना पाठवणे म्हणजे कारखान्यातून एखादी उत्कृष्ट वस्तू तयार होऊन येणे इतका बिनधास्त फील आयांना येतो. ती जितकी रंगांसाठी जीव ओतते, तितकीच सुंदर जगण्याचा तिचा हट्टही कौतुकास्पदच आहे. तिची ही रंगीत बोटे ‘चोरून आणावी’ असेच मला वाटते इतक्या तिच्या रंगीत असण्याचा मला हेवा आहे. हल्ली मीही कागद घेते, कॅनव्हास घेते आणि रंगांशी खेळते. बघू माझी बोटे स्वातीसारखी रंगीत होताहेत का?
-डॉ. प्राजक्ता कोळपकर