मानसी चांदोरीकर
१ लीमध्ये शिकणाऱ्या 6 वर्षांच्या सुबोधला घेऊन त्याचे सर भेटायला आले. आल्यावर त्यांनी सुबोधला खुर्चीत बसवले व ते स्वतः बसले. मला याच्याबद्दल थोडं बोलायचंय. सर सुबोधबद्दल बोलणार असल्याने प्रथम त्याला वर्गात पाठवले व त्याच्या सरांशी बोलण्यास सुरुवात केली.
हा सुबोध याच वर्षी माझ्या वर्गात आलाय. मी त्याचा वर्गशिक्षक आहे. गेले 5-6 महिने मी त्याला पाहतोय. सुबोध वर्गात एकदम शांत शांत असतो. फारसा कोणाशी बोलत नाही. खेळताना कोणात मिसळत नाही. सतत बावरलेला वाटतो. मध्ये एकदा मी त्याला जवळ घेऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो काही न बोलता नुसताच खूप रडला. मी त्याला जवळ घेतलं तेव्हा तच्या हातावर चटका बसल्याची खूण होती. तो परत रडेल या भितीने मीच त्याला परत त्याबद्दल काही विचारलं नाही. पण तेव्हापासून त्याच्यात एक बदल मला जाणवतो तो म्हणजे तो कायम पहिल्याच बाकावर बसतो. मी त्याच्याशी बोलावं म्हणून सतत धडपड करतो.
मी त्याच्याशी थोडं जरी बोललो तरी तो लगेच खूष होतो. पण अजूनही वर्गात तो कोणात मिसळत नाही. एकटाच राहतो. सराचं हे बोलणं ऐकून त्यांच्याकडून त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल जाणून घेण्यासाठी संवाद साधला. त्याच्या घराबद्दल मला फार काही माहीत नाही. एवढंच माहितीये की सुबोधचे वडील नोकरीनिमित्त दुसरीकडे कुठेतरी असतात. तो आणि आई दोघंच इथे राहतात. त्याची आई मला भेटायला आली नाही. त्यामुळे याशिवाय फारसं काही माहीत नाही. सरांशी आणखी थोडा संवाद साधून झाल्यावर सर वर्गात गेले आणि सूचनांनुसार त्यांनी सुबोधला परत आणून सोडलं.
सुबोध आल्यावर त्याच्याशी गप्पांच्या स्वरूपात संवाद साधायला सुरुवात केली. ओळख नसल्याने या सत्रात तो फारसं काही बोलला नाही. त्याला दिलेला खेळ मात्र तो आवडीने मनापासून खेळला. त्याला तो खूप आवडला. खेळतानाही तो फारसं बोलला नाही. पण वर्गात जाताना मात्र हा खेळ मला परत खेळायला द्याल का? मला खूप आवडला, असं म्हणून तो वर्गात गेला.
दुसऱ्या सत्रातही तो खेळ खेळला. पण अजूनही फारसे काही बोलला नाही. त्याचा स्वभाव एकूणच खूप शांत वाटत होता. त्यामुळे तो फारसा बोलत नव्हता. त्यामुळे त्याची समस्या जाणून घेण्यासाठी त्याची एक चित्रचाचणी घेतली व त्याबाबत त्याच्याशी हळूहळू संवाद साधण्याचा प्रयत्न केला. या संवादातून असे लक्षात आले की सुबोध त्याच्या आईला खूप घाबरतो. त्याची आई खूप कडक आणि तापट आहे. सुबोधचं काही चुकलं की ती त्याला शिक्षा करते. फटके देणे, चटके देणे, खोलीत एकट्याला बसवून ठेवणे, मोठ्याने रागावणे अशा काहीशा प्रकारच्या शिक्षा ती त्याला करते. त्यामुळेच तो आईला खूप घाबरतो. आणि दुसरी समस्या म्हणजे तो आपल्या वडिलांना खूप मिस करतो. त्याचे बाबा कधीतरीच घरी येतात. तेव्हा त्याला खूप आनंद होतो. बाबा त्याला खूपच आवडतात.
पण ते लांब राहतात. या दोन्ही कारणांचा किंवा समस्यांचा परिणाम या वयातच त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर होऊ लागला होता. सर त्याला बाबांप्रमाणे वाटत असल्याने तो त्यांच्या जवळ जाण्यासाठी बोलण्यासाठी धडपडत होता. हे देखील या संवादातून लक्षात आले. त्याची ही समस्या लक्षात आल्यावर त्याच्या आईला सत्रासाठी बोलावण्यात आले. सुरुवातीच्या दोन-तीन सत्रांसाठी त्या आल्याच नाहीत. नंतर मात्र मुख्यध्यापकांच्या मदतीने त्यांना बोलावून घेण्यात आले. त्या थोड्या वैतागूनच भेटीसाठी आल्या. या सत्रात त्यांनी ओळख, सत्राला बोलावण्यामागचा उद्देश हे प्रथम त्यांना विश्वासात घेऊन सांगण्यात आले व पुढील सत्रांमध्ये हळूहळू त्यांचे सुबोधबरोबरचे वर्तन व त्याचा त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर होणारा परिणाम याची त्यांना जाणीव करून देण्यात आली.
त्यानंतर त्यांना स्वतःच्या वर्तनाची जाणीव झाली. नवरा दूर राहत असल्याने सतत पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या. त्यामुळे होणारी चिडचिड कधी कळत, तर कधी नकळत सुबोधवर निघते हे त्यांचे त्यांनाच लक्षात आले. या संदर्भात सुबोधच्या वडिलांबरोबरही सत्रे घेण्यात आली. या साऱ्या समुपदेशन प्रक्रियेनंतर सुबोधच्या वडिलांनी बरेच प्रयत्न करून आपली बदली करून घेतली. त्यामुळे सुबोधच्या आईचे चिडचिडीचे, रागाचे, शिक्षेचे प्रमाणही हळूहळू कमी होत गेले. आईचा राग कमी झाल्याने व बाबा जवळ आल्याने सुबोधही आपोआप खुलला. त्याची कोमेजत चाललेली कळी आपोआपच फुलली.
(केसमधील नाव बदलले आहे.)