[[{“value”:”
Parenting Tips: मुलांच्या हातात सतत मोबाईल असणे त्यांच्या आरोग्यासाठी आणि विकासासाठी योग्य नाही, हे आपण अनेकदा ऐकतो. मात्र, आता एका अभ्यासातून पालकांसाठीही महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. मुलांसमोर आई-वडील सतत मोबाईलमध्ये व्यस्त राहत असतील, तर त्याचा परिणाम मुलांच्या भाषा शिकण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो. म्हणजेच, फक्त मुलांचा स्क्रीन टाइमच नाही, तर पालकांचा स्क्रीन टाइमही मुलांच्या विकासावर परिणाम करू शकतो.
नॉर्वेमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात पालकांच्या फोन वापराचा आणि मुलांच्या भाषिक विकासाचा संबंध तपासण्यात आला. या अभ्यासात ७४७ मुलांचा समावेश करण्यात आला होता. मुलांना वयाच्या पाचव्या वर्षापासून आठव्या वर्षापर्यंत निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. या काळात मुलांचा स्क्रीन टाइम, त्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा टॅबलेट आहे का, तसेच पालक दिवसातून किती वेळ फोन वापरतात, याची माहिती घेण्यात आली.
पालक फोनमध्ये व्यस्त असतील तर मुलांशी संवाद कमी
लहान मुलं सतत काही ना काही शिकत असतात. त्यांना नवीन शब्द ऐकायला, प्रश्न विचारायला आणि त्यांची उत्तरं समजून घ्यायला आवडते. मात्र, पालक सतत फोनमध्ये व्यस्त असतील, तर मुलांशी होणारा संवाद कमी होऊ शकतो.
मुलांच्या भाषा विकासासाठी घरातील रोजच्या छोट्या-छोट्या गप्पा खूप महत्त्वाच्या असतात. पालक मुलांच्या प्रश्नांना उत्तर देतात, त्यांच्यासोबत गोष्टी सांगतात, पुस्तकं वाचतात किंवा एखाद्या विषयावर चर्चा करतात, तेव्हा मुलांना नवीन शब्द आणि त्यांचा वापर शिकायला मिळतो.
मात्र, आई-वडील मोबाईलमध्ये गुंतलेले असतील, तर मुलांकडे देण्यात येणारे लक्ष कमी होण्याची शक्यता असते. याचा परिणाम त्यांच्या शब्दसंग्रह आणि भाषा शिकण्याच्या प्रक्रियेवर होऊ शकतो.
चार तास फोन वापरणाऱ्या पालकांच्या मुलांवर परिणाम
अभ्यासात असे आढळले की, जे पालक दिवसातून सुमारे चार तास फोन वापरत होते, त्यांच्या मुलांच्या भाषा चाचणीतील गुण दिवसातून जवळपास एक तास फोन वापरणाऱ्या पालकांच्या मुलांच्या तुलनेत सुमारे २.५ गुणांनी कमी होते.
अभ्यासात मुलांचा स्वतःचा स्क्रीन टाइमही महत्त्वाचा असल्याचे दिसून आले. वयाच्या दोन वर्षांच्या आसपास दिवसातून सुमारे पाच तास स्क्रीन पाहणाऱ्या मुलांमध्ये दिवसाला एक तासापेक्षा कमी स्क्रीन पाहणाऱ्या मुलांच्या तुलनेत शब्दसंग्रह आणि भाषा कौशल्य कमी असल्याचे आढळले.
मुलांच्या सुरुवातीच्या वर्षांत पालकांचा वेळ महत्त्वाचा
लहान मुलांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्यांच्या मेंदूचा विकास वेगाने होत असतो. त्यामुळे या काळात मुलांना पालकांचा वेळ, संवाद आणि लक्ष मिळणे महत्त्वाचे आहे. एकत्र पुस्तक वाचणे, गोष्टी सांगणे, मुलांना प्रश्न विचारणे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणे आणि त्यांच्यासोबत खेळणे यामुळे मुलांच्या शिकण्याला मदत होऊ शकते. त्यामुळे पालकांनी मुलांसोबत असताना शक्य तितका मोबाईल बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करावा.
घरात स्क्रीनचा वापर कमी करण्याची गरज
अभ्यासानुसार, पालक जितका जास्त वेळ फोनवर घालवतात, तितका मुलांचा स्क्रीन टाइमही वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांचा मोबाईल वापर कमी करण्यासाठी केवळ त्यांना नियम सांगणे पुरेसे नाही. पालकांनी स्वतःही मोबाईल वापरण्याची सवय नियंत्रित करणे गरजेचे आहे.
मुलांसमोर सतत फोन स्क्रोल करण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्यासोबत पुस्तक वाचा आणि त्यांच्या छोट्या-छोट्या प्रश्नांना वेळ द्या. कारण मुलांच्या विकासासाठी पालकांचा वेळ आणि संवाद कोणत्याही स्क्रीनपेक्षा अधिक महत्त्वाचा ठरू शकतो.
“}]]
