कमी वयात तरुण मुली लैंगिकदृष्ट्या सक्रिय होत असल्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग हा आजार होण्याची शक्यता वाढत असून मुलींना एचपीव्हीची लस दिल्यामुळे या कर्करोगाला प्रतिबंध होण्यास मदत होते.
जगभरातील गर्भाशयाच्या कर्करोगाच्या रुग्णांपैकी एकपंचमांश रुग्ण भारतातील आहेत. दरवर्षी या कर्करोगाचे सुमारे एक लाख 30 हजार रुग्ण समोर येतात आणि 2025 सालापर्यंत भारतातील गर्भाशयाचा कर्करोग झालेल्या नव्या रुग्णांची संख्या सुमारे दोन लाख 26 हजार असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वर्ष 2002 मध्ये या आजारामुळे 74,118 महिलांचा मृत्यू झाला तर आजच्या घडीला हा आकडा तिपटीने वाढला आहे. माहितीचा अभाव आणि सामाजिक पातळीवर कलंक वाटत असणे, हे या मागचे महत्त्वाचे कारण आहे. कर्करोगामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 10% प्रमाण गर्भाशयाच्या कर्करोगाचे आहे.
भारतातील महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. गर्भाशयाच्या सर्वात खालच्या भागात होणारा हा घातक प्रकारचा आजार आहे. जेव्हा गर्भाशयातील पेशी अनियंत्रितपणे वाढतात तेव्हा हा कर्करोग होतो. तुमची मासिक पाळी अनियमित असेल, मासिक पाळीदरम्यानही स्त्राव होत असेल किंवा लैंगिक संबंधांनंतर किंवा रजोनिवृत्तीनंतर योनीमार्गातून रक्तस्राव होत असेल तर डॉक्टरशी संपर्क साधावा.
गर्भाशयाचा कर्करोग हा जननेंद्रियाच्या मार्गातील भारतात सर्वाधिक वारंवारिता असलेला कर्करोग आहे. जगभरात या कर्करोगाचा क्रमांक चौथा आहे. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस हा या कर्करोगासाठी कारणीभूत असलेला प्राथमिक धोकादायक घटक आहे. या कर्करोगाला बहुधा मानेच्या मणक्याचा कर्करोग समजला जाण्याची शक्यता असते. हा कर्करोग महिलांच्या गर्भाशयाच्या खालच्या भागाला म्हणजे योनीकडे जाणाऱ्या गर्भाशयाच्या प्रवेशद्वाराला होतो.
प्रतिबंधात्मक तंत्रांच्या माहितीचा आणि नियमित आरोग्य तपासणीने होणारे निदान याविषयी असलेल्या माहितीच्या अभाव हा या मृत्यूंच्या आकडेवारीसाठी कारणीभूत असलेला महत्त्वाचा घटक आहे. स्तनांच्या कर्करोगाच्या तुलनेने गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण अधिक असले तरी हा कर्करोग मोठ्या प्रमाणावर मृत्यूस कारणीभूत ठरणारा (सोशल कीलर) मानला जात नाही.
हा रोग केवळ लैंगिक संबंधांमधूनच होतो, असा गैरसमज अनेकांमध्ये आहे. या आजारासंबंधी असलेल्या सामाजिक दृष्टिकोनामुळे अनेक महिला प्रतिबंधात्मक तपासणी करून घेण्यासाठी पुढे येत नाही. पण वैद्यकीय व्यावसायिक आणि महिलांमध्ये पॅप चाचणीविषयी आणि प्रतिबंधात्मक सेवांविषयी जागरूकता असणे या समस्येचे उच्चाटन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
पूर्वी 30 वर्षांवरील महिलांमध्ये हा आजारा आढळून येत असे. पण अलीकडील काळात विशीतील तरुणींमध्येही या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. 30 ते 45 या वयोगटातील लैंगिकदृष्ट्य्ा सक्रिय असलेल्या महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग आढळून येतो. पण तरुण वयात लैंगिकदृष्ट्य्ा सक्रिय झालेल्या मुलींना हा आजार होण्याची शक्यता वाढते. संभोग करताना ह्युमन पॅपिलोमा व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होऊ शकतो. परंतु, लैंगिकदृष्ट्य्ा सक्रिय असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हा आजार होतो, असे नव्हे.
गर्भधारणेचे प्रमाण जास्त असणे, कमी वयात लैंगिक संबंध राखणे, हॉर्मोनल गर्भनिरोधकांचा दीर्घकाळ वापर, तंबाखूचा वापर, कनिष्ठ सामाजिक-आर्थिक स्तर, अस्वच्छता आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण कमी असलेला आहार हेसुद्धा धोकादायक घटक असू शकतात. एखाद्या व्यक्तीला योनीभागात अस्वस्थता किंवा योनीमधून दुर्गंधीयुक्त स्राव होऊ शकतो.
या स्त्रावामध्ये रक्तही असू शकते आणि दोन मासिक पाळ्यांदरम्यान किंवा रजोनिवृत्तीनंतरही अशा प्रकारचा स्त्राव होऊ शकतो. त्याचप्रमाणे लैंगिक संबंध राखताना वेदना होणे, पाठदुखी, पायांमध्ये किंवा योनीभागात वेदना, थकवा, वजन कमी होणे, भूक मंदावणे किंवा एक पाय सुजणे ही लक्षणे असू शकतात.
पॅप चाचणीचे निष्कर्ष सामान्य नसले तर डॉक्टराची भेट घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही पेशींमध्ये झालेल्या बदलांवर उपचार करू शकता. एचपीव्ही लसीमुळे गर्भशयाच्या कर्करोगापासून संरक्षण होते कर्करोग कोणत्या टप्प्यावर आहे, यावरून शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपी देऊन उपचार करण्यात येतात. लैंगिकदृष्ट्य्ा सक्रिय असलेल्या महिलांना नियमितपणे पॅप स्मिअर चाचणी करून घ्यावी.
कारण कर्करोगपूर्व टप्प्यावर गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान होणे कठीण असते. या आजाराविषयची प्राथमिक माहिती (शाळांमध्ये) देणे आवश्यक आहे, जेणेकरून गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करता येईल. या कर्करोगाला प्रतिबंध करता येऊ शकतो.
– डॉ. अस्मिता पोतदार